त्रिंगलवाडी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : २८४० फुट

श्रेणी : सोपी

इगतपूरीच्या पश्चिमेस पसरलेल्या सह्याद्री डोंगररांगेत बळवंतगड. त्रिंगलवाडी, भास्करगड, हरीहर असे अनेक किल्ले दिसुन येतात. त्रिंगलवाडी हा या रांगेतील एक महत्वाचा टेहळणी किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. उत्तर कोकणातुन नाशिककडे येणाऱ्या थळघाट- गोंडाघाट -अंबोली घाट- या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत त्रिंगलगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. त्रिंगलगडास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्रिंगलवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. मुंबई ते त्रिंगलवाडी हे अंतर १३० कि.मी.असुन मुंबई नाशीक महामार्गावरील इगतपुरीहुन तेथे जाता येते तर नाशिकहून हे अंतर ५० कि.मी.असुन टाकेघोटी मार्गे तेथे जाता येते. त्रिंगलवाडी हे गाव निशाणवाडी,पत्र्याची वाडी आणि तळ्याची वाडी या तीन वाड्यांनी बनलेले असल्याने त्रिंगलवाडी म्हणुन ओळखले जाते. यातील गावाच्या शेवटी असलेल्या तळ्याची वाडी या वाडीतून किल्ल्यावर जाणारी जवळची पायवाट आहे. ... गावामागे असलेल्या तलावाच्या वाटेने शेताच्या बांधावरून २० मिनिटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पांडवलेणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या शतकातील जैन लेण्यांकडे पोहोचतो. सध्या हि लेणी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असुन येथे उत्खननाचे काम चालु आहे. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला असुन यात बऱ्याच भग्न मुर्ती पहायला मिळतात. जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी लेणी शके १२६६ मध्ये कोरल्याचे शिलालेखातून दिसते. आयताकार आकाराचे हे लेणे ३ भागात कोरलेले असुन ओसरी, सभामंडप व गाभारा अशी याची रचना आहे. व्हरांड्यात उजव्या व डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या बसण्यासाठी जागा असुन द्वारपट्टीच्या खालील भागात तीर्थंकरांच्या मूर्ती व गणांची शिल्पे आहेत. दरवाजावरील द्वारपट्टीवर सुंदर कोरीवकाम केलेले असुन दरवाजाच्या दोन्ही बाजूस सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी जाळीदार गवाक्ष कोरलेले आहेत. व्हरांड्यात दरवाजाच्या वरील बाजूस छतावर हातात हात गुंफलेले यक्ष गोलाकार कोरलेले आहेत. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त असुन मंडपाच्या आतील कोनाड्यात कोरीवकाम केलेले आहे. मंडपात छताला आधार देण्यासाठी कोरलेल्या ४ खांबापैकी ३ खांब पडलेले असुन त्यांच्या शिल्लक असलेल्या वरील भागात यक्ष कोरलेले दिसतात. विहाराच्या आतील गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली भग्न मुर्ती असून मूर्तीच्या आसनावर झिजलेला शिलालेख आहे. संस्कृत भाषेतील हा शिलालेख देवनागरी लिपीत कोरलेला आहे. लेण्यांच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे. या लेण्यांच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरावरच त्रिंगलवाडी किल्ला असुन लेण्यांच्या डाव्या बाजूने गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण गडाखालील माचीवर पोहोचतो. गडाची एक सोंड या माचीवर उतरताना दिसते. माचीवरून १५ मिनिटात आपण या डोंगरसोंडेवर पोहोचतो. डोंगरसोंडेवरील या वाटेने वर जाताना मातीखाली गाडलेल्या पायऱ्या दिसुन येतात. समोरच त्रिंगलवाडी किल्ल्याचा कातळमाथा दिसतो. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याला पुर्वपश्चिम असे दोन दरवाजे असुन गडाचा पश्चिम दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या कातळमाथ्याखालून या दरवाजाकडे जाण्यासाठी उजवीकडून व डावीकडून अशा दोन वाटा आहेत. किल्ला चढतांना डावीकडील म्हणजेच पश्चिमेकडील कोकण दरवाजाने चढुन पूर्वेकडील दरवाजाने खाली उतरल्यास संपुर्ण किल्ला व्यवस्थित फिरून होतो. डावीकडील वाट कडा उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत एक सोपा कातळटप्पा पार करत किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत पोहोचते. