समुद्रकिनारे

महाराष्ट्राला उत्तरेकडील दमणगंगा नदीपासुन दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत ७२० कि.मी. लांबीचा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला अत्यंत सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. हा संपूर्ण किनारा भारताच्या किनारपट्टीच्या सुमारे १० % इतका आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटनाबाबत भाग्यशाली राज्य आहे असंच म्हणावं लागेल कारण राकट देशा असे वर्णन असणाऱ्या महाराष्ट्राला लाभलेली ही नाजूक सौंदर्याची किनार पर्यटकांना आपल्या नैसर्गिक सौंदर्याने आकर्षित करीत असते. मुंबईच्या उत्तरेला पालघर जिल्ह्यातील डहाणू-बोर्डी या गावांपासून सुरू होणारा हा किनारा दक्षिणेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यापर्यंत म्हणजे गोव्याच्या सीमेपर्यंत संपुर्ण कोकणपट्टीला सलग आहे. या किनाऱ्यावर महाराष्ट्रातील पालघर, मुंबई शहर,मुंबई उपनगर,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे ६ जिल्हे वसलेले आहेत. कोकणचा प्रदेश या सागरी किनाऱ्याच्या सान्निध्याने सुंदर, हिरवा आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न झालेला आहे. ... या किनारपट्टीवर स्वच्छ रेती व निळसर पाणी असणारे अनेक सुंदर किनारे आहेत. त्यामुळेच कोकणचे रम्य समुद्रकिनारे हे पर्यटकांना कायम खुणावित आले आहेत. समुद्राचे सान्निध्य असले म्हणजे सुंदर शांत सागर किनारे आलेच. समुद्र किनारी फिरणे किंवा लाटा पहात संध्याकाळी वेळ घालवणे हा अनुभव काही वेगळाच असतो. कोकणच्या या पर्यटनात खास कोकणी मालवणी पदार्थाची चव आवर्जुन घ्यायला हवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही स्थळे पर्यटनाच्या दृष्टिने विकसीत करण्यात आली असुन त्या ठिकाणी साहसी खेळांची आवड असणा-यांसाठी स्नॉर्कलिंग- स्कुबा डायव्हिंगसारख्या संधी उपलब्ध आहेत. देशविदेशातील पर्यटकांनी महाराष्ट्राची ही सागरी किनारपट्टी कायम गजबजलेली असते. या सागरी किनाऱ्यांना भेट देण्यासाठी जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी वगळता केव्हाही जायला हरकत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...
error: Content is protected !!