हडसर

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ३७२७ फुट

श्रेणी : मध्यम

सातवाहन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुरेख स्वप्नं. इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला अन् त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी अशा बुलंद किल्यांची निर्मिती झाली. त्या काळी नाणेघाटा पासून काही अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर या गांवी बाजारपेठ वसली गेली. सातवाहन यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले व नंतरच्या राज्यकर्त्यांनी त्याला पैलू पाडले. सारा सह्याद्री टप्प्या-टप्प्यांवरील गडकोटांनी सजला. काळाच्या ओघात या किल्यातील काही किल्ले विस्मृतीत गेले. यातील एक किल्ला म्हणजे किल्ले हडसर. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड. येथे येण्यासाठी मुंबईहुन माळशेजमार्गे जुन्नर गाठावे. ... जुन्नरजवळ माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे, घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच जुन्नरपासून १५ कि.मी.वर हडसर गावाच्या पश्चिमेला हा किल्ला आहे. इथे येण्यासाठी स्वत:चे वाहन नाही तर अंजनावळे येथे जाणाऱ्या एस.टी.बस सोयीच्या आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा असुन यापैकी राजदरवाज्याची मुख्य वाट घळीतून पायरीमार्गाने वर जाणारी तर दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी कड्यात कोरलेली तर तिसरी वाट गावकऱ्यांनी कातळात सळ्या व खाचा मारून दक्षिणेकडील कड्यातील तटातुन वर नेली आहे. यातील पहिल्या दोन वाटा सोप्या असुन तिसरी वाट काहीशी अवघड आहे. किल्ला संपुर्णपणे फिरायचा असल्यास घळीच्या पहिल्या वाटेने वर चढुन दुसऱ्या वाटेने खाली उतरावे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर गावी यावे लागते. हडसर गावामागील डोंगरावर जाताना वाटेत एक विहीर लागते. तेथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर निघावे. पठारावरील शेतामधून काही अंतर गेल्यावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामध्ये बांधलेली तटबंदी दिसते. हि खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बृरुजापाशी पोहोचतो. येथे सोपे प्रस्तरारोहण करून आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजावर येतो. गडावर जाणारी हि दुसरी वाट पण हडसरची मुख्य वाट त्याच्या शेजारील डोंगराला वळसा घालतच वर चढते. या वाटेने जाताना खिंडीकडे न वळता सरळ पुढे जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. या वाटेने जाताना गुहेत कोरलेली पाण्याची दोन टाकी दिसतात. हा शेजारचा डोंगर व या डोंगरात खोदलेल्या पाण्याच्या टाक्यादेखील हडसर किल्ल्याचाच एक भाग आहे. या डोंगराला वळसा घालुन आलो की गडावर जाणारा पायऱ्यांचा राजमार्ग दिसतो.येथून सुमारे तीनशे पायऱ्या चढून आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. राजदरवाजाची हि वाट अत्यंत सोपी असुन घळीत बांधुन काढलेली आहे. हडसर गावातून इथवर येण्यास १ तास लागतो. हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे कातळात कोरलेल्या सरंक्षण स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. कातळात पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग व त्याला कातळाचेच कठडे, पुढे कातळात खोदून काढलेले दोन दरवाजे व त्यांच्या रेखीव कमानी तसेच शेजारचे बुरुज व आतील पहारेकऱ्याच्या कोरीव देवड्या हे सर्व पहाण्यासारखे आहे. गडावरील मुख्य दरवाजातून वर आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील उजवीकडील वाट समोरील लहान डोंगरावर जाते तर डावीकडील वाट किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे जाते. समोरील डोंगराला घळीतून येणाऱ्या वाटेच्या दिशेने तटबंदी असुन टोकाला बुरूज बांधलेला आहे. या डोंगरावर दोन पाण्याची दोन टाकी असुन उघडयावर एक गणेशमुर्ती आहे. या मूर्तीसमोर एक झीज झालेला नंदी व समाधीचा कोरीव दगड आहे. हा डोंगर व किल्ल्याचा डोंगर एकमेकाला २०x४० फुट लांबरुंद तटबंदीने जोडलेले असुन या तटबंदीवर बांधकामाचे काही अवशेष दिसुन येतात. दुसऱ्या दरवाजाकडे जाताना कठडय़ाच्या टोकावर एक कोरीव स्तंभ दिसतो व पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या व दरवाजातून आपला गडावर प्रवेश होतो. दुसऱ्या दरवाज्यातून वर आल्यावर समोरच जमिनीलगत खोदलेले पाण्याचे टाके असुन याच्या काठावर एक छोटेसे शिवलिंग कोरलेले आहे. हडसर गड समुद्रसपाटीपासून ४६८७ फूट उंचावर असुन साधारण त्रिकोणी आकाराचा हा गड ९० एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरला आहे. येथुन पुढे जाणारी पायवाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या दिशेने जाताना दिसते. या टेकडीच्या पायथ्याशी एक पेशवेकालीन शिवमंदीर असुन टेकडीकडे जाताना वाटेत एक खडकात खोदलेले मोठे टाके दिसते. या टाक्यातील पाणी सध्या पिण्यासाठी वापरले जाते. दगडी बांधकामातील गर्भगृह व सभामंडप अशी या शिवमंदिराची रचना असुन मंदिरासमोर मोठा नंदी आहे. गाभाऱ्यात शिवलिंग असुन सभागृहाच्या कोनाड्यात गणेशमूर्ती, गरूडमूर्ती, हनुमानमूर्ती व एक भग्न झालेली मुर्ती आहे. गडावर मुक्काम करायचा झाल्यास या महादेव मंदिरात ४ ते ५ जणांना रहता येईल. मंदिराला लागून असलेली टेकडी गवताने व निलगिरीच्या झाडांनी भरलेली आहे. ही टेकडी म्हणजे गडाचा बालेकिल्ला असावा पण यावर कोणतेही अवशेष नाहीत. बालेकिल्ल्यावरून केवळ हडसरच नाही तर संपुर्ण जुन्नर प्रदेश नजरेस पडतो. मंदिरापासुन आपण गड फिरायला सुरवात करावी. मंदिराच्या मागे एक मोठा गोलाकार तलाव असुन या तलावातच खडकात खोदलेली पाण्याची ३ टाकी आहेत. पाण्याबरोबर वाहुन आलेला गाळ या टाक्यात जमा होऊन टाके पुर्ण भरल्यावर केवळ पाणी तलावात पाझरावे यासाठी हि रचना केली आहे. तलावाच्या काठावर झाडीत एक वनदेवतेची मुर्ती असुन कोरीव दगडांनी बांधलेल्या दोन मोठया समाध्या दिसुन येतात. यातील एक समाधी ढासळलेली असुन दुसरी समाधी मात्र आजही व्यवस्थीत उभी आहे. तलावाकडे जाताना उजवीकडे वळल्यावर कडय़ालगत जमिनीच्या पोटात खोदलेली एक वाट दिसते. या वळणदार वाटेच्या शेवटी एक दरवाजा असुन या दरवाजाच्या आतील चौकात तीनही बाजुना तीन गुहा खोदलेल्या आहेत. या वाटेवर व चौकात कधीकाळी छत असल्याच्या खुणा दिसुन येतात. यातील दोन गुहांच्या दरवाजावर चौकट कोरलेली असुन एका गुहेचा दरवाजा मात्र साधारण आहे. या प्रत्येक गुहेच्या आत दुसरी मोठी गुहा खोलवर खोदलेली असुन त्यांत शिरण्याचे दरवाजे मात्र लहान चौकोनी आकाराचे आहेत. ही रचना राहण्यासाठी नसून बहुधा कोठारांसाठी असावी. आज ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. येथुन बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा मारत गडाच्या पुर्व टोकाकडे निघावे. या वाटेवर सर्वत्र गवत असुन या गवतात शिबंदीची घरटी, खडकात कोरलेल्या पायऱ्या, रांजणखळगे, पहाऱ्याच्या जागा व रचीव तटबंदी यासारखे अनेक अवशेष दिसुन येतात. त्रिकोणी आकाराच्या या गडाला सर्व बाजूने तुटलेले कडे असुन गडाच्या दक्षिण व पुर्व बाजुला असणाऱ्या सोंडा तोडुन गडाला इतर भुभागापासून वेगळे केले आहे. पश्चिमेकडून गडावर येणारी वाट असल्याने केवळ याच भागात तटबंदी बांधलेली दिसते. गडाच्या पूर्व टोकाच्या बुरुजाकडे जाताना वाटेत पाच ठिकाणी पाण्याची टाकी दिसुन येतात. