शिरपुर
प्रकार : गढी
जिल्हा : यवतमाळ
महाराष्ट्रातील शिरपूर म्हटले की आपल्याला प्रामुख्याने धुळे येथील शिरपुर गावाची माहीती मिळते. पण यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात देखील मध्ययुगीन इतिहासाचा वारसा लाभलेले शिरपूर हे गाव आहे. हे गाव यवतमाळ जिल्ह्यात असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती करताना तेथे जाणे जास्त सोयीचे आहे. वणी या तालुक्याच्या ठिकाणाहुन १३ कि.मी.अंतरावर असलेले हे गाव चंद्रपूरपासुन ४० कि.मी. अंतरावर आहे. शिरपुरची गढी हि किल्ला म्हणुन ओळखली जात असली तरी ती किल्ला नसुन गढी आहे. शिरपुर गावात प्रवेश केल्यावर कोणालाही किल्ला म्हणुन विचारले असता आपण अगदी सहजपणे गावाच्या एका टोकाला असलेल्या या गढीजवळ पोहोचतो. गढीचा दरवाजा व कमान पुर्णपणे नष्ट झाली असल्याने खाजगी वाहनाने आपण थेट गढीच्या आत प्रवेश करतो. दरवाजा तुटलेल्या ठिकाणी आता रस्ता बनविण्यात आला आहे. गढीची तटबंदी जवळपास ३-४ रूंद असुन उंची २० फूट आहे. हि तटबंदी बांधण्यासाठी मध्यम आकाराच्या ओबडधोबड दगडांचा वापर केलेला असुन काही ठिकाणी घडीव दगड वापरलेले आहेत.
...
तटावर जाण्यासाठी कोठेही जिने नाहीत किंवा बंदुकीचा मारा करण्यासाठी तटात जंग्या देखील दिसुन येत नाहीत. चौकोनी आकाराची हि गढी साधारण पाउण एकरवर पसरलेली आहे. गढीच्या आत नव्याने बांधलेली दोन मंदीरे असुन त्यातील एकी मंदीर हनुमानाचे तर दुसरे मंदीर स्थानिक देवतेचे आहे. स्थानिक मंदीरात काही लाकडी मुर्ती आहेत. याशिवाय गढीत शिल्लक असलेली एकमेव मुळ वास्तु म्हणजे ३० फुट खोल बारव. दुमजली असलेली हि बारव अतिशय सुंदर असुन त्यात आजही पाणी असते व ते पाणी गुरांना पिण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी गढीमध्ये नव्याने दोन हौद बांधण्यात आले आहेत. अगदी अलीकडील काळापर्यंत गावात नळ योजना येण्याआधी हे पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. विहिरीच्या आतील भागात बऱ्यापैकी कोरीवकाम केलेले असुन पहिल्या मजल्यावर जमिनीखाली दालन अथवा खोली बांधलेली आहे. या दालनाचा उपयोग उन्हाळाच्या दिवसात विश्रांतीसाठी अथवा रहाण्यासाठी केला जात असावा. हि बारव म्हणजेच पायविहीर घडीव दगडात बांधलेली असुन आत उतरण्यासाठी दोन मार्ग आहे. त्यातील मुख्य मार्गाने उतरल्यास बारवच्या तळापर्यंत म्हणजे पाण्यापर्यंत जाता येते तर दुसऱ्या लहान दरवाजाने उतरल्यास विहिरीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या दालनापर्यंत जाता येते. या वाटेवर शेवाळ जमा असल्याने अतिशय सावधगिरीने व काळजीपुर्वक या दालनात जावे. विहिरीचे बांधकाम दोन भागात केलेले असुन दुसरा भाग अष्टकोनी आकाराचा आहे. या भागात उतरता येत नाही व तेथील पाण्याचा उपसा मोटेने केला जात असल्याचे दर्शविणारे दगडी खांब या अष्टकोनी भागाच्या वरील बाजूस आहेत. दरवाजा वगळता अजून २-३ ठिकाणी गढीची तटबंदी ढासळली असली तरी उर्वरित तटबंदी मात्र खणखणीत आहे. पण आता स्थानिकांनी बांधकामासाठी