वंदन

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : ३६७५ फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्राला दुर्गवैभवाची मोठी परंपरा आहे. पश्चिम महाराष्ट्र भटकताना आपल्याला या सह्याद्रीच्या डोंगररांगेत अनेक किल्ले दिसुन येतात.विविध राजसत्तांचा काळात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले व सारा सह्याद्री गडकोटांनी सजला. शिलाहार राजा दुसरा भोज याच्या कालखंडात बांधला गेलेला असाच एक दुर्ग म्हणजे चंदन-वंदन. मुंबई-बंगळुर महामार्गाने पुण्याहुन साताऱ्याकडे जाताना डाव्या बाजुला हि दुर्गजोडी आपले लक्ष वेधुन घेते. साताऱ्याच्या अलिकडे एकाचा डोंगरावर बांधलेले हे किल्ले केवळ एका खिंडीने वेगळे झाले असले तरी एखादया स्वतंत्र किल्ल्याला असावी अशी मेट-माची–बालेकिल्ला दुर्गरचना या दोन्ही किल्ल्यांना लाभली असल्याने या दोन्ही किल्ल्यांकडे आपण स्वतंत्र किल्ले या अनुषंगाने पहाणार आहोत. यातील वाई तालुक्यातील वंदन किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. बेलमाची हे वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव पुण्यापासुन भुईंज किकली मार्गे १०० कि.मी.अंतरावर असुन साताऱ्यापासून हे अंतर २० कि.मी. आहे. ... बेलमाची गावातील वरची बेलमाची वाडीतुन एक वाट गडावर जाते याशिवाय किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस असलेली राउतवाडी येथुन देखील एक वाट गडावर येते. या दोन्ही वाटा वंदन गडाच्या मुख्य दरवाजासमोर एकत्र येतात. यातील बेलमाचीतील वाट सोयीची असुन या वाटेच्या सुरवातीस असलेले पुरातन भैरव मंदीर व वाटेवरील काही बांधीव पायऱ्या पहाता हिच गडावर जाणारी मुख्य वाट असावी. झाडा-झुडपातुन जाणाऱ्या या वाटेने एक तासात आपण या दोन किल्ल्यांमधील खिंडीत पोहोचतो. इथुन उजवीकडे दिसणारा किल्ला म्हणजे वंदन तर डावीकडे दिसणारा किल्ला म्हणजे चंदन आहे. येथुन पुढे अर्ध्या तासाची पायपीट करत आपण वंदन गडाच्या उत्तराभिमुख महादरवाजात पोहोचतो. दोन दरवाजामध्ये बांधलेल्या या दरवाज्याच्या एका बुरुजावर गजाननाची मुर्ती व फुलांची नक्षी कोरलेली असुन दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजाची एकुण रचना पहाता हा दरवाजा मराठा कालखंडात बांधला गेला असावा. दरवाजाच्या आतील बाजूस असलेली तटबंदी कोसळली असुन समोर डोंगर उतारावर वरील तटबंदीला लागुन खालील दरवाजाच्या तटबंदी पर्यंत एक आडवी तटबंदी बांधली आहे. हि तटबंदी काही ठिकाणी कोसळली आहे. गडावर जाताना एकापाठोपाठ एक अशी तीन दरवाजांची मालिका आपल्याला पार करावी लागते. हा दरवाजा पार केल्यावर आपण दुसऱ्या दरवाजासमोर येतो. डोंगर उतारावर सुस्थितीत असलेला हा पश्चिमाभिमुख दरवाजा मोठया प्रमाणात मातीत गाडला गेला असल्याने या दरवाजा शेजारील तटबंदी वरून आपला गडात प्रवेश होतो. या दरवाजाच्या आत आल्यावर समोरच आपल्याला एक दगडी बांधकामातील आदिलशाही काळातील इमारत दिसते. या इमारतीत शिरणाऱ्या लहान दरवाजावरील कमानीवर एक पर्शियन शिलालेख कोरलेला असुन शिलालेखाच्या तळाशी मोडी लिपीतीलही एक ओळ आहे. हा शिलालेख बहुधा या वास्तुच्या बांधकामाविषयी असावा. १६ व्या शतकात किल्ला विजापुर आदिलशहाच्या ताब्यात असताना गडावर बरीच बांधकामे केली गेली. त्यावेळी हा दरवाजा व इमारत बांधल्यावर हा शिलालेख बसवला असावा. दरवाजाच्या आतील बाजुस कमानीदार ओवऱ्या असुन यातील एका ओवरीतुन या वास्तुच्या वरील बाजुस जाण्यासाठी भिंतीत बांधलेला दगडी जिना आहे. हि वास्तु पन्हाळा गडावरील दरवाजाची आठवण करून देते. प्रसंगी १०-१२ जण इथे सहज राहु शकतात. हि वास्तु पाहुन उजवीकडील बाजुने सरळ पुढे आल्यास डाव्या बाजुस काही घरांचे चौथरे दिसुन येतात. तुळाजी