वारसास्थळे

महाराष्ट्राला अतिशय संपन्न असा इतिहास लाभला आहे. सातवाहन काळापासुन वाकाटक, चालुक्य,शिलाहार,यादव,बहमनी ते अगदी मराठा साम्राज्यापर्यंत महाराष्ट्राची जडणघडण झाली असुन इतिहासाच्या या पाउलखुणा आपल्याला महाराष्ट्रात जागोजागी पहायला मिळतात. या काळात अनेक परकीय आक्रमकांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले आणि इथल्या वीरांनी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊन या भुमीचे परकीय आक्रमकांपासून रक्षण केले. उत्तर मराठा काळात तर साऱ्या भारताचे रक्षण करण्याचे उत्तरदायित्व महाराष्ट्राकडे आले. महाराष्ट्राची भटकंती करताना हा इतिहास वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. कधी बुलंद किल्ले, कधी सह्याद्रीत कोरलेली लेणी तर कधी अजोड स्थापत्यशास्त्र असलेली विविध मंदिरे-पुष्करणी तर कधी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या विरगळी व थोरांची समाधीस्थळे. इथल्या पराक्रमाचा इतिहास सांगणारी ही कोरीव शिल्पे आज आपले अस्तित्व दाखवत ऊनपावसात वर्षानुवर्षे उभी आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवा असा हा महाराष्ट्राच्या पराक्रमाचा वारसा आज अज्ञातवासात खितपत पडला आहे. ... मुळ अरबी असलेला वारसा हा शब्द आपल्या भाषेत सहजतेने सामावला आहे. 'दाय' हा संस्कृत शब्द त्याला समानार्थी आहे. (पितादिधनं दीयते इति दाय:). दाय म्हणजे पित्याकडून अथवा पूर्वजांकडून मिळणारे धन असा होतो. तसेच वारसा म्हणजे पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली गोष्ट मग ती चल असो वा अचल. काळानुसार समाजजीवन जरी बदलत असले तरी लोकजीवनात खोलवर रुजलेले हे संदर्भ आजही समाजमनावर परीणाम करत असतात. आणी म्हणुनच मी आपल्या संकेतस्थळावर मी या वारसास्थळांची - स्फुर्तीस्थळांची ओळख करून देत त्याविषयी आस्था वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. किल्ले,गढीकोट, लेणी,मंदीरे या वास्तु मी स्वतंत्रपणे मांडल्या असल्याने वारसास्थळे या विभागात समाधी, विरगळ, रणभूमी, पुष्करणी,बारव या वास्तु प्रामुख्याने असुन काही निसर्गनवल ठिकाणे या सदराखाली मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयासाठी वेगळी भटकंती केलेली नसुन गडकोट फिरताना जवळपास असलेल्या व सहजतेने पहाता आलेल्या वास्तुंची येथे नोंद घेतलेली आहे. खरेतर महाराष्ट्रात आढळणाऱ्या या सर्व प्राचीन स्मृतीशिल्पांचे जतन करून त्यांची एक सूची तयार केली पाहिजे जेणेकरून या वास्तू कोणत्या ठिकाणी व कोणत्या वीराची आहे हे एकाच ठिकाणी समजुन येईल. हि वारसास्थळे जपणे हे केवळ सरकारचेच नव्हे तर सामान्य जनतेचे देखील कर्तव्य आहे. समाधीच्या रूपाने आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा व कर्तबगारीचा परिचय करून देणारी हि ठिकाणे आपली स्फुर्तीस्थळे असुन त्याविषयी जाणीव व्हावी व या शक्तिस्थळांचा इतिहास सोप्या शब्दांत सर्वांसमोर यावा यासाठी केलेली हा लहानसा प्रयत्न !!!
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...
error: Content is protected !!