लेणी
संपुर्ण भारतात कातळात कोरलेली साधारण १२०० लेणी असुन त्यांतील हजारपेक्षा जास्त लेणी महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात जैन, बौद्ध आणि वैदिक (हिंदू) अशा विविध धर्मपंथीयांनी कोरलेली असुन त्यांत बौद्ध धर्मीयांच्या लेण्यांची संख्या सर्वाधिक आहे. डोंगरातील कातळ कोरून तयार केलेली गुहा वा प्रस्तरालय म्हणजे लेणी. मुंबई-नाशिक महामार्गावर अंबडजवळ असलेल्या पांडव लेण्यातील शिलालेखात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला आहे. ‘एतच लेण महादेवी महाराज मातामहाराज पतामही ददाति, ‘लेण’ हा शब्द संस्कृत ‘लयन’ म्हणजे ‘गृह’ या शब्दावरून आला आहे. लेण्यांना गुहा, गुंफा, शैलगृहे, शिलामंदिरे, प्रस्तरालये अशी अन्य नावेही आहेत. लेणी ही संज्ञा साधारणपणे मानवनिर्मित गुहांना वापरली जाते. अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य बऱ्याच वेळा नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या गुहामधुन होत असे. प्राचीन लेण्यांत विशेषतः प्रागैतिहासिक लेण्यांत प्रामुख्याने प्राण्यांची चित्रे असून ती शिकार या तत्कालीन प्रमुख जीवनव्यवसायाशी निगडित असावीत.
...
प्रारंभीच्या काळात खोदलेली लेणी हि डोंगरांच्या पायथ्याशी असुन ती साधी, लहान व ओबडधोबड अशी होती. नंतरच्या काळातील लेणी हि डोंगराच्या वरील भागात कोरलेली असुन अखेरच्या टप्प्यातील लेणी हि डोंगराच्या माथ्यावर कोरलेली आहेत. ह्या लेण्यांवरून प्राचीन काळी स्थापत्यकला कशी प्रगत होत गेली ते समजते. लेणी खोदण्याचे तंत्र वेरूळ येथील लेण्यांच्या अभ्यासावरून समजण्यात आले. दगडाचा प्रत्येक भाग छिन्नीने तासुन तो कातळापासून वेगळा करण्यात येई. भारतातील प्राचीन मंदिरे व चैत्यगृहे लाकडाची असल्याने त्यांचेच अनुकरण सुरुवातीच्या लेण्यांमधुन दिसुन येते. स्थापत्याप्रमाणे शिल्पकला व चित्रकला कशी प्रगत झाली हे या लेण्यांतील शिल्पांवरून व चित्रांवरून समजते. या शिल्प-चित्रांमध्ये असलेले कपडे,अलंकार व केशरचना पहाता काळानुसार पेहरावात कसे बदल घडत गेले ते जाणवते. महाराष्ट्रातील स्त्रिया कोणते अलंकार व वस्त्रे वापरीत याची तपशीलवार माहिती या शिल्पांमधुन दिसुन येते. ही लेणी कोणत्याही धर्माची असली तरी लेण्यांचे ऐहिक व धार्मिक असे प्रमुख दोन प्रकार आहेत. यातील ऐहिक लेणी फारच थोडी असुन धार्मिक प्रसार-प्रचार हा प्रमुख हेतु या लेण्यांतुन दिसुन येतो. या लेण्यांचा काळ इ.स.पु. तिसरे शतक ते इ स. नववे शतक असा मानला जातो. भारतात मौर्यकालात सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत (इ.स.पु. २७३-२३२) बौद्ध लेणी खोदण्यास प्रारंभ झाला असावा असे त्या लेण्यांतील शिलालेखावरून दिसुन येते. वेरूळसारख्या ठिकाणी बौद्ध, जैन व हिंदू असे गुफांचे तीन स्वतंत्र समूह आढळतात. भारतात खोदलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध लेण्यांइतकी वैदिक वा हिंदू लेणी प्राचीन नाहीत. बौद्ध लेण्यांमध्ये चैत्य व विहार अशी दोन दालने असतात तर जैन लेण्यांमध्ये केवळ विहार दिसून येतात.