टाहाकारी मंदीर

प्रकार : प्राचीन देवीमंदीर

जिल्हा : अहमदनगर

महाराष्ट्रात शैव, वैष्णव पंथांच्या खालोखाल शाक्त पंथाचा प्रसारही प्राचीन काळापासून झालेला आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी तर माहूरगडची रेणुका ही प्राचीन शक्तिस्थाने याची साक्ष देतात. याच प्राचीन मंदीरातील एक मंदीर म्हणजे टाहाकारीचे जगदंबा मंदीर. अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखला जाणा-या अकोले तालुक्यात प्राचीन व कलाकुसरयुक्त अनेक मंदिरे आहेत. अगदी प्राचीन काळापासून येथे राज्य करणाऱ्या विविध राजसत्तांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लेण्या, दुर्ग व मंदिरे यांची साखळी निर्माण केली. एकेकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिरे आज आडबाजूला पडली आहेत. प्राचीन काळी व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले त्याप्रमाणे या मार्गावर मंदिरांचीही निर्मिती केली. यातील अप्रतिम कलाकुसरीची अनेक मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत. असेच एक सुंदर कातळशिल्प म्हणजे टाहाकारीचं जगदंबा मंदिर. ... अकोल्याहून समशेरपूरमार्गे साधारण वीस कि.मी. तर सिन्नरहून ठाणगाव मार्गे तीस कि.मी.वर आढळा नदीच्या काठावर टाहाकारी हे लहानसे गाव आहे. या टाहाकारी गावात हे जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. गावकऱ्यांकडून टाहाकारी या नावाच्या उत्पत्तीबाबत दोन कथा सांगितल्या जातात. हा परिसर रामायणातील दंडकारण्याशी संबंधीत असल्याने येथील कथाही रामायणाशी संबंधित आहे. पहिली कथा म्हणजे रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहो फोडला ते ठिकाण म्हणजे टाहोकरी नंतर टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले व दुसरी कथा अशी प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असता शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली पण प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखले आणि वंदन केले. तेव्हा पार्वती आपल्या मूळ जगदंबा रूपात येथे प्रगटली. तेथे हे जगदंबा मंदिर बांधले गेले. टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. टाहाकारीचे मंदिर भूमीज पद्धतीचे असुन उत्तराभिमुख आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर उभे आहे. जोत्यावर पुष्पपट्टी आणि पद्मपट्टी कोरलेली आहे. मंदिराचा मुखमंडप १० खांबांवर आधारलेला असुन या मुखमंडपात भिंतीलगत दगडी आसनांची रचना केलेली आहे. मुखमंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली असुन त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुखमंडपातून सभामंडपात आल्यावर मंदिराचा अंतर्गत विस्तार जाणवतो. बारा खांबांवर आधारित हा मंडप असुन समोरच खांबाला टेकवून शंकर-पार्वतीची व गणपतीची मुर्ती आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमीतिक आकृत्या कोरलेल्या असुन खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. सभामंडपाच्या छताला एकात एक गुंफलेली वर्तुळे व मध्यभागातून खाली लोंबणारे दगडी झुंबर अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाला पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन दिशेला तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे. अंतराळात काही देवकोष्टेही आहेत. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम केले असून शीर्षपट्टीवर देवीची संकेतमूर्ती आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि अठरा हातांच्या जगदंबेची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून महिषासुरमर्दिनी अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी तर पश्चिमेस भद्रकाली देवीची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर उजव्या बाजुस कामाक्षी देवीचे शिल्प तर डाव्या बाजुस कुबेराचे शिल्प कोरले आहे. मंदिराचा अंतर्भाग पाहून मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला मंदिराचा बाह्य़भाग दिसतो. मंदिराची बाह्य़रचना तारकाकृती असुन भिंतीच्या बाह्य़ भागावर आणि खांबांवर मोठया प्रमाणावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगावर दुमडलेल्या भिंतीच्या मध्यावर २२ प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. टाहाकारी मंदिराचे हे मुख्य आकर्षण असुन त्यांच्या रचना शैलीतून तत्कालीन कलासौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कधी आरशात स्वत:चे सौंदर्य पाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा दर्पणा, तर कुठे नृत्य करणारी नृत्यसुंदरी, बासरी, मृदंग वादन करणारी, हाती पोपट घेतलेली शुकसारिका, मुलाला घेतलेली मातृमूर्ती, मांडीवर विंचू असणारी विषकन्या, डोक्यावर छत्र धारण केलेली, मर्कट लीलांनी हैराण झालेली अशा अनेक सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. एका सुंदरीच्या अंगामध्ये विदेशी पद्धतीचा कोट घातलेला स्पष्टपणे दिसतो. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना ही मूर्ती दाखवलेली आहे. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्याच्या पन्हाळीवर मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी डमरू वाजवणारा गण तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे. मंदिरासमोरील नदीच्या घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावर एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. हा शिलालेख पुसट झाल्याने आता वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे एक पडकं मंदिर असुन मंदिराबाहेर समाधीचे दोन फूट उंचीचे अष्टकोनी दगड आहेत. त्यावर पावले शिवलिंग आणि नंदी कोरला आहे. मंदिर परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे. चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे मोठा उत्सव केला जातो. मंदीर नीटपणे पहायचे असल्यास या काळात येथे जाणे टाळावे. येथील स्थानिक जनतेला या कलेचं भान व ज्ञान नसल्याने हजार वर्षे प्राचीन असलेल्या या कोरीव मंदिराचे ऐतिहासिक मोल पार धुळीस मिळत असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. --------------(टिप—सदर मंदिराच्या मुर्तींची माहीती श्री.अनिल शिरसाट यांनी दिलेली असुन शब्दांकन श्री. सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.)
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!