भारताचे प्रवेशद्वार

प्रकार : स्मारक

जिल्हा : मुंबई

श्रेणी : सोपी

मुंबई शहरात ब्रिटिशांनी उभारलेल्या अनेक वास्तुपैकी महत्वाची एक वास्तु म्हणजे गेट वे ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार !! २० व्या शतकात इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ सालच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ मुंबईत अपोलो बंदर येथे हि वास्तु उभारण्यात आली. राजे जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी त्यावेळी अपोलो बंदरावर राजेशाही थाटाचा तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता. सकाळी दहा वाजता मेरिना जहाजाने त्यांचे बंदरात आगमन झाले. राजा जॉर्ज व राणीचे आगमन झाल्यावर त्यांना लष्कराची मानवंदना देण्यात आली. यानंतर बग्गीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. शाही मिरवणूक निघणार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती. मेरिना बोटीवरच या शाही दांपत्याचा तीन दिवस मुक्काम होता. शहरातील भेटीनंतर ते दिल्ली व कलकत्त्यासाठी रवाना झाले. दहा जानेवारीला ते मुंबईत परतले व गेटवे ऑफ इंडिया येथूनच भारताचा निरोप घेऊन समुद्रमार्गे इंग्लंडला परतले. या भेटीच्या स्मृती कायम स्वरूपी जपण्यासाठी स्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली. जॉर्ज विट्टे या वास्तुविशारदाच्या कल्पनेतून साकार झालेली ती वास्तु म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया. ... गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी ३१ मार्च १९११ मध्ये झाली पण त्याची अंतिम रचना १९१४ साली मंजूर झाली व स्मारकाचे बांधकाम पुर्ण होण्यास १९२४ साल उजाडले. या वास्तूच्या उभारणीसाठी अकरा वर्ष लागले. सोळाव्या शतकातील इंडो- सारसेनिक शैलीत बांधलेले गेटवे ऑफ इंडिया म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हि वास्तु म्हणजे २६ मीटर (८५ फूट) उंच कमान असुन पिवळ्या बेसाल्ट दगडात ह्या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी लागणारा दगड ठाणे जिल्ह्यातील खरोदी खाणीतून काढण्यात आला होता. या वास्तूचा आकार आयताकार असुन वास्तूवरील घुमट व सज्जे कॉंक्रीटचे आहेत. वास्तुची लांबी समुद्राला समांतर असून या वास्तुच्या मध्यभागी भव्य कमानयुक्त दरवाजा व त्याशेजारी दोन लहान दरवाजे अशी याची रचना आहे. वास्तुच्या समोरासमोरील दोन बाजु एकसमान आहेत. या वास्तुच्या परिसरात बोटी बांधण्यासाठी उलट पुरलेल्या तीन तोफा पहायला मिळतात. येथे उभे राहून दूरवर पसरलेला समुद्र व बंदरावर माल उतरवून घेण्यासाठी उभी असलेली देश विदेशातील जहाजे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. मुंबई शहराचा मानबिंदू असलेली ही ऐतिहासिक वास्तू आजही मोठया दिमाखात उभी असुन शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. चर्चगेट किंवा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून मुंबईचे वास्तुसौंदर्य पहात चालत अथवा बसने तेथे पोहोचता येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!