बसगड/भास्करगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३५७३ फुट
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. याच त्र्यंबक रांगेत येणारा भास्करगड अथवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा शेजारी आहे. हरिहर किल्ला हा कातळात खोदून काढलेल्या पायऱ्यासाठी प्रसिद्ध असल्याने तेथे सतत वर्दळ असते मात्र त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे फार कमी भटक्यांचे पाय वळतात. नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी सोपारा डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या किल्ल्यांच्या माळेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर व भास्करगड या दोन किल्ल्यांचे मणी ओवले गेले. निरगुडपाडा हे हरीहर व भास्करगड या दोन्ही गडाच्या पायथ्याचे गाव असुन वेळेचे नीट नियोजन केल्यास एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहुन होतात.
...
मुंबई-नाशीक महामार्गावरून घोटीमार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि.मी.आहे तर नाशिक-निरगुडपाडा हे अंतर त्रिंबकमार्गे ४१ कि.मी. असुन नाशीक व पुणेकरांसाठी हा मार्ग सोयीचा आहे. नाशिक-त्रिंबक रोडवर त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे असलेल्या प्रयागतीर्थ या तलावासमोरून एक रस्ता थेट घोटी गावापर्यंत जातो. या रस्त्याने निरगुडपाडा हे अंतर २० कि.मी. आहे. निरगुडपाडा हा बऱ्यापैकी मोठा पाडा असल्याने गावात आगाऊ सांगितल्यास जेवणाची व शाळेत राहण्याची सोय होते. निरगुडपाड्याच्या समोरील बाजुस हरिहर किल्ला तर गावाच्या डाव्या बाजुला डोक्यावर टोपी ठेवल्यासारखा दिसणारा बसगड किल्ला आहे. या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये नागाच्या फण्यासारखे शिखर असलेला फणी डोंगर आहे. हरिहर, बसगड आणि फणी डोंगर या तीनही ठिकाणी निरगुडपाडा येथून जाता येते. गावातुन किल्ला जरी समोर दिसत असला तरी त्यावर जाण्यासाठी संपुर्ण डोंगराला वळसा घालुन विरुध्द बाजुच्या टोकाला जावे लागते. गावातुन गडपायथ्याला जाण्यास दिड तास तर किल्ल्यावर जाण्यास दोन ते अडीच तास लागतात. निरगुडपाडा गावातुन घोटीच्या दिशेने काही अंतरावर एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत फणीचा डोंगर व भास्करगड यांच्या मधील खिंडीत जातो. भास्करगड व उतवडचा डोंगर असलेली एक सोंड या खिंडीत उतरलेली आहे. येथे कच्चा रस्ता सोडुन डाव्या बाजुला एक पायवाट वर जाताना दिसते. हि वाट अनेक वळणे घेत भास्करगडावर जाते. किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने उन्हाळय़ातही चढताना फारसा त्रास होत नाही. गडावर फारसे दुर्गभटके जात नसल्याने वाटा मळलेल्या नाहीत. नेहमी भटकणाऱ्या दुर्गभटक्यांना वाट शोधणे फारसे कठीण काम नाही पण नवख्यांनी मात्र गावातून एखादा माहितीगार माणूस बरोबर घ्यावा. खिंडीतील सोंडेवरून पहिल्या पठारावर आल्यावर सतत भास्करगडाच्या दिशेने डावीकडची वाट घ्यावी भास्करगडाच्या समोरच उतवडचा डोंगर हे भास्करगडापेक्षा उंच त्र्यंबक रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. भास्करगडावर जाणाऱ्या वाटेशी सलंग्न अशी एक वाट उतवड डोंगरावर जाते. आपण थोडे जरी भरकटलो तर उतवड डोंगराच्या पायथ्याशी पोहोचण्याची शक्यता असते. खिंडीतून साधारण एक तासाची चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या सोंडेसमोरील छोट्या पठारावर येऊन पोहोचतो. या पठारावरून समोरच भास्करगडाच्या सोंडेवर असलेला उध्वस्त बुरुज दिसुन येतो. या पठारावरून गडाला वळसा मारत गडाचा कातळकडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत एक वाट किल्ल्यावर जाते. या वाटेने साधारण २० मिनिटे गेल्यावर आपण भास्करगडाच्या पायऱ्याजवळ पोहोचतो. येथे कातळकड्यात किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ खोदून पायऱ्या कोरलेल्या आहेत. या वाटेच्या दोन्ही बाजूस साधारण १०-१२ फुट उंचीच्या कातळभिंती आहेत. या भिंतीच्या वरील बाजुस असलेली तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली असुन हे ढासळलेले दगड पायरीमार्गावर आल्याने या पायऱ्या मोठया प्रमाणात गाडल्या गेल्या आहेत. यातील सुरवातीच्या काही पायऱ्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संस्थेने श्रमदानाने साफ केलेल्या आहेत. या पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या व जमीनीत अर्धवट गाडलेल्या पश्चिमाभिमुख दरवाजा समोर पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा जरी अर्धा गाडला गेला असला तरी दरवाज्याच्या दोन्ही बाजूस कोरलेली कमळाची फुले आजही चांगल्या स्थितीत आहेत. या दरवाजातुन थोडे वाकुनच आपल्याला किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. दरवाजाच्या आत