सिद्धेश्वर माचनुर

प्रकार : मध्ययुगीन शिवमंदीर

जिल्हा : सोलापुर

सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर मंगळवेढा तालूक्यात सोलापुरपासून ४० किमी अंतरावर भिमा नदीच्या काठावर श्री क्षेत्र माचणूर आहे. या ठिकाणी सिध्देश्वराचे पुरातन देवालय असून भिमा नदीच्या पात्रात जटाशंकर मंदीर आहे. माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते. मंदिर काळ्या पाषाणात बांधलेला असुन या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात काहीसे साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून आत प्रवेश केल्यावर दरवाजाच्या आत दोनही बाजूला पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन डाव्या बाजुला यात्रेकरूना राहण्यासाठी दगडी ओवऱ्या बांधलेल्या आहेत.या ओवऱ्याच्या पुढील भागात व पायऱ्यांच्या डावीकडे मल्लिकार्जुन मंदिर आहे. प्रशस्त अशा या पायऱ्या उतरून आपण दुसऱ्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस दोन वीरगळ आहेत. प्रवेशद्वारात उभे राहिल्यावर संपुर्ण मंदिराचा परिसर दिसतो. ... सिद्धेश्वर मंदिराची बांधणी मध्ययुगीन असून त्याला चारही बाजूने तटबंदी आहे. या तटबंदीत यात्रेकरूना राहण्यासाठी चारही बाजुस ओवऱ्या बांधलेल्या असुन या ओवऱ्यात असलेल्या पायऱ्या चढुन तटबंदीवर जाता येते. या सर्व बांधकामासाठी मोठमोठया दगडांचा वापर केला आहे. मंदिराबाहेर दगडी पार असलेले जुने मोठे पिंपळाचे झाड आहे. मंदिरासमोर तीन फूट उंचीचा भव्य नंदी असुन गाभाऱ्यात चांदीचा भव्य मुखवटा घातलेली सिद्धेश्वराची पिंडी आहे. मंदीराची रचना गर्भगृह सभामंडप मुखमंडप अशी असुन गाभाऱ्यात जाण्यासाठी दोन दरवाजे ओलांडावे लागतात. त्यांपैकी पहिला दरवाजा पाच फूट उंचीचा तर दुसरा अडीच फूट उंचीचा आहे. उजव्या बाजूस मंदिराच्या तटाला लागून असलेल्या दरवाजातुन बाहेर आल्यावर नदीकाठी बांधलेला प्रशस्त घाट नजरेत भरतो. या घाटाच्या कठड्याकडे निट पाहिल्यास त्यावर व्याघ्र प्रतिमा कोरल्याच्या दिसून येतात. हा घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते. या घाटाच्या वरच्या बाजूला मोक्षधाम आश्रम आहे. येथुन वीस पंचवीस पायऱ्या खाली उतरल्यावर नदीच्या पात्रात मध्यभागी जटाशंकराचे छोटे मंदिर आहे तेथे बोटीने जाता येते. १९५६मध्ये भीमानदीला आलेल्या पुरात या मंदिराचा कळस वाहून गेला आहे. इतिहासकाळात सिध्देश्व र मंदिराच्या बाहेरील तटाला लागून बरीच मोठी लोकवस्ती असल्याच्या काही खुणा आढळतात. याशिवाय या भागात प्राचीनकाळी आणखी काही मंदिरे असावीत याचे पुरावे आढळतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते व उत्सव साजरा केला जातो. पंढरपूरचे बडवे श्रावणात काही काळासाठी माचणूरच्या मंदिरात येऊन पूजा करतात. माचणूरचे मंदिर प्राचीन असुन ते नक्की केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही पण औरंगजेबाच्या आधीपासुन ते अस्तित्वात असावे कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या माचनुर किल्ल्यात १६९४ ते १७०१पर्यंत मुक्काम होता. या काळात त्याने हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या भागाचे व किल्ल्याचे नाव माचणूर कसे पडले याबद्दल स्थानिकाकडून एक कथा सांगितली जाते. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराचे शिवलींग फोडण्याची आज्ञा केली. त्यासाठी गेलेल्या सैनिकांवर मधमाशा व भुंग्यांनी हल्ला चढविल्याने त्यांना परत फिरावे लागले. यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने मंदीर भ्रष्ट करण्यासाठी शंकराला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले पण पिंडीसमोर नैवेद्यताट ठेवून त्यावरील कापड काढल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली. मांसाचा नूर पालटला म्हणून हे ठिकाण मास-नूर म्हणुन ओळखले जाऊ लागले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन माचनुर हे गावाचे नाव कायम झाले. या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!