जलप्रपात

पावसाळा सुरु झाला म्हणजे सर्वांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे. या वर्षा सहलीतील प्रमुख कार्यक्रम म्हणजे पाउस अंगावर घेत एखादया धबधब्याच्या प्रवाहाखाली मनसोक्त डुंबणे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या या डोंगररांगातुन असंख्य धबधबे खाली कोसळताना दिसतात. निसर्गराजा प्रसन्न होऊन आपले जलवैभव येथे ओतत असतो. डोंगरातील कातळकडे कापत खळखळत उसळत जाणारा पाण्याचा हा प्रवाह जसा भटक्यांना वेड लावतो तसेच कवी- लेखक व संतानाही याचा मोह पडला आहे. या धबधब्याचे वर्णन करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात. गिरीचे मस्तकी गंगा| तेथुनी चालली बळे |धबाबा लोटल्या धारा | धबाबा तोय आदळे ||१|| गर्जती मेघ तो सिंधू|ध्वनी कल्लोळ उठला|कडयासी आदळे धारा|वात आवर्त होतसे ||२|| सर्वांनाच भुरळ घालणारे धबधबा हे निसर्गाचे एक वेगळेच मनोहारी रूप आहे. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे धबधबा म्हणजे उंचावरून खाली कोसळणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह. ... एखादया कड्यावरून पाण्याचा प्रवाह उडी घेतो व तेथे धबधबा निर्माण होतो. अनेकदा धबधब्याच्या खाली जाणे साध्य नसते पण दुरून पहाताना शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं रौद्रसुंदर रूप, पाण्याचा सहस्रधारांनी खाली कोसळणारा फेसाळता प्रवाह व त्याचा धीरगंभीर आवाज हे सारेकाही अचाट असते. उंचावरून दरीत कोसळणाऱ्या पाण्याचे उडणारे तुषार व अचानक आलेल्या उन्हामुळे त्यात निर्माण झालेले इंद्रधनुष्य याचे सौंदर्य वर्णन करायला शब्दच पुरत नाहीत. हे सारी काही अवर्णनीय असले तरी निसर्गाचे नियम मोडुन त्याच्या रौद्र रूपाला दिलेले आव्हान कधीकधी जीवावर बेतणारे ठरते. पावसाच्या सुरवातीच्या काळात जेव्हा पाण्याचा वेग अति असतो त्यावेळी प्रवाहात असलेले दगड पाण्याबरोबर वाहत खाली कोसळतात त्यामुळे जोरदार पाउस पडत असताना अशा प्रवाहाखाली जाणे टाळावे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...
error: Content is protected !!