उजव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी देवडी असुन येथुन १०-१२ पायऱ्या चढुन आपण दरवाजासमोरील सपाटीवर येतो. येथुन किल्ल्याच्या पठारावर जाताना समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. उजव्या बाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहचतो. निमुळते पण प्रशस्त पठार असलेला हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३३४० फुट उंचीवर पुर्वपश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ३२ एकर आहे. भास्करगडचा माथा हा निव्वळ खडकच असल्याने आपल्याला सर्वत्र दगड पसरलेले दिसतात. पठारावर जाताना वाटेत उजव्या बाजुला एका वास्तुचे अवशेष असुन त्यात काही कोरीव दगड दिसुन येतात. हि वास्तु म्हणजे एखादे मंदिर असावे. पठारावर आपण जेथे पोहोचतो तेथे पाण्याचे एक बुजलेले जोडटाके असुन या टाक्यासमोर एक मोठया वास्तूचे अवशेष दिसुन येतात. गडावर मोठया प्रमाणात असलेले वास्तुअवशेष पहाता गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. या पठारावरून आपण गडाखालुन वर येताना जो बुरुज दिसतो त्या बुरुजाकडे जाताना वाटेत पाण्याची दोन कोरडी टाकी दिसुन येतात. सध्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या नाशिकच्या संस्थेने येथे दुर्गसंवर्धनाचे काम हाती घेतलेले असुन अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात देखील हि मंडळी येथे काम करीत आहेत. यातील एका टाक्याची पुर्णपणे सफाई झालेली असुन दुसरे टाके अर्धवट साफ केलेले आहे. साफ केलेल्या टाक्यात या पावसाळ्यात पाणी जमा होऊन नंतरच्या काळात गडावर काही प्रमाणात पाण्याची सोय होईल. गडासाठी झुंजणाऱ्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठानच्या या मावळ्यांच्या कार्याला मनापासुन धन्यवाद व प्रणाम. गडावर काही या टाक्याच्या खाली टोकाला असलेल्या बुरुजाला काही प्रमाणात तटबंदी असुन बुरुजावर जाण्यासाठी असलेला दरवाज उध्वस्त झालेला आहे. किल्ल्याला या भागात काही प्रमाणात रचीव तटबंदी दिसुन येते. हे पाहुन आपण सुरवातीला पाहिलेल्या जोडटाक्याकडे येऊन गडफेरीला सुरवात करावी. या फेरीत सुरवातीला आपल्याला एका मोठया वाडयाच्या भिंतींचे अवशेष दिसुन येतात. हा बहुदा किल्लेदाराचा वाडा असावा. या वाड्यावरून पुढे गेल्यावर एक साचपाण्याचा तलाव दिसुन येतो. या तलावातच खडकात एक टाके खोदलेले आहे. तलावाच्या काठावर असलेल्या चार उध्वस्त भिंतीच्या आत एक शेंदुर फसलेली हनुमानाची मुर्ती आहे. किल्ल्याच्या या भागात पठाराच्या काठावर मोठया प्रमाणात दगडाची रचीव तटबंदी दिसुन येते. येथुन पुढे जाताना उजव्या बाजुला एका झाडाखाली बुजलेले टाके असुन पुढे वाटेवरच मातीने भरून पुर्णपणे बुजलेले दुसरे टाके दिसते. येथुन दहा मिनिटे चालत उध्वस्त अवशेष पहात आपण किल्ल्याच्या उतवड डोंगरासमोर असलेल्या दुसऱ्या टोकाला पोहोचतो. या टोकाला असलेला बुरुज व अवशेष पुर्णपणे मातीखाली गाडले गेले आहेत. येथुन पठाराच्या दुसऱ्या बाजुने आपण आलो त्या दरवाजाच्या दिशेने निघावे. या वाटेवर आपल्याला सुरवातील एक समाधीचा कोरीव दगड व त्यापुढील भागात एक खडकात खोदलेले टाके दिसते. या टाक्याच्या पुढील बाजूस ३-४ वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. या पुढील भागात वाटेच्या डाव्या बाजुस व पठाराच्या खालील अंगास एका योजनाबद्ध वस्तीचे उध्वस्त अवशेष दिसतात. किल्ल्यावर खुप मोठया प्रमाणात वास्तु अवशेष दिसुन येतात. गडाच्या माथ्यावरून जवळचा उतवड व फणीचा डोंगर, हरिहर,ब्रम्हाडोंगर, त्रिंबकगड, अंजनेरी इतका लांबचा प्रदेश दिसुन येतो. किल्ल्याच्या दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरीस दोन तास लागतात. गडावर ७-८ टाकी असली तरी पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे पुरेसे पाणी सोबत बाळगावे. इतिहासात या किल्ल्याचा फारसा उल्लेख आढळत नाही पण देवगिरी, बहामणी, निजामशाही मोगल, मराठे, कोळी, पेशवे आणि इंग्रज अशा अनेक राजसत्ता या गडावर नांदल्या आहेत. कातळात खोदलेला पायरीमार्ग व किल्ल्यावर खडकात खोदलेली पाण्याची टाकी पहाता या किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात अथवा समकालीन राजसत्तेच्या काळात झाली असावी असे वाटते. इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली व नंतर बहामनी व निजामशाहीच्या ताब्यात होता. १६३६ साली शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी शेजारचा त्र्यंबकगड व हरीहर घेतल्यावर हा परीसर त्यांच्या ताब्यात गेला. नंतर मात्र याचा ताबा मोगलांकडे गेला. १६७०-७१ मध्ये नाशीक प्रांत घेताना मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पुढे तो पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीशांनी हरीहरगड जिंकल्यावर हा गड देखील मराठयांच्या ताब्यातून घेतला.
© Suresh Nimbalkar