धारासुर

प्रकार : प्राचीन शिवमंदीर/विष्णुमंदीर

जिल्हा : परभणी

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात दैठणच्या पुढे १ कि.मी.वर उजव्या हाताला एक फाटा लागतो तिथून ७ कि.मी.वर धारासुर हे ऐतीहासीक गाव आहे. गावात कदम आणि जाधव आडनावाची लोक असुन गावात मराठा कालखंडातील भव्य वाडे तसेच गावाभोवती वेस आहे. धारासुर हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसले असुन स्थानिकांच्या सांगण्यानुसार नदीच्या मध्य भागात म्हणजेच धारेमधे महादेवाची पिंड व नंदी असल्यामुळे या गावाचे नाव धारेश्वर व त्याचा अपभ्रंश होऊन धारासुर असे झाले आहे. गावामध्ये चालुक्यकालीन प्राचीन व सुंदर शिल्प कलाकृतीनी सजलेले गुप्तेश्वर हे शिवमंदीर तसेच पेशवेकालीन केशवराज मंदिर आहे. गुप्तेश्वर मंदिर हे चालुक्यकालीन असून मुळ मंदिराच्या दगडी बांधकामावर नंतरच्या काळात विटांचा कळस बांधण्यात आला आहे. गुप्तेश्वर मंदिर पूर्वभिमुख असुन मंदिराच्या पश्चिमेकडून गोदावरी नदी वाहते. ... मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण बाजूस अर्धमंडप आणी कक्षासने असुन उत्तर बाजुचा मंडप पूर्णपणे कोसळलेला आहे व त्याचे कोरीव दगड सर्वत्र विखुरलेले आहेत. मंदिराचा तळखडा साधारण १० फूट उंच असून त्यावर गजथर आहे. सभामंडपात रंगशिळा असून अंतराळाच्या सुरवातीस दगडी नक्षीकाम असलेली जाळी आणि द्वारशाखा युक्त दरवाजा आहे. ललाटबिंबावर गणेश असून अंतराळात प्रवेश केल्यावर मुख्य गर्भगृहाच्या द्वारशाखेवर पात्र,गंधर्व, स्तंभ,व्याल, स्वल्प अशा पाच शाखा दिसून येतात. दरवाजावरील द्वारपाल वैष्णव म्हणजेच जयविजय असुन गंगायमुनासह चामरधारिणी कोरल्या आहेत. गाभाऱ्यात अलीकडे स्थापन केले लहानसे शिवलिंग असून अंतराळातील पितळेचा नंदी हल्लीच्या काळातील आहे. गर्भगृहाकडे आणि मंदिराच्या एकंदरीत रचनेकडे पहाता पूर्वीच्या विष्णू मंदिराचे नंतरच्या काळात शिवमंदिरात परिवर्तन झाले असावे असे वाटते. सभामंडपात २ देवकोष्ठके असुन त्यातील मुर्ती मात्र जागेवर नाहीत. मंदिराच्या जंघा भागात उत्कृष्ट कोरीव काम केलेल्या अप्सरा, गणेश, सुरसुंदरी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराबाहेरील उत्तर दक्षिण आणि पश्चिम भिंतींवरील देवकोष्ठात श्रीधर, ऋषिकेश, पदमनाभ स्वरूपातील विष्णुमूर्ती आहेत. मूर्तींच्या केशरचना, शरीरसौष्ठव ,अलंकार , भावमुद्रा ,लयबद्धता याबाबत शिल्पकाराने त्याचे पुर्ण कसब पणाला लावले आहे. मंदिराबाहेरील दक्षिण भिंतीवर पत्र लिहिणारी प्रेमिका असून तत्कालीन समाजात स्त्री शिक्षण असल्याचा हा पुरावा आहे. मंदिराच्या बाह्य भागावर एक गाऊनसारखे विदेशी वस्त्र घातलेल्या सुरसुंदरीच्या शिल्पात काखेत कागदाची भेंडोळी दर्शविलेली असून एक हात उंचावलेला आणि पंजा अभय मुद्रेसारखा उघडलेला दाखवला आहे. एका शिल्पात स्त्रीची प्रसुती दर्शविली आहे. याशिवाय मंदिराच्या बाह्यभागावर विषकन्या, आम्रपाली, पुत्रवल्लभा,दर्पणा यासारख्या अनेक सुरसुंदरी कोरल्या आहेत. मंदिराचा ताबा पुरातत्व खात्याकडे असुन पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या अलीकडील भागात पेशवेकालीन केशवराज मंदिर असून त्यात काळ्या पाषाणात कोरलेली अतिशय सुंदर विष्णुमूर्ती आहे. हि मुर्ती कदाचीत गुप्तेश्वर मंदिरातील मुळ मुर्ती असावी. विध्वंसक आक्रमकांच्या काळात ती मंदिरातुन हटवून इतरत्र लपविण्यात आली असावी पण नंतर मूळ जागी नेणे शक्य न झाल्याने तिची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली असावी. मंदीर व मुर्तीस्थापत्याची आवड असणाऱ्यानी या स्थानाला जरूर भेट द्यायला हवी. ------------(टिप— सदर मंदिराची व शिल्पांची माहीती मंदीर व मुर्तीशास्त्राचे अभ्यासक श्री.सागर पाटील यांनी दिलेली असुन शब्दांकन श्री. सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.)
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!