राजमाची
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
उंची : २०७० फुट
श्रेणी : मध्यम
गिरीमित्रांनी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे राजमाची हा एकच किल्ला असुन या किल्ल्याच्या माचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. या किल्ल्याचा पसारा प्रचंड असुन अवशेष देखील मोठया प्रमाणात आहेत. निसर्गसुंदर अशा या किल्ल्याला भेट दिल्यावर आपल्या भटकंतीला पुर्ण न्याय मिळावा यासाठी या एका दुर्गाचे तीन भागात विभाजन केलेले आहे. पहिला भाग म्हणजे माचीचा भाग जो राजमाची म्हणुन संबोधला आहे. दुसरा भाग म्हणजे श्रीवर्धन बालेकिल्ला आणि तिसरा भाग म्हणजे मनरंजन. या तिघांपैकी राजमाची या माचीची ओळख आपण येथे करून घेणार आहोत. सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगर रांगेमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो.
...
या उल्हास नदीच्या उगमाच्या प्रदेशात मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. सातवाहन काळापासून प्राचीन घाटमार्गावर असलेला हा किल्ला प्रचंड वनांनी आणि निसर्गरम्य हिरवाईने वेढलेला आहे. राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २७०० फुट आहे. राजमाचीस आपण दोन मार्गाने भेट देऊ शकतो. पहिला मार्ग म्हणजे कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने अथवा रिक्षाने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट खडतर आहे. या वाटेने उधेवाडीत पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात. दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे उधेवाडी गावात यावे. ही वाट एकदंर १५ कि.मी ची आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास ५ तास लागतात. पुणे-मुंबई महामार्गाने लोणावळयाहुन खोपोलीला जाताना खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरोबाचा डोंगर म्हणतात. लोणावळ्याहून तुंगार्लीमार्गे येताना गड येण्यापूर्वी अलीकडेच काही अंतरावर तळातील तटबंदी आपला रस्ता अडवते. गडाची ही वेस पाडून आता कच्चा रस्ता केला आहे. पण बाजूच्या बलदंड भिंती पाहिल्या की त्या काळच्या दरवाजाचा अंदाज येतो. या वेशीच्या आत शिरताच डाव्या हाताला गणेश, मारुतीचे मंदिर आहे. पुढे काही अंतरावर सतीच्या शिळाही आहेत. ही वेस ओलांडली की राजमाचीची हद्द सुरू होते. गडाची ही माची. या माचीवर मधोमध दोन बेलाग बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन ! यातील श्रीवर्धन आपल्यावर लक्ष ठेवून असतो. किल्ल्यावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळयात दरीतून पडणाऱ्या धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते. बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखल पट्टी आहे यावर भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरात भैरव आणि जोगेश्वरीच्या मूर्ती असुन छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी वेगवेगळय़ा काळात त्या अर्पण केलेल्या आहेत. मंदिरासमोर दोन भग्न तोफा ठेवलेल्या आहेत. याशिवाय मंदिरासमोरच्या ३ दिपमाळा भोवतीने काही कोरीव शिल्पंदेखील आहेत. यातील गजान्तलक्ष्मीचे शिल्प तर पाहण्यासारखे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे. उधेवाडी ही कोळी लोकांची २०-२२ घरांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असा त्यांच्या नावाचा शिलालेख या तलावाच्या भिंतीत आहे. तलावाच्या शेजारी एक चुन्याचा घाना आहे. सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. या मंदिराशेजारी एक बांधीव विहीर आहे. राजमाचीहून पश्चिमेला कोकण दरवाजा अर्धवट कोसळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाजाकडे जाताना वाटेल एक पाण्याचे दगडात कोरलेले बांधीव टाके आहे. कोकण दरवाजाच्या अलीकडे पाण्याचा प्रवाह अडवुन त्यावर छोटे धरण बांधले आहे. याशिवाय गडावर अजून छोटे मोठे बरेच अवशेष आहेत. गिरीभ्रमंतीची व दुर्ग भ्रमंतीची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी राजमाची किल्ला हे एक सुंदर स्थळ आहे. कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून नाणेघाटप्रमाणे बोरघाट हा देखील घाटावर जाणारा प्राचीन व्यापारी मार्ग. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी घाटमाथ्यावर असलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे किल्ले राजमाची. राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर कोंढाणे बौध्द लेणी आहेत. सातवाहनकाळात खोदलेली हि लेणी पहाता या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई या सा-या राजवटी पाहिल्या असून किल्ल्याच्या जडणघडणीत या सा-यांचे हात लागले असल्याचे गडावर पहायला मिळते. राजमाची किल्ल्यास कोंकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे. इ.स.१६५७ च्या कल्याण मोहीमेत राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर हे किल्ले स्वराज्यात सामील झाले व हा संपुर्ण प्रदेश मराठयांच्या वर्चस्वाखाली आला. यानंतर इ.स.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठयांच्या ताब्यात दिसतो. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आल्यावर इ.स. १७०४ मध्ये राजमाची किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर १७१३मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. इ.स. १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत पोहचला. त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला व आसपासचा परिसर ताब्यात घेतला. इ.स.१८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्यासाठी किमान दोन दिवस वेळ काढणे गरजेचे आहे. माचीवर असलेल्या उधेवाडी गावात राहण्या-खाण्याची उत्तम सोय होते. राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. याला 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात. ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. राजमाचीखालील उल्हास नदीच्या पात्रात एका मोठया दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला 'जिजाऊ कुंड 'म्हणतात या कुंडात लोक मोठा श्रध्देने स्नान करतात.
© Suresh Nimbalkar