आंबिवली

प्रकार : बौद्ध लेणी

जिल्हा : रायगड

मुंबई पुण्याजवळ एक दिवसाच्या भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत. यातील कर्जतजवळ असलेला पेठचा किल्ला म्हणजे कोथळीगड तर अनेकांना माहित आहे पण याच्या पायथ्याच्या आंबिवली गावाजवळ असलेली लेणी तशी फारशी कोणाच्या परिचयाची नाहीत. आंबिवली गावाच्या नावाने ओळखली जाणारी हि लेणी गावात मात्र पांडवलेणी म्हणुन ओळखली जातात. कोथळीगडच्या भटकंतीत थोडा वेळ काढुन हि लेणी सहजपणे पहाता येतात. आंबिवली गाव कर्जतहून कशेळेमार्गे २४ कि.मी.अंतरावर असुन येथे जाण्यासाठी बस तसेच खाजगी वाहनांची चांगली सोय आहे. आंबिवली गावातुन टेंभरे गावाकडे जाताना बरोब्बर १ कि.मी.अंतरावर या लेण्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. मुख्य रस्त्यावर लेण्याची वाट दर्शविणारा कोणताही फलक नसल्याने गावातुन या वाटेची नीट चौकशी करून घ्यावी. मुख्य रस्त्यावरून नव्याने बांधलेल्या सिमेंटच्या पायवाटेने लेण्याकडे जाण्यासाठी ५ मिनिटे पुरेशी होतात. ... चिल्हार नदीकाठावर असलेली हि लेणी तिसऱ्या ते चौथ्या शतकात कोरलेली बौद्धलेणी आहेत. येथे केवळ एकच लेणे असुन लेण्याच्या दर्शनी भागात चार कोरीव खांब आहेत. यातील एका खांबावर ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे पण झीज झाल्याने तो वाचता येत नाही. या खांबाखाली असलेल्या शिल्पांची मोठया प्रमाणात झीज झाली आहे. लेण्याच्या उजव्या बाजुस थोडे उंचावर कातळात कोरलेले एक टाके असुन त्यात पिण्यायोग्य पाणी आहे पण ते केवळ एप्रिल महिन्यापर्यंतच असते. त्याच्या पुढे दोन अर्धवट कोरलेली टाकी आहेत. लेण्यात प्रवेश केल्यावर आतील बाजुस ओसरी असुन आत जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दरवाजाच्या आतील भागात ४० x ४० फुट लांबीरुंदी व ९ फुट उंच आकाराचे सभागृह असुन याच्या उजवीकडे, डावीकडे व समोर प्रत्येकी चार असे एकुण बारा विहार आहेत. समोरच दर्शनी भागात असलेल्या चार विहारात कोरीव स्तंभ असुन त्यावर लक्ष्मी नारायण, मारूती, राधा-कृष्ण, गणपती यांच्या मूर्ती आहेत. सर्व विहाराच्या दरवाजांना लाकडी चौकटीसाठी खोबणी आहेत. लेण्याच्या समोरील बाजुस प्रशस्त पटांगण असुन येथुन चिल्हार नदीचे पात्र दूरवर नजरेस पडते. उन्हाळा वगळता हा संपुर्ण परिसर अतिशय रमणीय असुन पावसाळ्यात येथे मोठया प्रमाणात गर्दी असते. लेणी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!