कुणकेश्वर

प्रकार : मध्ययुगीन शिवमंदीर

जिल्हा : सिंधुदुर्ग

कुणकेश्वर हे महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले असुन ते देवगडच्या दक्षिणेस २० कि.मी.वर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. येथे श्री क्षेत्र कुणकेश्वर हे प्राचीन शिवमंदिर असुन मंदिराची बांधणी द्रविडीयान पद्धतीची आहे. या मंदिराची उभारणी इ.स.च्या १२ व्या शतकात यादव कालखंडामध्ये झाली. पुढे छत्रपती शिवरायांनी नीलकंठपंत अमात्य बावडेकर यांना सांगून या मंदिरचा जीर्णोद्धार केला. मंदिरात जांभ्या दगडातील स्वयंभू शिवलिंग आहे. समुद्रकिनाऱ्यावर याची उभारणी झालेली असल्यामुळे सागराच्या लाटांना तोंड देण्यासाठी समुद्राकडील भाग अंदाजे १० मीटर उंचीच्या दगडी तटाने बांधून काढला आहे. २० मीटर उंचीचे भव्य मंदिर तटबंदीने वेढलेले असून त्याभोवतीचे अंगण जांभा दगडाच्या फरशीचे आहे. ३० फूट उंचीच्या चौथऱ्यावर सुमारे ७० फूट उंचीचे हे मंदिर आहे. मंदिराच्या बांधकामासाठी लहानमोठ्या आकाराच्या दगडी शिळा वापरल्या आहेत. ... उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून मंदिराच्या बांधकामाकडे पाहिले जाते. मुख्य मंदिराच्या उत्तरेस बाहेरच्या बाजूला चार स्तंभ असून मधोमध कासव बसविलेले आहे. मंदिराच्या मोठ्या तुळयावर उत्कृष्ट कलाकुसर केलेली आढळते. मंदिराच्या गाभाऱ्याचे शिखर उंच बदामी आकाराचे आहे. जांभ्या दगडाने केलेले आकर्षक बांधकाम व त्यावर केलेल्या कोरीव नक्षीकाम करून तयार केलेल्या आकृत्या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. श्रीक्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधतात. काशी येथे १०८ शिवलिंगे, तर कुणकेश्वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. गेली कित्येक वर्षे या शिवलिंगांवर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा चालू असतो. तरीही शिवलिंगे झिजलेली नाहीत. सध्या केवळ ५-६ ठिकाणी शिवलिंगे पाण्याच्या ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात. अशा प्रकारची खडकांवरील शिवलिंगे काशी या तीर्थस्थळावरही आहेत. श्रीक्षेत्र कुणकेश्वर देवाचे मंदिर कुणकेश्वर गावात समुद्रकाठी डोंगराच्या पायथ्याशी उंचवट्यावर आहे. मंदिराची उंची ७० फूट आहे. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते. कुणक म्हणजे कणक नावाच्या वृक्षाची राई तेथे होती. त्यावरून कुणकेश्वर असे नाव प्रचलित झाले आहे. एका ब्राह्मणाची एक गाय चरत प्रतिदिन सध्या असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात येत असे. ती घरी काही दूध देत नसे. या प्रकाराचा उलगडा करण्यासाठी ब्राह्मण गायीच्या मागून निघाला. सदर ठिकाणी येताच गायीने एका स्वयंभू पाषाणावर पान्हा सोडल्याचे त्याने पाहिले. त्याने हातातील काठीने या पाषाणावर प्रहार केला. त्याक्षणी त्या पाषाणाचा एक तुकडा उडून त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून तो ब्राह्मण आश्चणर्यचकीत झाला आणि त्या पाषाणास शरण गेला. त्यानंतर तो तेथे प्रतिदिन दिवाबत्ती लावून पूजा करू लागला. त्यानंतर त्या ठिकाणाची महती वाढत गेली. सध्या हे ठिकाण श्री क्षेत्र कुणकेश्वर म्हणून ओळखले जाते. श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. ११ व्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. ११ जुलै १८५० मध्ये मेजर ग्रँट जेकब या मुंबईच्या पॉलिटिक्ल सुपरिटेंडेटने एक ताम्रपट शोधला. श्री देव कुणकेश्वराच्या संदर्भात नागदेव ताम्रपटातील मजकुरामध्ये ‘देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण इंदुल (आताचे हिंदळे गाव) या प्रशस्त गावात आला. तेथील राजाने त्याचा सन्मान केला. नंतर राजाला राजलक्ष्मी प्राप्त होऊन श्री कुणकेश्वराच्या रूपातील भगवान शंकराच्या प्रसादाने पुत्र झाला, असा उल्लेख आहे. मंदिराच्या परिसरात श्री जोगेश्वरीचे छोटे देवालय, श्री देव मंडलिक नावाचे एक शिवालय, श्री नारायण मंदिर, श्री गणेश मंदिर आणि श्री भैरव मंदिर, नारोनिळकंठ ही मंदिरे आहेत. देवालयाच्या दक्षिणेकडे तलावाच्या शेजारी श्री मारुतीचे मंदिर आहे. इ.