फतेपुर
प्रकार : नगरकोट
जिल्हा : नंदुरबार
उंची : 0
श्रेणी : सोपी
एकेकाळी खानदेशात असणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर स्वतंत्र जिल्हा म्हणुन अस्तित्वात आले. नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीमुळे या जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झालेले असुन जिल्ह्याच्या सीमा थेट मध्यप्रदेश व गुजरात राज्याला भिडल्या आहेत. अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतर कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. यात फतेपुर या कोटाचा उल्लेख असुन फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
...
यात १३ गढीकिल्ले असुन त्यात १ गिरिदुर्ग, ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. फतेपुरचा नगरकोट हा त्याचे एक उदाहरण आहे. एकेकाळी खानदेशाचा भाग असणारे हे गाव खानदेशच्या विभाजनानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचा भाग बनले. फतेपुर कोट दक्षिण नंदुरबार भागात राज्य महामार्ग क्र.१ वर फतेपुर गावात शहादा पासुन १५ कि.मी. अंतरावर आहे. फतेपुरला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार अथवा शहादा गाठावे लागते. नंदुरबार फतेपुर हे अंतर ५५ कि.मी.असुन प्रकाशा- म्हसवड मार्गे तेथे जाता येते. फतेपुर गाव नदीच्या काठावर असुन कोटाचा उरलेला एकमेव अवशेष म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. हा दरवाजा मुख्य रस्त्यावरच असल्याने शोधण्यास फारशी अडचण येत नाही. कोटात असलेल्या वस्तीने किल्ल्याचे उर्वरित अवशेष नष्ट केल्याने कोटाचा आकार व इतर अवशेष याबाबत अंदाज करता येत नाही पण कोटाचा २५ फुट उंचीचा भव्य दरवाजा व त्याची कमान पहाता या कोटात पुर्वीपासुनच मोठया प्रमाणात वस्ती असावी. दरवाजाची कमान पुर्णपणे विटामध्ये बांधलेली असुन त्यावर चुन्याचा गिलावा करून शिल्पे कोरलेली आहेत. हा गिलावा मोठया प्रमाणात नष्ट झाला असला तरी काही ठिकाणी कोनाड्यात कोरलेली शिल्पे पहाता येतात. कमानीच्या आत दोन्ही बाजुस देवड्या असुन या देवड्यातील भिंती कोनाड्यानी सुशोभित केलेल्या आहेत. या कमानीखाली भले मोठे तळघर असुन कमानीच्या बाहेरील बाजुने आत शिरण्यासाठी लहानसा दरवाजा आहे. असाच एक अर्धवट बुजलेला दरवाजा देवडीच्या आतील बाजूस आढळतो. सध्या या तळघरात कमानी शेजारी असलेल्या घराने सांडपाणी सोडले आहे. गावातील वाढत्या वस्तीमुळे कोटाची तटबंदी पुर्णपणे नष्ट झालेली असुन रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला काही अवशेष शिल्लक आहेत. येथे एका चौथऱ्यावर गावकऱ्यांनी पत्र्याचे मंदिर बांधलेले असुन त्यात काही प्राचीन मुर्ती ठेवलेल्या आहेत. यात एक भैरवाची मुर्ती आहे. कोट फार पुर्वीपासुनच नष्ट झाला असल्याने स्थानिकांना देखील फारशी माहिती देता येत नाही. कोटाचे फारसे अवशेष नसल्याने १५ मिनिटात कोट पाहुन होतो. सुलतानपुर हे ठाणे फतेपुरपासुन केवळ ९ कि.मी.असल्याने सुलतानपुरच्या घटनांचा संबंध फतेपुरशी देखील येत असावा. खानदेशचा पहिला सुलतान फारुकी मलिकराज यांने सुलतानपूर व नंदुरबार हीं शहरे व त्याचा आसपासचा परीसर इ.स.१५३० सालीं ताब्यात घेतला परंतु गुजरात सुलतान मुजफर ह्याच्या आक्रमणाने फारुकी मलिकराज याला थाळनेराकडे परतावें लागलें. इ.स. १५३६ मध्यें महंमदशहा बेगडा या गुजरातच्या सुलतानाने सुलतानपूर व नंदुरबार हीं ठाणीं व हा भाग मुबारकखान फारुकी यांस दिला. खानदेशात फारुकी सत्ता असताना त्यात फतेपुरचाही समावेश होता. धुळे जिल्हा गॅझेटप्रमाणे १६३४ मध्ये शहाजहानने खानदेशातील सुलतानपूर आणि नंदुरबार हे प्रांत माळवा प्रांताला जोडुन त्यांचे मुख्य केंद्र बु-हाणपूर ठेवले होते.
© Suresh Nimbalkar