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गडाच्या पुर्व टोकाच्या या बुरुजाच्या भागात खुप मोठया प्रमाणात उध्वस्त अवशेष दिसतात. या अवशेषात खडकावर खोदलेले शिवलिंग, मारुतीची मुर्ती,कारंज्याचे दगडी भांडे, ढालकाठीचा बुरूज, तटबंदी व घोडयाच्या पागा पहायला मिळतात. या भागात पाण्याची एकुण पाच टाकी असुन गडावर येणारी तिसरी खिळ्याची वाट याच बुरुजावरून वर चढते. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे. येथून थोडे पुढे कातळात खोदलेली एक प्रशस्त गुहा आहे. गुहा पाहुन परत बुरुजावर यावे व पुढील वाटेला लागावे. या वाटेवर अजुन एक सुकलेले टाके असुन हि वाट शिवमंदिराकडे जाते. मंदिराच्या खाली उतारावर एकाखाली एक अशी पाण्याची तीन टाकी असुन टाक्याच्या वरील बाजुस गडाची सदर व वाड्याचे अवशेष आहेत. येथे आपली गडप्रदक्षिणा पुर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास अडीच तास लागतात. गडावरुन माणिकडोह जलाशय, चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो. गडावरुन खाली उतरताना हडसर गावाकडील पठारावर एका मंदीरासमोर अलीकडील काळातील पाच विरगळ दिसुन येतात. सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी नाणेघाटाची निर्मिती झाली. सातवाहन काळात कल्याण ते सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) या राजमार्गावर जुन्नरजवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली. सातवाहन हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन ज्ञात कुळ. इ.स.पूर्व २५० ते इ.स.२५० असे जवळपास पाचशे वर्ष त्यांचे महाराष्ट्रावर राज्य होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल घोडे अथवा बैलावर लादुन सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. सातवाहनांची बाजारपेठ जुन्नर. या बाजारपेठेसाठी व व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठीच जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. सातवाहन यादव यांचे राज्य गडावर नांदले पण त्यानंतर विस्मरणात गेलेल्या या गडाची नोंद इ.स.१६३७ मध्ये आढळते. मोगलांशी लढताना झालेल्या पराभवात शहाजी राजांनी मोगलांना जे पाच किल्ले दिले त्यात हडसर किल्ल्याचा समावेश होता. शिवकाळात या गडाचे फारसे उल्लेख नसले तरी जयराम पिंडे यांच्या पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या संस्कृत काव्यग्रंथातील पहिल्या अध्यायातील ३७व्या श्लोकात हडसरचा उल्लेख येतो. तो असा- तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च। महिषोप्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।। चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे किल्ले शिवाजीमहाराजांनी जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे. बहुधा गडाचे ‘पर्वतगड’ हे नामकरणही याच काळात झालेले असावे. कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या बखरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच करतात. मुघलांच्या नोंदीत या गडाचा उल्लेख ‘हरसूल’ असा येतो. पेशवाईत हा गड शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धापर्यंत मराठय़ांकडेच होता. इ.स.१८१८ च्या या युध्दावेळी मेजर एल्ड्रिजने जुन्नर जिंकल्यावर जुन्नरचा किल्लेदार हडसरवर आश्रयाला गेला. नंतर इंग्रजांच्या एका तुकडीने या गडाला वेढा घातला आणि २५ एप्रिल १८१८ रोजी हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!