गढीचे दगड वापरण्यास सुरवात केल्याचे दिसते. तटबंदी व पायविहीर वगळता गढीत काही पाहण्यासारखे नसल्याने अर्ध्या तासात आपले गढीदर्शन पुर्ण होते. चंद्रपूर येथे गोंड राज्याची राजधानी स्थापन होण्यापूर्वी बल्लारपूर व त्याआधी शिरपूर येथुन त्यांचा राजकारभार चालत असल्याचे वाचनात येते. चंदनखेड्याचे वतनदार गोविंदशाह यांचे सोयरीक संबंध शिरपूरच्या घराण्याशी होते. चंदनखेड्याचे गोविंदशाह यांची मुलगी शिरपूरचे गोंडराजे कन्नाके यांना दिली होती. चांदागडचे गोंड राज्य डळमळीत झाले व त्यातील वतनदारांनी स्वतःला स्वातंत्र्य घोषित केले त्यात शिरपूरची गढीपण होती. विदर्भाच्या या भागावर अनेक वर्ष गोंड राजांची सत्ता होती त्यानंतर सत्ता आली ती नागपूरच्या भोसले घराण्याची. त्यांच्या काळात त्यांनी काही किल्ल्यांची पुनर्बांधणी केली तर काही किल्ले नव्याने बांधले. पण याशिवाय त्यांच्या काळात काही प्रशासकीय गढी देखील बांधण्यात आल्या. शिरपुर येथे असलेले हि गढी त्यापैकी एक असावी असे वाटते. . गढीचा लिखित इतिहास मिळत नसल्याने आपल्याला इतिहासासाठी स्थानिक कथांचा आधार घ्यावा लागतो. अशीच एक प्रेमकथा चांदागड व शिरपुर यांच्या संदर्भात सांगितली जाते. ज्यावेळी चांदागडला रामशाह यांचे राज्य होते त्या काळात शिरपूरची गढी राजपुत्र बाघबा, राघबा आणि आघबा यांच्या ताब्यात होती. शिरपूरच्या राजघराण्याशी त्यांचे नात्याचे आणि सलोख्याचे संबंध होते. राजे रामशाह हे त्या तीन राजपुत्रांचे मामा होते. बाघबा हे थोरले बंधू होते. एकदा हे तिन्ही राजपुत्र चांदागडला गेले आणि मामाकडे काही दिवस मुक्कामी थांबले. त्यावेळी राजे रामशाह यांची रुपवती सुंदर राजकन्या व बाघबा राजा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले पण राजे रामशाह आणि राणी यांना हे संबंध मान्य झाले नाहीत. मामाला न कळवता हे चांदागडवरून तीनही राजपुत्र शिरपूरला परतले. राजे रामशाह यांचा संताप अनावर झाला व त्यांनी सैन्यासह राजपुत्रांचा पाठलाग केला परंतु तिन्ही राजपुत्र शिरपूर किल्ल्यात पोचले होते. राजे रामशाह यांनी युद्धासाठी बाघबा राजाला संदेश पाठवला व घुग्गुस येथे त्यांची लढाई झाली. या लढाईत तोफगोळा लागुन राघबाचा मृत्यु झाला तर गोळी लागुन आघबाचा मृत्यु झाला. त्यामुळे बाघबा यांचा धीर सुटला व त्याने शिरपूर किल्ल्याकडे सैन्यासह पळ काढला. बाघबा राजा किल्ल्यातील भुयारात लपून बसला पण राजे रामशाह यांना सुगावा लागला. त्यांनी भुयाराचे दगड काढून त्यात जळण भरले व भुयाराला आग लाऊन दिली. त्यामुळे राजपुत्र बाघबा आतमध्येच गुदमरून मृत्यू पावला. अशा प्रकारे एक राजपुत्र आणि राजकन्या यांच्या प्रेमाचा अंत झाला व त्याचबरोबर शिरपूरचे राजवैभव संपुष्टात आले. बाघबा राजाची समाधी गावालगत बांधली गेली व तेथे एक मंदिर बांधले गेले. हि कथा शाहीर माधव यांच्या एका पोवाड्याच्या आधारे सांगितली जाते पण त्याला कोणताही कागदोपत्री आधार नसल्याने ती कथा म्हणुन घ्यावी हेच योग्य ठरेल.
© Suresh Nimbalkar