सोनगीर

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशीक

उंची : १८९० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रात सोनगीर अथवा सोनगिरी या नावाने एकुण चार किल्ले आहेत. यातील पहिला सोनगीरी म्हणजे धुळ्याचा दुसरा सोनगिरी म्हणजे रायगड जिल्ह्यात पेणजवळील मिरगड उर्फ सोनगिरी, तिसरा सोनगिरी म्हणजे पुणे जिल्ह्यातील कर्जत जवळ आवळसचा किल्ला उर्फ सोनगिरी आणी चौथा पुर्णपणे अपरीचीत असा पेठ तालुक्यातील नाशिकचा सोनगीर उर्फ सोनगिरी. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात सोनगीर नावाचा किल्ला आहे हे आजही अनेक दुर्गप्रेमीना माहीत नाही. सह्य़ाद्रीच्या रांगेवरील पेठच्या उपरांगेत हा किल्ला असून भुवन गावाच्या मागे पुर्वपश्चिम पसरलेल्या डोंगराच्या एका टेकडीवर तो वसला आहे. नाशीक-पेठ—सुरत या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व प्रसंगी त्याचे रक्षण करण्यासाठी सोनगीर या टेहळणी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. भुवन हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव असुन नाशिकहून पेठमार्गे किंवा हरसूलमार्गे तेथे जाता येते. ... पेठ ते भुवन हे अंतर २० कि.मी असुन हरसूल ते भुवन हे अंतर साधारण ३५कि.मी. आहे. किल्ला जरी भुवन गावामागे असला तरी किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला भुवन गावात जाण्याची गरज नाही. पेठवरून गाडीमार्गे भुवन गावात जाताना एक घाट लागतो. हा घाट चढुन उतरताना पहिल्याच मोठया वळणावर उजव्या बाजुला एक पायवाट दिसते. या पायवाटेपासूनच किल्ल्याची चढाई सुरू होते. हरसुलमार्गे आल्यास भुवन गावाकडून पेठकडे जाताना हा घाट चढतेवेळी हे दुसरे मोठे वळण आहे. या वळणावरून डाव्या बाजुस असलेल्या पायवाटेने सुरवात करून पाच मिनिटात आपण उजवीकडे असलेल्या दोन डोंगरांमधील खिंडीत पोहोचतो. या खिंडीतून डावीकडे असलेल्या डोंगरावर चढत आपण सोनगिरी किल्ला असलेल्या डोंगराच्या पठारावर पोहोचतो. हे पठार खुप लांबवर पसरलेले असुन या पठारावर दोन टेकडया आहेत. यातील आपण पठार चढुन आल्यावर समोरच दिसणारी पहिली टेकडी म्हणजे सोनगिरी किल्ला आहे. किल्ला म्हणावे असे कोणतेच अवशेष येथे सहजपणे दिसुन येत नाही. हि टेकडी चढुन आल्यावर टेकडीच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर एका चौथऱ्याचे अवशेष असुन त्यावर वाढलेल्या झाडावर भगवा झेंडा रोवण्यात आला आहे. किल्ल्याचा हा माथा समुद्रसपाटीपासून १५९२ फुट उंचावर असुन टेकडीचा हा परीसर ८ एकरमध्ये पसरलेला आहे. या उंचवट्याच्या मागील बाजुस उतरल्यावर एक मातीने अर्धवट बुजलेले कोरडे टाके दिसुन येते. टाक्याच्या उजव्या बाजुला काही प्रमाणात रचीव दगड असलेली कोसळलेली तटबंदी दिसुन येते. या टेकडीच्या टोकावरील उतारावर असलेल्या झाडीत काही शेंदुर लावलेले दगड दिसतात. या उताराच्या खालील बाजूस असलेल्या एका मोठया झाडाला बांधीव पार आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गाडीमार्गापासुन किल्ला चढण्यास अर्धा तास व फिरण्यास अर्धा तास असा एक तास संपुर्ण किल्ला फिरण्यास पुरेसा होतो. किल्ल्यावर पाण्याची कोणतीच सोय नसल्याने पाणी सोबत बाळगावे. पठारावर गावकरी आजही मोठया प्रमाणात शेती करत असल्याने कदाचित तेथे असणारे अवशेष नष्ट झाले असावेत. किल्ल्यावर करवंदे व आवळ्यांची झाडे मोठया प्रमाणात असुन वृक्षतोडही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. अपरीचीत अशा या किल्ल्याची इतिहासात कोठेही नोंद आढळत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!