दुर्गाडी

प्रकार : एकांडा बुरुज

जिल्हा : चंद्रपूर

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याची भटकंती करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पोर्तुगीजांनी निर्माण केलेली एकांडा बुरुजांची साखळी पहायला मिळते. त्यामुळे माझा असा समज झाला होता कि एकांडा बुरुज हि पोर्तुगीजांनी संरक्षणाच्या दृष्टीने निर्माण केलेली साखळी हि त्यांचीच युद्धशास्त्रातील देणगी आहे. पण चंद्रपूर जिल्ह्याची भटकंती करताना मला चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अशी एक दोन नव्हे तर चनई-विहीरगाव-रुपापेठ-दुर्गाडी अशी चक्क चार बुरुजांची साखळी पाहायला मिळाली आणि एकांडा बुरुज हि पोर्तुगीजांनी देणगी आहे हा माझा समज खोटा ठरला. यातील विहीरगाव येथील बुरुज वगळता इतर तीन वास्तु मात्र मोठ्या प्रमाणात ढासळलेल्या अवस्थेत आहेत. दुर्गाडी गावात असलेला बुरुज त्यापैकी एक. या एका बुरुजामुळे गावाला दुर्गाडी नाव मिळाल्याचे स्थानिक सांगतात. दुर्गाडी गाव चंद्रपूर जिल्ह्यापासून ६४ कि.मी. अंतरावर तर कोरपना या तालुक्याच्या ठिकाणाहुन फक्त १४ कि.मी. अंतरावर आहे. कोरपना-अदिलाबाद महामार्गापासुन हे गाव फक्त २ कि.मी.आत आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात हा बुरुज असुन त्याच्या सभोवती आजचे दुर्गाडी गाव वसलेले आहे. ... या बुरुजाला लागुनच गावातील चौक असुन या चौकात बुरुजाला लागुनच राजमाता आहिल्याबाई होळकर यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. दुर्गाडी बुरुज व रुपापेठ बुरुज यांची रचना एकसमान असुन हे दोन्ही बुरुज एकाच राजवटीत व एकाच स्थापात्यकाराने बांधले असावेत असे वाटते. गोलाकार आकाराचा हा बुरुज साधारण ४० फुट उंच असुन बुरुजाच्या बांधकामात लहान चपट्या दगडांचा वापर केलेला दिसून येतो. बुरुजाचे एकुण बांधकाम पहाता हा बुरुज गोंड राजांच्या काळात बांधला गेला असावा असे वाटते. बुरुजाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन त्याच्या वरील भागात मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढलेले आहेत व हि झुडुपे तटावरून खाली लटकलेली आहेत. या झुडुपांणी बुरुजाचा वरचा झाकोळला असुन त्याचे प्रवेशद्वार आहे कि नाही ते कळत नाही तर बुरुजाच्या जीर्ण अवस्थेमुळे त्यावर चढणे धोकादायक आहे. बुरुजात प्रवेश करण्यासाठी पुर्वी शिडीचा वापर केला जात असावा. बुरुजाचे प्रवेशद्वार बाहेरून दिसत नसले तरी ते विहीरगाव बुरुजाप्रमाणे जमिनीपासुन काही उंचावर असावे. बुरुजाच्या पडझडीमुळे त्याचा आतील भाग म्हणजे कोठार,खोली, अंतर्गत जिना हे देखील गाडले गेले असावेत. संपुर्ण बुरुज पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. चंद्रपूर जिल्ह्याची भटकंती करताना खाजगी वाहन सोबत असल्यास चनई-विहीरगाव-रुपापेठ-दुर्गाडी अशी चार दुर्गस्थाने अर्ध्या दिवसात पाहुन होतात. गोंड राजांच्या काळात काही ठिकाणी गावाच्या-शहराच्या रक्षणासाठी एकांड्या बुरुजाची बांधणी करण्यात आली. दुर्गाडी बुरुजाची बांधणी देखील याच कारणाकरता करण्यात आली असावी. स्थानिक लोकांना बुरुजाबद्दल विचाले असता काहीही माहीत नाही असे उत्तर मिळते त्यामुळे या बुरुजाचा इतिहास अबोल आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!