स. १९२० च्या सुमारास देवळापासुन जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्वकाळापासून कित्येक शतके बुजलेले एका गुहेचे दार मोकळे होऊन आंत कोरीव पाषाणी मूर्ती आढळून आल्या. ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे. पण यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या अलग आहेत. गुहेची खोली तांबडया कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा-काळित्री आहे. हा काळा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कडयांत क्वचित स्थळी सापडतो.या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते. गुहेची खोली सुमारे १० फुट लांब ८ फुट रूंद आणि ६ फुट उंच असून, पाच फुट उंच आणि तीन फुट रूंद असा दरवाजा आहे. आत १८ कोरीव मुखवटे शिवलिंग आणि नंदी मिळून २० नग आहेत. मुखवटयांची मांडणी जोडी जोडीने केलेली आहे. पुरूष व स्त्री अशा ८ जोडया, एक तरूण पुरुषाचा मुखवट स्वतंत्र बसवलेला आहे. तसेच एक पुतळयाची नासधूस झाल्यामुळे तो पुरूषाचा किंवा स्त्रीचा हे नीट ओळ्खता येत नाही. त्यामुळे तो एका बाजुस ठेवला आहे. शिवलिंग आणि नंदी हे देखिल काळ्या दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर तिच्या मध्यभागी पण जरा डाव्या बाजूस ठेविले आहेत. गुहेतील मुर्त्या हया देवतांच्या मुर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरूषांचे ते मुखवटे आहेत. त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे दिसून येते. कौशल्यामध्ये ओबडधोबडपणा कमी असून रेखीव व सुबकपणाकडे कोरण्याकडे चांगलेच लक्ष दिले आहे. पुरूषांच्या आकृती जरा मोठया असून त्या मानाने स्त्रियांच्या लहान आहेत. प्रत्येक जोडप्यास निराळी बसकण आहे. प्रत्येक मुखवटयाला राजास आणि राजघराण्यातील स्त्रीपुरूषांस शोभेल असाच पेहराव केलेला आहे. प्रत्येक मुखवटयास शिरपेच, एका बाजूस तुरा, मोत्यांचे पेड कोरीव कामांत दाखविले आहेत. तसेच महाराष्ट्रीय वळणाची शिरोभूषणे आपणास या मुर्त्यांवर पाहावयास मिळतात. मुळात कोकणात लेणी थोडी आहेत. आणि अशा तऱ्हेचे लेणे तर नाहीच. श्री देव कुणकेश्वर हा आसपासच्या परिसरातील ७२ गावांतील दैवतांचा अधिपती मानला जातो. या शक्तीपिठातून आपले देवत्व वाढवण्यासाठी ७२ खेड्यांतील दैवते शिवरात्रीच्या दिवशी येथे परंपरेने येतात. या वेळी भाविक देवभेटींच्या अपूर्व सोहळ्याचा आनंद लुटतात. हे देव अमावास्येपर्यंत कुणकेश्वर येथे रहातात. या देवांचे भक्तगण समुद्रस्नान करून श्री देव कुणकेश्वराची पूजा करतात. महाशिवरात्रीला येथे प्रचंड यात्रा भरते. कुणकेश्वर गाव पूर्वी या देवास इनाम होते. इंग्रजी अमदानीत ते रद्द होउन वार्षिक रोख रक्कम सरकारकडून नेमण्यात आली आहे. कुणकेश्वरचा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ असून सुरक्षितही आहे. मिठबाव कुणकेश्वर या लांब पसरलेल्या समुद्रकिना-याने चालत जावे. येथे मोठया प्रमाणावर मासेमारी चालते. किना-यावर जमलेल्या कोळयांची मासेमारी पाहावी. धार्मिक आणि सहलीचे ठिकाण अशा दोन्ही महत्त्वामुळे कुणकेश्वर चांगलेच प्रगत झाले आहे. इथे राहण्याची आणि जेवणाची चांगली सोय होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!