माउलीदेवी-रेडी

प्रकार : मध्ययुगीन देवीमंदीर

जिल्हा : सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या शिरोडा गावाची ग्रामदैवता श्री माऊली देवीला भेट देण्यासाठी आपल्याला वेंगुर्ला गाठावे लागते. वेंगुर्ल्याहून रेडी येथे जाण्यासाठी नियमितपणे एस.टी.सेवा उपलब्ध आहे. श्री माऊली देवीच्या स्थापनेचा इतिहास श्रीदेवीकोशामध्ये सापडतो. शिरोडा गावातील जुनी जाणकार मंडळी तिथली ग्रामदेवता असलेल्या श्री माऊली देवीबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, एका परदेशी व्यापाराचं मालवाहू गलबत शिरोडा समुद्रकिना-यापासून काही अंतरावर वादळात सापडलं होतं. त्या गलबतात एक मूर्ती होती. त्या व्यापा-यानं मूर्तीसमोर बसून प्रार्थना केली. वादळ शांत होऊन माझ्यावरील संकट टळलं, तर या गावात पोहचल्यावर तुझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करेन आणि वादळ शांत झालं. तो व्यापारी त्या समुद्रकिनारी सुखरूप पोहोचला. व्यापा-याने त्वरीत शिरोडा गावच्या प्रमुख मानक-यांशी संपर्क साधला. ... व्यापारी आपल्या सहका-यासह देवालयाच्या परिसरात आले आणि गावातल्या प्रमुख मानक-यांच्या हातून श्री देवी माऊलीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. ही प्रतिष्ठापना शिवकालात केली गेली. त्या दिवसापासून श्री माऊली देवीच्या भक्तीचा नंदादीप श्रद्धापूर्वक अखंड तेवत आहे. श्री माऊली देवीच्या जागृतपणाची आख्यायिका अशी की पोर्तुगिजांनी १८१७ साली डोंगरावरून या मंदिरावर तोफा डागल्या. तेंव्हा गावकऱ्यानी देवीला कौल लावला. दुसऱ्या दिवशी लक्षावधी मधमाशा तेथे उत्पन्न झाल्या व पोर्तुगीज सैन्याच्या दिशेने घोंघावत गेल्या. पोर्तुगीजांनी घाबरून तेथुन पळ काढला आणि परत कधीही फिरकले नाही. असे हे श्री देवी माऊलीचे जागृत देवस्थान गणपती मंदिरापासुन जवळच असुन अवश्य भेट देण्यासारखे आहे. श्री माऊली देवीच्या मंदिरात वर्षभर भजनाचा कार्यक्रम होतो. हे या देवस्थानाचं एक खास वैशिष्टय़ आहे. एकही दिवस न चुकता भजन केलं जाणारं, हे सिंधुदुर्गातील असं एकमेव देवस्थान असावे. श्रीदेवी माऊलीचं मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या डाव्या बाजूस श्री देव पुरमाराचं देवस्थान आहे. उजव्या बाजूस श्री देव घाडवसाचं मंदिर आहे. समोर श्री देव जागनाथाचे मंदिर आहे. श्री देव पुरमाराच्या मागे श्री देव निरंकाराची घुमटी आहे. माऊली मंदिराच्या समोरील बाजूस उजवीकडे दीपस्तंभ आहे. तर डाव्या बाजूस सभागृह व भक्तनिवास आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!