उंबरखिंड

प्रकार : स्मारक/ रणक्षेत्र

जिल्हा : रायगड/पुणे

श्रेणी : सोपी/मध्यम

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात ज्या काही लढाया लढल्या त्यातील एक महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंड लढाई. पुणे-रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या ठिकाणावर शिवरायांनी कमी सैन्यामध्ये (साधारण १०००) मोठया सेनेचा (साधारण २००००) केलेला पराभव त्यांच्या रचनाबद्ध व धाडसी रणनीतीचा परिचय करून देतो. खिंड म्हटले की आपल्याला आठवते ती दोन डोंगरामधील अरुंद जागा अथवा घळ. पण प्रत्यक्षात उंबरखिंड येथे असे कोणतेही ठिकाण नसुन या ठिकाणी घाटावरून खाली कोकणात उतरणाऱ्या अरुंद व निसरड्या पायवाटेलाच खिंड म्हणुन संबोधले आहे. उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी तिची भौगोलिक रचना जाणून घेणे महत्त्वाचे आहे. घाटावरील लोणावळा येथुन कोकणातील उंबरे गावापर्यंत जाण्यासाठी कुरवंडे येथुन एक घाटवाट खाली उतरते. या घाटवाटेने लोणावळ्याकडून येताना सह्याद्रीचा २००० फुट उंचीचा तीव्र उतार उतरून आपण चावणी गावापाशी येतो. ... चावणी गावाकडून वहाणारा अंबा नदीचा प्रवाह ठाकूरवाडीपर्यंत जाती. चावणी ते ठाकूरवाडी या दरम्यान असलेली चिंचोळी पायवाट अंबानदी शेजारुन दाट जंगलातून जाते. या वाटेच्या दोन्ही बाजुस असलेल्या टेकड्यामुळे या वाटेची रचना एखादया नळीसारखी झाली आहे. या नळीतुन बाहेर पडण्याचे टोक म्हणजे ठाकूरवाडीची टेकडी. या टेकडीखालीच अंबा नदी उजवीकडे वळण घेते. या नळीच्या मागील बाजुस असलेला सह्याद्रीचा उभा चढ, वाटेच्या दोन्ही बाजुस असलेल्या टेकड्या व अंबा नदीचे पात्र व पुढील ठाकूरवाडीच्या टेकडीचे बूच यामुळे या नळीत शिरलेल्या सैन्याच्या हालचालीवर मर्यादा येतात. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मुघलांच्या मोठ्या फौजेचा कमी सैन्याने व कमी वेळात संपूर्ण सपशेल पराभव केला. येथे मोठया प्रमाणात असलेली उंबराची झाडे व जवळच असलेले उंबरे गाव यामुळे या जागेला उंबरखिंड नाव पडले असावे. आपल्याला केवळ उंबरखिंड येथील स्मारक पहायचे असल्यास खाजगी वहानाने थेट या स्मारकापर्यंत जाता येते. पण घाटवाटेची भटकंती करायची असल्यास या वाटेने खाली उतरण्यासाठी लोणावळ्याजवळ ४ कि.मी.अंतरावर असलेले कुरवंडे गाव गाठावे लागते. घाटावरील कुरवंडे गाव ते कोकणातील उंबरखिंड हि भटकंती साधारण ५ तासांची असल्याने पाण्याचा पुरेसा साठा सोबत ठेवावा. घाटावरील कुरवंडे गावातुन दोन पायवाटा खाली कोकणात उतरतात व पुढे उंबरखिंड भागात एकत्र येतात. यातील नेमक्या कोणत्या वाटेचा वापर महाराजांनी केला हे सांगणे जरी कठीण असले तरी आंबेनळी पायवाटेवर प्राचीन घाटमार्गाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या,पाण्याच्या टाक्या, घडीव दगडात बांधलेला तलाव यासारख्या खुणा दिसून येतात. कुरवंडे गावातुन खाली उतरणारी वाट जरी मळलेली असली तरी या वाटेला काही ठिकाणी फाटे असल्याने गावातुन वाट व या वाटेवरील खुणा नीट समजुन घ्याव्यात. या वाटेने साधारण अर्धा तास चालल्यावर पहिला फाटा लागतो. येथुन उजवीकडे चढत जाणारी वाट नागफणीला जाते तर डावीकडे उतरणारा रस्ता उंबरखिंडीच्या दिशेने जातो. नागफणी सुळक्याच्या पायथ्याशी उगम पावणारी अंबा नदी गारमाळ डोंगरातुन उंबरखिंडीत व पुढे नागोठणेच्या खाडीत मिळते. नागफणीला जायचे असल्यास जाऊन येण्यासाठी साधारण दीड तास लातो. उंबरखिंडीच्या या वाटेने खाली उतरायला सुरवात केल्यावर नौदलाचा तळ असलेले आय एन एस शिवाजीचे लोखंडी तारांचे कुंपण लागते. या कुंपणामुळे मुळ वाट मोडलेले असुन या कुंपणाला लागुनच नवीन वाट खाली उतरते. या वाटेशेजारी उजव्या बाजूला गेल कंपनीची पाईप लाईन असल्याने काही ठिकाणी त्यावर असलेले पिवळ्या रंगाचे फलक दिसून येतात. या पाईप लाईनमुळे काही ठिकाणी या पायवाटेचे रुपांतर कच्या रस्त्यात झाले आहे. या वाटेने थोडे पुढे आल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात व उजवीकडील वाटेने कोकणात उतरणाऱ्या वाटेची उतरण सुरु होते. हि वाट काही प्रमाणात निसरडी असल्याने थोडे सांभाळतच उतरावे लागते. या उतरणीला लागण्यावर अंबा नदीचे पात्र व चावणी गाव दिसू लागते. दिसायला सुरवात होते. या वाटेवर सतत गेल कंपनीचे फलक दिसत असल्याने वाट चुकण्याची फारशी शक्यता नाही. कुरवंडे गावातुन निघाल्यापासुन नागफणी न केल्यास साधारण दोन तासात आपण घाटवाटेच्या पायथ्याशी पोहोचतो. येथुन साधारण अर्ध्या तासाच्या चालीनंतर एक ओढा पार करून आपण छावणी गावात पोहोचतो. छावणी गावातुन सुरु होणाऱ्या कच्चा रस्त्याने अर्ध्या तासात आपण उंबरखिंड स्मारकाजवळ पोहोचतो. येथे रस्त्यावर समरभूमी उंबरखिंड असा फलक लावलेला आहे. येथे अंबानदी पात्रात खडकाच्या सपाटीवर उंबरखिंडीच्या लढाईची जाणीव करून देणारे अतिशय समर्पक व सुंदर स्मारक उभारलेले आहे. ४० फूट उंचीचे हे स्मारक 'शिवदुर्ग मित्र, लोणावळा ' ह्या संस्थेने २००१ साली उभारलेले असुन २ फेब्रुवारी २००७ रोजी उंबरखिंड विजयदिनाच्या मुहूर्तावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. उंबरखिंडीत एका चौथऱ्यावर दगडी स्तंभ उभारलेला त्यावर एका बाजूला महाराजांचे आज्ञापत्र, दुसऱ्या बाजूला त्यांचा शस्त्रसज्ज अश्वारूढ पुतळा तर तिसऱ्या बाजूस उंबरखिंडीचा इतिहास लिहिला आहे. चौथ्या बाजुस उद्घाटनाची कोनशिला बसवली आहे. दगडी स्तंभाच्या वरील बाजुस ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ याच्या लोखंडी प्रतिकृती आहेत. शिवरायांवर आणि सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्या दुर्गप्रेमिनी एकदा तरी उंबरखिंडीत जाऊन या स्मारकाला अभिवादन करायला हवे. येथुन पाली-खोपोली मुख्य रस्ता साधारण ४ कि.मी. अंतरावर असुन नशीब बलवत्तर असल्यास एखादे वाहन मिळते अन्यथा पायगाडीनेच हे अंतर पार करावे लागते. औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याने पुण्याहून स्वराज्यातील कोकणपट्टी व आरमार काबीज करण्यासाठी उझबेग सरदार कारतलबखान व रायबागन यांना साधारण २०-३० हजार फौजेनिशी कोकणावर पाठवले. ह्या प्रचंड फौजेस लोणावळ्या नजीकच्या आंबेनळीच्या घाटात २ फेब्रुवारी १६६१ रोजी एका बाजूने स्वत: शिवाजी महाराज व दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर यांनी मुठभर मावळ्यासह धुळीस मिळवले. यात मुघल सैन्याचा पूर्ण पराभव होऊन शरणागती पत्करल्यावर खंडणी घेऊन त्यांना सोडण्यात आले. या युद्धात शिवाजी महाराज स्वतः हजर असल्याने हे युद्ध मराठा इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. महाराजांच्या गनिमी काव्याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे हा रणसंग्राम. युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेतोजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुरच्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले. पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स.१७८१) इंग्रज बोरघाटाऐवजी कुरवंडे घाटाच्या मार्गाने घाटमाथ्यावर येऊ नये म्हणून पेशव्यांचे सरदार हरीपंत फडके हे उंबरखिंडीत सैन्यासह पहारा देत होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!