लोणीकंद

प्रकार : वाडा

जिल्हा : पुणे

उंची : 0

शिंदे घराण्याचं मराठ्यांच्या इतिहासात मोलाचं योगदान असल्याने हे घराणे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिद्ध घराणे आहे. शिंदे म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते ग्वाल्हेरचं शिंदे घराणं. परंतु ग्वाल्हेरकरांचा उदय होण्यापूर्वीही शिंद्यांची काही घराणी शिवपुर्वकाळात प्रसिद्धीस आलेली होती. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकंद या गावी असलेले रविराव शिंदे हे घराणे त्यापैकी एक. काहीजण रविराव शिंदे हा या घराण्याचा मूळ पुरुष असल्याचे मानतात तर काहीजण रविराव हि या घराण्याची पदवी असल्याचे सांगतात. लोणीकंद गावात पुर्वी रविराव शिंदे घराण्याचे तीन चार वाडे होते पण आज या गावात रविराव शिंदे यांचा एकमेव वाडा शिल्लक असू तो देखील अखेरची घटका मोजत आहे. लोणीकंद हे गाव पुणे - नगर महामार्गावर पुण्यापासून २२ कि.मी अंतरावर आहे. लोणीकंद गावात प्रवेश केल्यावर दुसऱ्या गल्लीत हा वाडा जीर्ण अवस्थेत उभा आहे. वाड्याभोवती असलेली दगडी तटबंदी बहुतांशी ढासळलेली असुन त्यात असलेल्या दरवाजाची वरील कमान देखील नष्ट झाली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. ... तटबंदीच्या मध्यवर्ती भागात या दुमजली वाड्याचे बांधकाम असुन वाडा अतिशय जीर्ण अवस्थेत असल्याने त्यात फिरणे धोकादायक आहे. वाड्याचा वरील मजला लाकडी तुळईंवर बांधलेला असुन हि लाकडे आता काही काळाचीच सोबती आहेत. वाड्याच्या आवारातच एक विहीर पहायला मिळते. सध्या या वाड्याची मालकी जगताप घराण्याकडे आहे. रविराव घराण्यातील एक मुलगी सासवडच्या जगतापांना दिल्याने ती मंडळी इकडे वतनावर आली. वाड्याच्या तटबंदी बाहेर एका घुमटीत चरण कोरलेली शिळा असुन ती सतीशीळा असल्याचे सांगितले जाते. या शिवाय ग्वाल्हेर येथे रहाणारे श्रो.हनुमंतराव यशवंतराव रविराव शिंदे यांनी लोणीकंद येथील त्यांचा दुसरा वाडा शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या हायस्कूलसाठी बक्षीस दिला. तो पडल्यावर त्या जागी शाळेची नवी इमारत बांधण्यात आली. या शिवाय लोणीकंद गावात आवर्जुन पहावे असे पेशवे काळातील सागवानी व दगडी बांधकाम असलेले विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. लोणीकंद गावची भटकंती करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. वाड्याचे एकुण स्वरूप पहाता तो काही काळाचाच सोबती आहे. त्यामुळे तो पुढील भेटीत असेल कि नाही याबाबत शंका आहे. या घराण्याच्या कैफियतीमध्ये या घराण्याची हकिगत आलेली आहे. शिवपुर्वकाळात मुसलमानी अमदनीत हे घराणे उदय पावले, रविराव,रुस्तमराव,झुंजारराव असे बहुमानदर्शक किताब या घराण्याकडे होते. रविराव या शब्दाचा वेध कोकणातील बारवई किल्ल्याच्या इतिहासापर्यंत जातो. बहमनीकाळात माधवराव रविराव शिंदे हे बारारावांचा पाडाव करण्यासाठी कोकणात उतरले. त्यावेळी बारवई या किल्ल्यावर लढाई होऊन किल्ला माधवराव रविराव शिंदे यांच्या हाती आला तेव्हा पासुन या घराण्यास रविराऊ उपाधी मिळाली जी कालांतराने रविराव झाली. त्यातील शिंदे रविराव हे औरंगाबादकडे चाकरीस होते. दुसरे राघोलक्ष्मण हे मल्हारराव होळकरांच्या पदरी होते. तुकोजीराव यांनी बादशाहाची मर्जी संपादन केली. बादशहाने खूश होऊन त्यांची सरदारी वाढवून त्यांना नगारा, निशाण, पालखी व फौजेचा सरंजाम बहाल केला. त्यानंतर झालेले तिसरे तुकाजीराव व मानाजीराव हे सातारकर शाहूमहाराज यांच्याकडे सरदारीवर राहिले. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांबरोबर या घराण्यातील मानाजी शिंदे रविराव होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी संतोषी होऊन मौजे लोणी येथील मोकासा मानाजीराव शिंदे रविराव यांना दिला. त्याप्रमाणे वहिवाट चालत आली. याचा अर्थ शिंदे ‘रविराव’ घराण्याला हे गाव जहागिर होतं. एका ऐतिहासिक पत्रात सुकलोणी असाही या गावचा उल्लेख आहे. इ.स. १७६३ मध्ये मराठ्यांची निजामअलीबरोबर राक्षसभुवन इथे लढाई झाली. त्या लढाईत संताजी बिन मानाजी राव सुभानराव बिन मानाजीराव यांनी फार मोठा पराक्रम केला. निजामाच्या फौजेने रघुनाथराव पेशव्यांच्या हत्तीला घेरले असता मानाजींचे पुत्र संताजीराव व सुभानराव यांनी पराक्रम करून रघुनाथराव पेशव्यांना हत्तीसह बाहेर काढले. इ.स.१८१६-१७ मध्ये त्रिंबकजी डेंगळेंनी ठाण्याच्या तुरुंगातुन पलायन केल्यावर इंग्रजांविरुद्ध शंभुमहादेवाच्या डोंगररांगांत फलटण, बरड, नातेपुते, शिखर शिंगणापूर या ठिकाणी रामोशी व मांग समाज संघटित केला. याकामी त्यांचे सासरे रविराव शिंदे यांनी त्यांना मदत केली. पुढे इंग्रजांनी पेशव्यांवर दबाव आणून त्रिंबकजी व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी जो फतवा काढला त्यात त्रिंबकजींच्या बारा साथीदारांत रविराव शिंदे लोणीकरांचा उल्लेख येतो. रांजणगाव येथील गणपती मंदिरातील काही ओवऱ्या याच रविराव यांनी बांधल्या आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!