आंग्रे वंदन किल्ल्यावर कैदेत असताना येथेच असल्याचे स्थानिक सांगतात. येथुन समोर जाणारी पायऱ्यांची वाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते तर उजवीकडील वाट उत्तरेच्या बुरुजावर नेते. या बुरुजाकडे जाताना वाटेत दगडी चाक नसलेला बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा आहे. बुरुज पाहुन परत आल्यावर या वाटेने बालेकिल्ल्याकडे निघावे. या वाटेने काही पायऱ्या चढुन वर आल्यावर आपल्याला मोठया प्रमाणात घराचे नव्हे तर चक्क रेखीव वस्तीचे अवशेष दिसुन येतात. हे अवशेष पुर्णपणे डोंगर उतारावर असुन या वस्तीत जाणाऱ्या पायऱ्या एखादया खुल्या रंगमंचा प्रमाणे वाटतात. येथे मोठया प्रमाणात घरांचे चौथरे असुन स्थानिक लोक या ठिकाणाला ब्राह्मण वस्ती म्हणतात. येथील अवशेषांचे प्रमाण पहाता गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. वस्तीतून पुढे जाताना उजव्या बाजूस एक लहान तलाव दिसुन येतो. तलावाच्या पुढील भागात पडलेल्या वाड्याचे अवशेष असुन येथे तीन खोल्यांची तीन दरवाजे व दगडी छप्पर असलेली कमानीदार वास्तु दिसुन येते. हि वास्तु सरकारवाडा म्हणुन ओळखली जाते. येथुन पश्चिम टोकावरील बुरुजाकडे जाताना अजुन दोन पाण्याचे तलाव पहायला मिळतात. हे दोन्ही तलाव पार केल्यावर आपल्याला तटबंदीने बंदिस्त केलेली एक मशीद पहायला मिळते. मशिदी बाहेर असलेल्या तटबंदीच्या दरवाजावर एक पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. मशिदीच्या डाव्या बाजुस एक लहान टेकडी म्हणजे गडाचा बालेकिल्ला आहे. पण तेथे न जाता आधी गडाची पश्चिम बाजु पाहुन घ्यावी. मशिदीच्या मागील बाजुस काही अंतरावर एक समाधी चौथरा पहायला मिळतो. चौथरा ओलाडून पुढे आल्यावर एक भला मोठा तलाव असुन या तलावाच्या काठावर एक दर्गा आहे. तलावाभोवती असलेल्या भिंतीतून तलावात उतरण्यासाठी एक दरवाजा असुन दरवाजातुन तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दर्ग्याच्या आवारात एक भलामोठा चौथरा असुन सर्वत्र मोठया प्रमाणात कबरीचे अवशेष विखुरलेले आहेत. यात दर्ग्यावरील मिनार व नक्षीचे दगड पहायला मिळतात. दर्ग्यात १५-२० जणांची रहायची सोय होते पण एप्रिलनंतर तलावात पाणी मिळण्याची शक्यता नाही. या दर्ग्याच्या समोरील बाजुस दुसरा उध्वस्त दर्गा असुन शेजारील उंचवट्यावर स्वतंत्र चार भिंतीच्या आत वेगवेगळ्या ५-६ कबर पहायला मिळतात. या कबरी ओलांडुन पुढे आल्यावर तीन लहान समाधी चौथरे असुन एका चौथऱ्यावर शिवलिंग कोरले आहे. हे पाहुन झाल्यावरील गडावरील बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या दिशेने निघावे. या टेकडीला एक बांधीव बुरुज असुन टेकडीवर एक कबर व इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. गडाला चारही बाजुला ताशीव कडे असल्याने काही भागातच तटबंदी बांधलेली दिसुन येते. साधारण त्रिकोणी आकार असलेल्या वंदनगडाचा विस्तार दक्षिणोत्तर असुन गडाचा परीसर ६५ एकरमध्ये सामावला आहे. बालेकिल्ल्यावर वंदन गडाची उंची समुद्रसपाटीपासुन ३७८७ फुट असुन पायथ्यापासुन १२३० फुट आहे. तळमाची, मधली माची व बालेकिल्ला असा तीन टप्प्यात विभागलेला वंदनगड उंची व जागा याबाबत चंदनगडला सरस आहे. बालेकिल्ल्यावरून गडाचा संपुर्ण परीसर तसेच वैराटगड अजिंक्यतारा, कमळगड, केंजळगड, पांडवगड, कल्याणगड हे किल्ले व तिथपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. बालेकिल्ला पाहील्यावर गडाच्या उरलेल्या टोकाकडे म्हणजेच दक्षिणेकडे निघावे. या वाटेने बालेकिल्ल्या खालील माची उतरून आपण तळातील माचीवर पोहोचतो. गडाच्या या दक्षिण टोकावर दगडी चाक नसलेला चुना मळण्याचा दुसरा घाणा आहे. गडाची या भागातील तटबंदी आजही सुस्थितीत असुन