वैदिक लेणी बहुतांशी देवालय-प्रासादाच्या स्वरूपातच दिसुन येतात. हि लेणी प्रामुख्याने वेरूळ, जोगेश्वरी, मंडपेश्वर, पाताळेश्वर, आंबेजोगाई, घारापुरी या ठिकाणी आढळतात. या सर्वांत कलात्मकतेच्या दृष्टीने वेरूळ येथील लेणी विशेष लक्षणीय असुन त्यांतील काही लेणी बौद्ध विहाराप्रमाणे कोरलेली आहेत. यांत शैव, वैष्णव पंथांशी संबंधित अनेक शिल्पे आहेत. वेरूळ येथील कैलास लेण्याचा अद्वितीय शैलमंदिर म्हणून उल्लेख केला जातो. हे शिवमंदिर अखंड खडकातून सभोवतालच्या ओवऱ्यांसह खोदून काढलेले आहे. घारापुरी येथे पाच हिंदू लेण्यांचा समूह असून ही लेणी राष्ट्रकूटांच्या वेळी इ.स. आठव्या-नवव्या शतकांत खोदली असावीत. या लेण्यांतील बहुतेक सर्व शिल्पे शिवाच्या जीवनाशी निगडित असून या शैवलेणीत त्रिमूर्ती शिल्प आणि कल्याणसुंदरमूर्ती हि अतिशय सुंदर शिल्पे आहेत. हिंदू लेण्यांप्रमाणेच जैन लेण्यांचे प्रमाण महाराष्ट्रात कमी असुन ही लेणी प्रामुख्याने चांदवड, अंकाई-टंकाई , आंबेजोगाई, धाराशिव, वेरूळ या ठिकाणी दिसून येतात. अंकाई-टंकाई व चांदवड येथे कोरीव काम केलेली जैन लेणी असुन चांदवड येथील लेणी सध्या भग्नावस्थेत आहेत. धाराशिवची जैन लेणी इ.स. ५० ते ५०० य काळात कोरलेली असुन येथील पार्श्वनाथ तीर्थंकरांच्या भव्य प्रतिमा प्रसिद्ध आहेत. वेरूळ येथे आठव्या-नवव्या शतकात कोरलेली इंद्रसभा व जगन्नाथसभा हि जैन लेणी स्थापत्य व शिल्पकला यासाठी प्रसिद्ध आहेत. बौद्ध लेणी हि मुख्यतः हीनयान व महायान या दोन पंथांनी खोदविली असुन त्यांच्यातील फरक स्पष्टपणे दिसुन येतो. सुरुवातीच्या कालखंडात हीनयान पंथांनी खोदलेली लेणी भाजे, कोंडाणे, पितळखोरे, अजिंठा, बेडसे, कार्ले, नासिक या ठिकाणी असुन महायान पंथाची शिल्पशैली असलेली लेणी अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, कान्हेरी, पन्हाळे-काजी या ठिकाणी दिसून येतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्माच्या प्रसारास सुरवात झाल्यावर येथील भिक्षूंची संख्या वाढू लागली व त्यांच्या राहण्याकरिता विहार, धर्मोपदेशाकरिता चैत्यगृहे आणि पूजेसाठी स्तूप डोंगररांगेत कोरण्यात आले. महाराष्ट्रातील लेण्यात असलेल्या शिलालेखावरून हि गोष्ट स्पष्ट होते.वास्तुशास्त्रदृष्ट्या बौद्ध लेण्यांचे स्तूप, विहार व चैत्यगृह असे तीन भाग पडतात. स्तूप म्हणजे पूज्य व्यक्तीच्या अवशेषांवर दगड, माती, विटा यांनी बांधलेली किंवा खडकात खोदलेली अर्धगोलाकार वास्तु. या वास्तुलाच डागोबा किंवा चैत्य म्हणुन संबोधले जाते. हीनयान पंथीयांनी सुरवातीच्या काळात उभारलेले स्तूप ओबडधोबड व साधे असून महायान पंथीयांनी चैत्यगृहातील या स्तूपाला शिल्पांनी अलंकृत करत त्यावर बुद्धमुर्ती कोरण्यास सुरवात केली. या स्तूपावर हर्मिका असून तीवर एकावर एक अशी तीन छत्रे उभारली जात असत. विहार ही बौद्ध भिक्षूंना निवासासाठी बांधलेली वास्तू असून सुरुवातीस तिच्यात एकच दालन व त्यापुढे व्हरांडा असे. भिक्षूंची संख्या वाढत गेल्यावर त्याचा विस्तार होऊन त्यात आणखी दालनांची भर पडली व मोठमोठे मंडप कोरण्यात येऊ लागले. या मंडपांना आकारानुसार काही अंतरावर समांतर असे स्तंभ कोरण्यात येऊ लागले व मंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींत खोल्या काढण्यात आल्या. या स्तंभांना विविध प्रकारच्या नक्षी काढुन सजवण्यास सुरवात झाली. कार्ले, नासिक, अजिंठा व वेरूळ येथील मंडपांचे स्तंभ अलंकृत केलेले असुन त्यात बोधिवृक्ष, चक्र, पादुका यासारख्या प्रतीकात्मक चिन्हांनी बुद्धाचे अस्तित्व सूचित केले आहे. महायान पंथाच्या उदयानंतर मुर्तीशिल्पाला महत्त्व प्राप्त झाले व या विहारात बुद्धचरित्रातील जातककथा कोरण्यात आल्या. या शिल्पकलेतुन बुद्धाच्या वज्रपाणी, पद्मपाणी यांसारख्या मुर्ती आकारास आल्या. चैत्यगृहे हि विहारांच्या आसपास व भिक्षूंना प्रार्थनेसाठी सोयीची ठरावी अशा ठिकाणी खोदली गेली. सुरुवातीची चैत्यगृहे चौकोनी, आयताकार असून त्यांच्या प्रवेशद्वारासमोरील भिंतीत चैत्य वा स्तूप कोरलेला असे. पुढे या भिंतींना अर्धवर्तुळाकार करत चैत्यगृहाच्या आकारानुसार स्तंभांना भिंतींशी समांतर कोरण्यात येऊ लागले तसेच चैत्य किंवा स्तूप मागील भिंतीपासून पुढे आणून प्रदक्षिणापथ कोरण्यास सुरवात झाली. चैत्यगृहात प्रकाश यावा यासाठी दर्शनी भिंतीवर जाळीसहित मोठी खिडकी-चैत्यगवाक्ष कोरण्यास सुरवात झाली.गौतम बुद्धाला अश्वत्थ वृक्षाखाली (बोधिवृक्ष) ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून या चैत्यगवाक्षाचा आकार अश्वत्थ पानासारखा कोरलेला आहे. विहार व चैत्यगृहांजवळ भिक्षुंकरिता पाण्याची टाकी खोदली जाई. त्यास ‘पोढी’ म्हणत. हा विहार व चैत्य लेण्यांप्रमाणे ही टाकीसुद्धा भिक्षुसंघास अर्पण करण्याची पद्धत होती. प्रत्येक बौद्ध लेण्यात ते कोणी कोरले ह्याचा निर्देश केला जात असे. महाराष्ट्रातील पर्वतश्रेणीत लेणी कोरून घेऊन भिक्षुसंघास अर्पण करण्याकरिता देशातून दूरवरचे लोक येत. उदा., कान्हेरी येथील स्तूप गौतमबुद्धाचा शिष्य सारिपुत्र याच्या स्मरणार्थ सिंध प्रांतातून आलेल्या बुद्धरूचीने बांधला होता. तसेच कार्ल्याचे चैत्य लेणे, वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने कोरविले होते असा उल्लेख मिळतो. वैजयंती ही कर्नाटकातील सध्याची वनवासी ही नगरी होय. महाराष्ट्रातील भाजे येथील लेण्यातील लेखावरून ते अशोकाच्या काळात खोदण्यास सुरुवात झाल्याचे दिसुन येते. गुप्त-वाकाटक काळात खोदलेल्या कान्हेरी, अजिंठा, वेरूळ इ. लेण्यांतील शिलालेखात प्राकृत ऐवजी संस्कृत भाषेचा वापर केला गेला. या लेण्यांतील लेखांवरून तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो. लेण्यांतील अनेक लेखांत राजे व त्यांच्या कारकीर्दीचे उल्लेख येतात. त्यांवरून राजकीय घडामोडी आणि तत्कालीन आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. पुराणांतून गौतमीपुत्र पुळुमावी, यज्ञश्री सातकर्णी यांची नावे ज्ञात आहेत पण नहपान, ॠषभदत्त वगैरे क्षत्रपांची व त्यांच्या कुटुंबियांची नावे लेण्यांतील लेखांमुळेच ज्ञात झाली. लेण्यांतील लेखांत अनेक धंद्यांचा व त्यांच्या श्रेणींचा उल्लेख येतो. पन्हाळे-काजी येथे सापडलेल्या महाचंडरोषणाच्या मुर्तीवरून वज्रयान या तांत्रिक बौद्ध पंथाविषयी माहिती मिळते.
© Suresh Nimbalkar