वेरूळ- मालोजी भोसले समाधी

प्रकार : समाधीस्थळ

जिल्हा : औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व पुर्वज हा मराठी मनाला कायम आकर्षणाचा विषय राहीला आहे. शिवाजी महाराजांच्या वंशजाची माहीती आज बऱ्यापैकी उपलब्ध असली तरी त्यांच्या पूर्वजांविषयी मात्र फारच कमी माहीती उपलब्ध आहे. आज बहुतांशी पर्यटक देवदर्शन व पर्यटनाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ येथील बारा जोतिर्लिंगपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिराला आवर्जुन भेट देतो. पण या मंदीर परीसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची समाधी असल्याचे पर्यटकांना तर सोडा पण मराठी माणसांना देखील माहीती नसते. मराठी माणसांच्या या अनास्थेमुळे आज या सुंदर समाधी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मंदिराजवळ रस्त्यालगत असलेल्या या समाधीकडून हजारो भाविक व पर्यटक ये-जा करतात पण घाण व माहीती अभावी या समाधीकडे कुणी ढुंकून देखील पाहत नाही. या समाधीची माहीती देणारा साधा फलकसुद्धा तेथे लावलेला नाही हि मराठी माणसासाठी लाजिरवाणी बाब आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण इतिहासप्रेमी व दुर्गप्रेमिनी मात्र तेथे पोहोचायलाच हवे. वेरूळ हे ठिकाण औरंगाबाद शहरापासुन ३० कि.मी.अंतरावर असुन जागतिक पर्यटनातील महत्वाचे ठिकाण असल्याने तेथे जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. ... मालोजीराजे भोसले यांची समाधी मंदिराच्या आवारातच असल्याने तेथे जाण्यासाठी फारशी शोधाशोध करावी लागत नाही. चौकोनी २० x २० फुट आकाराच्या पाच फुट उंच चौथऱ्यावर असलेली हि समाधी पुर्णपणे घडीव व नक्षीदार दगडात बांधलेली असुन या समाधीच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात मुस्लीम वास्तुशैलीचा प्रभाव जाणवतो. समाधी वास्तुच्या दर्शनी भागात माथ्यावर चार दगडी मिनार बांधलेले असुन वास्तूच्या मागील बाजुस देखील असेच चार मिनार बांधलेले आहेत. या वास्तुच्या आत मध्यवर्ती भागात एक दगडी चौथरा असुन माथ्यावर गोलाकार घुमट बांधलेला आहे. प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजुस दगडात कोरलेल्या जाळीदार खिडक्या बसवलेल्या असुन दरवाजाच्या वरील बाजूस तसेच इतरत्र मोठ्या प्रमाणात कमळे कोरलेली आहेत. समाधीच्या मागील बाजूच्या भिंतीत मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणे दिसणारा दगडी दरवाजा कोरलेला आहे. या दरवाजा शेजारी देखील मुख्य दरवाजा प्रमाणे दोन जाळीदार खिडक्या कोरलेल्या आहेत. समाधी वास्तुवर मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले असुन त्यासाठी वापरलेल्या दगडाची आता मोठ्या प्रमाणात झीज होत आहे. समाधी स्थानाचा गैरवापर होऊ नये यासाठी या वास्तुच्या दरवाजाला टाळे लावलेले असते पण मंदीर प्रशासनास विनंती केल्यास त्याची चावी मिळते. समाधी स्थान पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. वेरुळचे पाटील बाबाजी भोसले यांची मालोजी व विठोजी हि दोन्ही मुले आपल्या पराक्रमामुळे निजामशहाच्या दरबारातील मानाचे सरदार बनली. मालोजीराजे यांना शहाजी व शरीफजी असे दोन पुत्र होते. मालोजीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर मंदिराचा जीर्णोद्धार केला व या दुष्काळी भागात मोठा तलाव बांधला. इंदापुर येथे झालेल्या लढाईत मालोजीराजे भोसले यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात इंदापुर येथे एक व वेरूळ येथे एक अशा त्यांच्या दोन समाधी बांधण्यात आल्या. त्यातील इंदापुर येथील त्यांची समाधी आज पूर्णपणे नष्ट झाली असुन वेरूळ येथी समाधी आजही शिल्लक आहे. वेरूळ येथे घृष्णेश्वराच्या दर्शनास गेले असता शिवछत्रपती यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या या समाधीस आवर्जुन भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!