आंबवडे-पंतसचीव समाधी

प्रकार : समाधीस्थळ

जिल्हा : पुणे

पुण्याजवळ असलेल्या भोर परीसरात एक दिवसाच्या भटकंतीसाठी आंबवडे नावाचे निसर्गरम्य गाव आहे. या गावाला केवळ निसर्गाचे वरदान लाभलेले नसुन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गावात कान्होजी जेधे, जिवा महाला व भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. याशिवाय आंबवडे गावातील ओढ्याच्या काठावर दाट झाडीत नागेश्वराचे पुरातन मंदिर असुन तेथे जाण्यासाठी ओढयावर झुलता पुल बांधला आहे. आंबवडे गाव पुण्याहुन कापुरहोळमार्गे ६० कि.मी. तर भोर या तालुक्याच्या ठिकाणावरून १२ कि.मी.अंतरावर आहे. भोरवरून आंबवडे गावात येण्यासाठी एसटीची चांगली सोय आहे. आंबवडे हे हिरडस मावळात असलेले भोरचे संस्थानिक पंतसचिव यांचे गाव. आंबवडे गावातुन वाहणारा ओढा म्हणजे एक लहान नदीच आहे. हि नदी पार करण्यासाठी १९३६ साली या नदीपात्रावर झुलता पुल बांधला गेला. याची रुंदी ४ फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे. ... पुलाच्या दोन्ही बाजुस कमानी असून या कमानीवर पुलाच्या बांधकामाचे तपशील सांगणारे लेख आहेत. हा झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित पंतसचिव यांनी आपली आई श्रीमंत जिजीसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला. झुलता पुल पार केल्यावर पलीकडील बाजुस असलेल्या एका इमारतीत भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. या समाधीशेजारीच संस्थानच्या राणीसाहेब जिजीसाहेब यांचा अर्धपुतळा आहे. सध्या या इमारतीत शाळा भरवली जात असल्याने सुट्टीच्या दिवशी हि इमारत बंद असते पण जाळीमधून आपण या समाधीचे दर्शन घेऊ शकतो. या इमारतीच्या मागील आवारात झाडाखाली काही कोरीव मुर्ती व विरगळ तसेच सतीशिळा पहायला मिळतात. येथील गर्द झाडीतून पायऱ्यांच्या वाटेने खाली उतरत गेल्यावर खोलगट भागात नागेश्वर मंदिराचे आवार आहे. आंबवडे गावातुन वहाणाऱ्या या ओढयात मंदिरासमोर धबधब्याप्रमाणे अनेक खळगे आहेत. शिवकाळातील या मंदिराभोवती फरसबंदी अंगण असून एका उंच चौथऱ्यावर पश्चिमाभिमुख मंदीर बांधलेले आहे. मंदिराच्या दर्शनी भागावर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे. मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी केलेली असून मंदिराच्या आतबाहेर मोठया प्रमाणात शिल्पकाम केलेले आहे. संपुर्ण मंदिर घडीव दगडात बांधलेले असून शिखर मात्र विटांनी बांधुन त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. मंदिराच्या आवारात दिपमाळ असून काही लहान घुमटी आहेत. या घुमटीत काही प्राचीन मुर्ती आहेत. मंदिराच्या आवारात मोठया प्रमाणात झीज झालेल्या प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. मंदिरासमोर ओवऱ्या बांधलेल्या असुन त्याच्या समोर बारमाही वहाणारा झरा आहे. या झऱ्याचे पाणी गोमुखातून एका कुंडात पडते. मंदिराचा परीसर अतिशय रमणीय आहे. शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या कारकीर्दीची सुरवात मोरोपंत पिंगळे यांच्याकडे कारकुन म्हणुन झाली. मोरोपंतांनंतर शंकराजीनी रामचंद्रपंतांकडे उमेदवारी केली व याच काळात त्यांना कर्तृत्वाची संधी मिळाली. संभाजी राजांच्या धामधुमीच्या काळात शंकराजी हे रामचंद्रपंतांच्या अखत्यारीत राजाज्ञा म्हणुन काम पहात होते. राजाज्ञा म्हणजे छत्रपतींची हुजुरात खाजगी फौज व खाजगी कारभार यावर देखरेख ठेवणारी व्यक्ती. शंकराजीपंत राजाज्ञा असेपर्यंत त्यांचा कारभार हा रामचंद्रपंतांच्या अनुज्ञेने चालत असे. जिंजीस जाताना राजाराम महाराजांनी महाराष्ट्राचा कारभार रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी यांच्याकडे सोपवला. रामचंद्रपंतांना सर्वाधिकारी नेमुन शंकराजी नारायण यांना त्यांच्यासोबत ठेवले व संताजी-धनाजीस लष्करासह नेमून दिले. मराठेशाही नष्ट करण्यास आलेल्या औरंगजेबास रामचंद्रपंत - शंकराजी नारायण यांचा मुत्सद्दीपणा व संताजी - धनाजी यांचा गनिमीकावा याने चांगलेच झुंजवले. या काळात पुरंदरचा कोळ्यांचा दंगा मिटवणे, जुन्नरची व्यवस्था लावणे, जिंजीची चौकी मारून इस्माईल खानास पकडणे, धनाजी जाधवांसोबत पन्हाळ्याचा वेढा उठवणे, राजाराम महाराजांशी भांडुन आलेल्या सेनानी संताजी घोरपडे यांची समजूत घालणे अशा अनेक महत्वाच्या कामगिऱ्या शंकराजी नारायण पार पाडल्या. जिंजीहून परत आल्यावर राजाराम महाराजानी शंकराजी नारायण मदार उल महाम म्हणजे दौलतीचे आधारस्तंभ अशी पदवी देऊन त्यांचा गौरव केला. इ.स. १७०७ साली छत्रपती शाहु महाराज मुघल छावणीतून सुटल्यानंतर शाहू व ताराबाई यांच्यात गृहयुद्ध सुरू झाले. या गृहयुद्धात नेमका कोणाचा पक्ष घ्यावा या पेचात अडकलेल्या शंकराजींनी अखेर नोव्हेंबर १७०७ मध्ये अंबावडे येथे नागनाथ मंदिराजवळ आत्महत्या करून मार्ग काढला. आंबवडे परिसराची भटकंती करताना स्वराज्यासाठी खस्ता खाणाऱ्या शंकराजी नारायण पंतसचीव यांच्या समाधीला भेट देऊन आपली भटकंती परिपुर्ण करावी. पंतसचीव यांची समाधी पाहुन गावाबाहेर असलेली कान्होजी जेधे व जिवा महाला यांची समाधी पहाता येते. आंबवडे भेटीत आपल्याला कान्होजी जेधे यांचा कारी येथे असलेला वाडा देखील पहाता येतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!