दोंडाईचा
प्रकार : गढी
जिल्हा : नंदुरबार
उंची : 0
श्रेणी : सोपी
खानदेश प्रांत साडे बारा रावलांचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि येथील कुळांना मिळालेली पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी, परमार, प्रतिहार अशी वेगवेगळी कुळे आहेत. हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा 8.लामकानी ९.चौगाव १०. हटमोईदा ११.रनाळे १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. यातील आष्टे, लांबोळा,चौगाव, हटमोईदा या ४ गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या आहेत तर उरलेल्या ५ गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. यातील ४ गढी मात्र आजही त्यांच्या मूळ रुपात शिल्लक आहेत. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत पण दोंडाईचा गढी मात्र याला अपवाद आहे.
...
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयसिंह रावळ यांचे निवासस्थान असलेली हि गढी त्यांच्या योग्य परवानगीने बाहेरून व आतील काही भाग पहाता येतो. दोंडाईचा गढी सिंदखेडे तालुक्यात धुळ्यापासून ५७ कि.मी. अंतरावर तर नंदुरबारपासुन ३५ कि.मी. अंतरावर आहे. अमरावती व भोगावती नदीच्या संगमावर हि गढी असुन गढीच्या आत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री माननीय जयसिंह रावळ यांचे निवासस्थान आहे. त्रिकोणी आकाराची हि गढी साधारण तीन एकर परिसरात पसरलेली असुन गढीच्या आवारात जयसिंह रावळ यांचे कार्यालय आहे तर अंतर्गत भागात रावळ परिवाराचा महाल आहे. गढीचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन गढीची नदीच्या काठाने असलेली मूळ तटबंदी आजही शिल्लक आहे. गढीच्या आवारात महालाचा मुख्य दरवाजा असुन या दरवाजात दोन लहान तोफा चाकाच्या गाड्यावर ठेवलेल्या पहायला मिळतात. महालाच्या दरवाजाच्या आतील बाजूस रावळ यांचे खाजगी कार्यालय असुन केवळ तिथपर्यंत मर्यादित प्रवेश दिला जातो. या कार्यालयात आपल्याला जुन्या काळातील कागदपत्रे तसेच गढीची जुनी छायाचित्रे व इतर काही वस्तु पहायला मिळतात. येथे आपले गढीदर्शन पूर्ण होते. गढीभोवती फेरी मारताना तटबंदीत असलेले चार बुरुज पहायला मिळतात. गढी व परीसर पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. खिलजीच्या आक्रमणानंतर राजपुतांची २४ कुळे अभयसिंह रावल यांच्या नेतृत्वाखाली मांडूच्या दिशेने गेली. त्यांचा मुलगा अजयसिंह रावल याने इ.स १३३३ मध्ये अमरावती नदीकिनारी आपली जहागीर स्थापित करून लहान किल्ला बांधला तोच हा दोंडाईचा किल्ला. दोंडाईचा परिसरातील ५२ गावावर या संस्थानाचा अधिकार चालत होता. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावलांचे अधिकारात त्या सत्ताधीशांनी कोणतेच बदल केले नाही.
© Suresh Nimbalkar