मोठया प्रमाणात गाडली गेली आहे. या तटबंदीत एक कमानीदार वास्तु असुन ती देखील गाडली गेली आहे. या वास्तुच्या मागील बाजूस असलेल्या ४०—५० पायऱ्या पार करून आपण गडाच्या दक्षिण दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा व त्या शेजारील बुरुज तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या स्थितीत आहे. दोन बुरुजामधील हा दरवाजा पार करून आपण गडाबाहेर पडतो पण या डोंगरसोंडेवरून राउतवाडीला जाणारी वाट मोडली असल्याने परत फिरावे लागते. येथुन वर आल्यावर परत मधील माचीवर न जाता चुन्याच्या घाण्याकडून सरळ पुर्वेला निघावे. या वाटेने किल्ल्याची तटबंदी व त्यातील ५-६ बुरुज व इतर अवशेष पहात आपण किल्ल्याच्या महादरवाजाकडे पोहोचतो. येथे आपले साधारण ३ तासाचे दुर्गदर्शन पूर्ण होते. इ.स.११९१-११९२ सालच्या ताम्रपटानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्यांची निर्मिती केली. इ.स.१३३७-३८ दरम्यान सातारा प्रांत बहमणी सुलतानांच्या राजवटीखाली आला. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर सोळाव्या शतकात हा भाग विजापुरच्या आदिलशाही वर्चस्वाखाली आला. याच काळात इब्राहिम आदिलशहा दुसरा याने या किल्ल्यावरील इमारती बांधल्या. त्यामुळे वंदन किल्ला जरी राजा भोजने बांधला असला तरी गडावरची बहुतेक बांधकामे ही आदिलशाही काळातील आहेत. आदिलशाही काळात हा किल्ला एक महत्त्वाचा परगणा होता. १६५९मध्ये अफझलखान वधानंतर महाराजांनी आदिलशाही प्रांतात मुसंडी मारली व सातारचा किल्ला जिंकला. त्यानंतर अण्णाजी दत्तो यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केल्यावर त्याचे संग्रामगड नाव बदलून वंदन करण्यात आले. संभाजी महाराजांच्या काळात इ.स.१६८५ मध्ये फेब्रुवारीत मुघल सरदार अमानुल्लाखान याने चंदन-वंदन येथे मराठ्यांवर केलेल्या हल्ल्यात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा ताब्यात घेतला. १६८९ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा परीसर नंतर मात्र मोगलांच्या ताब्यात गेला. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर मोगल-मराठे युद्धात ७ ऑक्टोबर १७०१ ला मोगलांनी वंदन किल्ला परत घेतल्याची नोंद आढळते. छत्रपती शाहूमहाराजांनी सन १७०७ मध्ये हा प्रदेश जिंकून वंदनगड पुन्हा स्वराज्यात आणला. ताराराणीवर लक्ष ठेवण्यास बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केल्याची नोंद आढळते. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी तोफांचा भडीमार करुन चंदन वंदन किल्ले जिंकले. १८५७ च्या उठावात वंदनवर असलेली एक तोफ निकामी करण्यासाठी कॅप्टन रॉस वंदन किल्ल्यावर आला असल्याची नोंद आढळते. सध्या राउतवाडी येथील तरुण मंडळ कोणत्याही मदतीशिवाय कसलीही अपेक्षा न ठेवता स्वयंप्रेरणेने या गडाचे संवर्धनाचे काम करत आहेत. गडाच्या पुर्वेस असणारा गडावर जाणारा मुख्य दरवाजात मोठया प्रमाणात दगडधोंडे व माती पडुन बंदिस्त झाला होता. यात असणाऱ्या पहारेकऱ्याच्या देवड्या पुर्णपणे दगडमातीत गाडल्या गेल्या होत्या पण सध्या हा भाग पुर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. याशिवाय गडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या दुसऱ्या दरवाजाचा आजपर्यंत कोठेही उल्लेख दिसत नाही. पुर्णपणे मातींत गाडून गेलेला हा दरवाजा तेथील बुरुज व तटबंदी दरवाजाकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या ४० पायऱ्या या तरुणांनी नव्याने शोधुन काढल्या आहेत पण प्रसिद्धी यंत्रणापासुन हि मंडळी दुर असल्याने त्याचा गाजावाजा झाला नाही. प्रत्येक शनिवार रविवार हे तरुण तिथे काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!