रामेश्वर-वेंगुर्ला

प्रकार : मध्ययुगीन शिवमंदीर

जिल्हा : सिंधुदुर्ग

श्री रामेश्वर हे वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत. श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. मंदिराची रचना पुरातन असून मंदिराच्या अंतर्गत केलेले सजावटीचे काम नविन आहे. देवस्थानचा पूर्व इतिहास तसेच रचना यासंबंधी थोंडक्यात माहिती अशी कि शंकर हे आदिदैवत आर्यपूर्व प्राचीन असून ते लिगरुपाने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात स्थापलेले आढळते. त्यावेळी वेंगुर्ल्याचे श्री देव रामेश्वर मंदिर इ. स. १७व्या शतकात स्थापन झाले असावे असा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५५ च्या सुमारास दक्षिण-उत्तर कोकणातला बराच मुलुख काबील केला आणि संगमेश्वरापासून मालवणपर्यंत आपली सत्ता स्थापन केली. त्यावेळी राजापूरची काही ब्राह्मण घराणी कुडाळ येथे स्थायीक झाली. या ब्राह्मणांचे आणि सावंतवाडी खेमसावंत यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. अशाच एका ब्राह्मण कुटुंबातील कै. ग. बा. धामणकर नावाच्या गृहस्थास हे श्री रामेश्वराचे लिग सापडले. ... धामणकर हे वेंगुर्ले व तुळस गावच्या हद्दीतील वडखोलवाडी याठिकाणी जमीन घेऊन शेती करत. तुळस गावाहन एक ओढा येथे वाहत येत होता. या ओढ्यावर बांध घालून त्यांनी तलाव निर्माण केला. या तलावास निशाण तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावाच्या निर्मितीसाठी धामणकर खोदाई करत असतांना ओढ्याच्या खोलगट भागात श्री देव रामेश्वराचे लिग सापडले. श्री. धामणकरांनी हे लिग आपल्या घराजवळ आणून त्याची पूजा अर्चा केली. गावातील गावकर मंडळी व गौड सारस्वत व्यापारी वर्गाची संमती घेऊन या लिगाची स्थापना गावच्या मध्यवर्ती ठिकाणी नागेश्वर-भगवती मंदिरात त्यांनी ३५० वर्षापूर्वी केली. श्री देव नागेश्वराच्या ठिकाणी श्री देव रामेश्वराचे लिग स्थापन करण्यात आले. तर श्री देव नागेश्वर मूळ स्थानापासून उचलून श्री देव रामेश्वराच्या डाव्या बाजूस नंदीसह स्थापन करण्यात आला. श्री देव रामेश्वर मंदिराची रचना - श्री देव रामेश्वर देवालयाच्या गाभाऱ्यात श्री रामेश्वराचे लिग असून लिगासमोर नंदी आहे. गाभाऱ्याच्या बाहेरील उजव्या बाजूस गणपतीची मूर्ती, तीन लिगाकार शिळा व एक नागशिळा आहे. तर डाव्या बाजूस भगवतीची मूर्ती तसेच भगवतीच्या चाळा कुळ पुरुषाची मुर्ती आहे. गाभार्याजच्या डाव्या बाजूस स्वतंत्रपणे नागनाथ देवालय असून यात लिगावर धातूचा नाग विराजमान आहे व समोर नंदी आहे. या देवालयाच्या समोर लहानसे दत्त मंदिर आहे. त्रैमुर्ती दत्ताचे दर्शन व नागनाथाचे दर्शन एकाच प्रदक्षिणेत घडते हे महत्त्वाचे. दत्तमंदिराच्या मागच्या बाजूस औदुंबर वृक्ष आहे. देवालयाच्या गाभाऱ्याच्या बाहेर सभा मंडपात उजव्या बाजूस श्री देव नितकारी तर डाव्या बाजूस असलेल्या लहान मंदिरात मारुती असून मंदिराच्या मागील बाजूस शनिदेव व मारुती आहे. रामेश्वर देवालयाच्या बाजूस स्वतंत्र असे राम-सीता मंदिर आहे. सभा मंडपातील सर्व खांबांवर वेगवेगळ्या देवतांच्या संगमरवरी टाईल्स लावल्या असून आकर्षक असे कोरिव काम केले आहे. देवालयाच्या समोरच्या भागात डावीकडे असलेल्या घुमटीत गारुडेश्वराची मूर्ती आहे तर उजव्या बाजूस तुळशी वृंदावन, दीपमाळा आहेत. मंदिर परिसरात धर्मशाळा असून वरच्या बाजूस नगारखाना आहे. समोरील भागात पिपळाचे झाड असून त्या पारावर दुर्गादेवीचे मंदिर आहे. त्याही पुढे एक मोठा तलाव आहे. आपल्या इच्छापूर्तीसाठी श्री रामेश्वरला दही भात लिपणे, साखरभात लिपणे, महानैवेद्य, अभिषेक अशा प्रकारचे नवस बोलण्याची प्रथा आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!