मंदिरे

प्राचीन काळापासुनच मानव हा निसर्गाचा उपासक राहीला आहे. निसर्गाची उपासना करताना त्याने त्यातील काही शक्तींचे पुजन करण्यास सुरवात केली व त्यातुनच उपास्य देवी-देवता या संकल्पनेचा जन्म झाला. सुरवातीला या देवता लाकुड-मातीच्या व काहीवेळा दगडाच्या असत व त्यांचे पूजन घरातच केले जाई. पण नंतरच्या काळात आपल्याप्रमाणे देवाचे देखील घर असावे हि कल्पना मानवाच्या मनात आली व त्यातुनच देवालय (मंदीर) हि संकल्पना जन्मास आली. संस्कृत भाषेत मंदिर या संज्ञेचा अर्थ घर असा होतो तर मराठीत आलय या शब्दाचा अर्थ घर असा होतो. यातुनच (देव +आलय= देवालय) म्हणजे देवाचे घर या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. कालांतराने यातुनच देऊळ हा शब्द निर्माण झाला. इ.स.आठवे शतक ते तेरावे शतक या दरम्यान भारतात अनेक मंदिरे बांधण्यात आली. प्राचीन वास्तुशास्त्रानुसार हि मंदिरे बांधण्याच्या प्रामुख्याने नागर व द्राविड या दोन स्थापत्यशैली होत्या. नागरशैली हि सर्वात प्राचीन शैली असुन यात शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा व बाहेरील बाजूने काहीसा गोलाकार असतो. ... शिखरावर बसक्या लोट्याप्रमाणे आमलक नावाचा भाग असतो. द्रविड शैलीतील मंदिराच्या शिखरात मजले बांधलेले असतात. यांना भूमी म्हणुन संबोधतात. या मंदिराच्या कळसाला गोपुर म्हणुन ओळखले जाते. या दोन शैलीच्या मिश्रणातुन वेसर अथवा भूमिज नावाची तिसरी उपशैली निर्माण झाली. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर खाचे पाडुन त्यावर दगड रचून तयार केलेली वास्तु हे या मंदिरांचे खास वैशिष्ट होते. प्राचीन मंदिरांचे प्रामुख्याने स्तंभ,चौथरा,शिखर,अंतराळ,गर्भगृह,द्वारमंडप, सभामंडप,मुखमंडप असे वेगवेगळे भाग पडतात. महाराष्ट्रात घृष्णेश्वर, अंबरनाथ, गोंदेश्वर, देवळाणे,अंबाबाई, अमृतेश्वर, टाहाकारी,अंभई, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, कुणकेश्वर, भुलेश्वर ही काही ठळक वेगवेगळ्या शैलीतील मंदिरे आहेत. महाराष्ट्रात या सर्व प्रकारच्या शैलीना यादवांचा प्रधान हेमाडपंत याच्या नावाने हेमाडपंती मंदिर म्हणूनच ओळखले जाते. या सर्व मंदीरांवर अप्सरा,कीर्तिमुख,गणेशपट्टी, यक्ष,व्याल, नाग, हत्ती, सुरसुंदरी,पुराणातील कथा व दशावतारांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. विश्वविषयक माणसाच्या कल्पना स्पष्ट होत गेल्यावर मंदिराच्या आखणीत अष्टदिकपाल व नवग्रह यांना स्थान मिळाले. या मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा असल्याने आजही काही मंदिरात प्राचीन हस्तलिखिते, भूर्जपत्रे आणि छापील ग्रंथ पहायला मिळतात. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहेत. महाराष्ट्रातील मंदिरे प्रामुख्याने चालुक्य,राष्ट्रकुट , यादव,विजयनगर यांच्या राजवटीत बांधली गेली असल्याने या राजवटींचा या मंदिरांच्या रचनेत व बांधकामावर प्रभाव पडलेला दिसुन येतो. यातील बहुतेक मंदिरांचे बांधकाम राजाने किंवा व्यापाऱ्यानी दिलेल्या दानातुन झाले असल्याने ही मंदिरे त्यावेळच्या राजधान्या व व्यापारी मार्ग, बाजारपेठा यांच्याजवळ बांधली गेली. याशिवाय पूराण कथांमधील उल्लेखांमुळे पवित्र मानल्या गेलेल्या ठिकाणी देखील मंदिरे बांधण्यात आली. मंदीरे बांधताना स्थानिक दगड वापरल्याने सह्याद्रीच्या कुशीत व घाटमाथ्यावर काळया पाषाणात मंदिरे बांधण्यात आली. मंदिरासाठी लागणारा दगड मंदिराच्या परिसरातुन काढला गेल्याने त्या दगडखाणीच्या जागी पाण्याचा तलाव अथवा पुष्करणी बांधली गेली. कोकणात काळा पाषाण नसल्याने येथील मंदिरे जांभ्या दगडात बांधुन त्यावर कौलारू छप्पर घातले गेले. मंदिराच्या आवारात असलेली दिपमाळ हे महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील एक खास वैशिष्ट्य आहे. दगडांचा किंवा विटांचा निमुळता होणारा स्तंभ उभारुन त्यात ओळीने हात बसविलेले असतात किंवा लहान कोनाडे कोरलेले असतात. काही खास प्रसंगी यात दिवे लावुन या दिपमाळा प्रज्वलित केल्या जात. राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. यावेळी काही ठिकाणी कोसळलेले दगडी शिखर पुन्हा बांधण्याकरीता विटांचा व चुन्याचा वापर केला गेला त्यामुळे या मंदिरावर तत्कालीन शिल्पकलेचा ठसा उमटलेला दिसून येतो. सह्याद्रीत भटकंती करताना प्राचीन मंदिराबरोबर निसर्गाचे दर्शन घडवणारी मार्लेश्वर, नागेश्वर, ढाकबहीरी यासारखी गुहामंदिरे पहायला मिळतात. या शिवाय आडवाटेवर अज्ञातवासात असलेली देवळाणे, अमृतेश्वर,टाहाकारी, अंभई, होट्टल,धरासुर यासारखी एकाहुन एक सरस अशी मंदीरे पहायला मिळतात. होट्टल गावाचा उकिरडा म्हणजे एकाहुन एक सुंदर अशा मुर्तींचा साठा आहे. आपणच आपला वारसा असा कचऱ्यात टाकायचा आणी नंतर चोरी झाली म्हणुन बोंबलत फिरायच असे मला खेदाने येथे नमुद करावे लागते. आडबाजूला पडल्यामुळे लोकांच्या विस्मरणात गेलेल्या या अशा मंदिरांना आवर्जुन भेट दयायला हवी !!!!.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...
error: Content is protected !!