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फ़ोडून दिड फुट उंचीच्या साधारण ६० पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या शेवटी उजव्या बाजुला खडकात खोदलेला दक्षिणाभिमुख दरवाजा असुन पायऱ्यासमोरील चौथऱ्यावर सहा-सात फुट उंचीची हनुमान मुर्ती कोरलेली आहे. दरवाजावरील दोन्ही कोपऱ्यात दोन शरभ कोरलेले असुन त्याखाली चंद्रसुर्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी अर्धवट कोरलेल्या देवड्या आहेत. दरवाजाच्या आतील वाटेवर मोठमोठे दगड ढासळून आले आहेत. दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजुला दरी तर डाव्या बाजुला बालेकिल्ल्याचा कातळ माथा आहे. येथे एक वाट वरील बाजूस या कातळ पायथ्याकडे जाताना दिसते. या वाटेने वर आले असता आपल्याला कातळात खोदलेले पाण्याचे एक भलेमोठे जोडटाके दिसते. सध्या या टाक्यात दगड पडलेले असुन टाके कोरडे ठणठणीत आहे. येथुन परत खाली येऊन बालेकिल्ल्याच्या कातळमाथ्याला वळसा घालत आपण किल्ल्याच्या पुर्वभागात येतो. येथे बऱ्यापैकी सपाटी असुन गडाचे बहुतेक अवशेष या सपाटीवर आहेत. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३१४८ फुट असुन गडाचा परीसर साधारण २४ एकरवर पसरलेला आहे. येथे आल्यावर समोरच भिंती शिल्लक असलेल्या एका मोठया वाड्याचे अवशेष दिसतात. वाडयाच्या मागील बाजुस गडाचा दक्षिण बुरुज असुन या बुरुजावरून आपण चढुन आलेली डोंगरसोंड नजरेस पडते. वाड्यासमोरच एका दुसऱ्या वास्तुचे अवशेष दिसुन येतात. या वास्तुच्या खालील बाजुस गडाचा पुर्व दरवाजा आहे पण तेथे न जाता प्रथम गडाच्या माचीवर फेरी मारून घ्यावी. या भागात असलेले कातळातील खळगे व घरांचे अवशेष पहाता गडावरील वस्ती या भागात असावी. पायवाटेवरुन पुढे जातांना एक वाट खाली उतरताना दिसते. हि किल्ल्याच्या पुर्व दरवाजातुन येणारी वाट आहे. पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजुला खडकात खोदलेले पण पाणी नसलेले एक टाके आहे व त्यापुढे गाळाने भरलेले दुसरे लहान टाके आहे. वाटेच्या उजव्या बाजूस कडयाच्या टोकाला चौकीचे अवशेष दिसुन येतात. वाटेच्या डाव्या बाजुला साचपाण्याचा तलाव असुन त्याच्या वरील भागात बालेकिल्ल्याच्या टेकडीत एक बुजलेले टाके व त्यालगत अर्धवट तोंड बुजलेली एक गुहा दिसुन येते. वर चढुन हे टाके व गुहा पाहुन पुढे निघाल्यावर कातळात कोरलेली दुसरी मोठी गुहा दिसते. या गुहेत २० ते २५ जण सहज राहु शकतात. या दोन्ही गुहा पाहून पुढे निघाल्यावर वाटेत दोन सुकलेली टाकी लागतात व त्यापुढे पिण्याच्या पाण्याचे खांबटाके लागते. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी हि एकमेव बारमाही सोय आहे. टाक्यांवरून पुढे जाणारी वाट गडाच्या उत्तर टोकावर असलेल्या घुमटीवजा भवानी मंदिराकडे घेऊन जाते. या मंदिरात शेंदूर लेपलेली भवानी,गणपती व भैरोबाची सुबक मुर्ती असुन मंदिराबाहेर उघडयावर शिवलिंग आहे. मंदिरासमोर खालच्या बाजूला विरगळाचे शिल्प ठेवलेले आहे. मंदिराच्या उत्तरेकडील बुरुजावरून पूर्वेला कळसुबाई तर उत्तरेला हरिहर, बसगड हे किल्ले दिसतात. मंदिरामागुन गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेने वर चढुन दुसऱ्या बाजुने खाली उतरता येते. बालेकिल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत पण येथुन संपुर्ण गडाची माची पहाता येते. गडाला तुरळक तटबंदी असुन गडमाथ्यावरून सह्यादीची सुंदर रांग दिसते. इथून त्रिंगलवाडीचा जलाशय, दक्षिणेला इगतपुरी, वैतरणा खोरे, त्र्यंबकरांग, कावनाई, मोरधन,अलंग, कुलंग असा संपूर्ण प्रदेश पहाता येतो. बालेकिल्ल्यावरून आपण सुरवातीला पाहीलेल्या वाड्याकडे उतरतो.येथुन गडाच्या पूर्वेकडील दरवाजाने गड उतरण्यास सुरवात करावी. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा पुर्णपणे ढासळलेला असुन केवळ तटबंदी शिल्लक आहे. गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक लहान गुहा दिसते. अशीच एक गुहा पायऱ्या उतरल्यावर समोरच्या बाजूस कोरलेली दिसते.पायऱ्या उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास २ तास लागतात. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. कवि जयराम पिंड्ये यांच्या पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान या काव्यात त्रिंगलगडाचा उल्लेख आलेला आहे. अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः॥ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही पण नाशीक प्रांत काबीज करताना मोरोपंत पिंगळ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला असावा. १६८८ साली मोगलांनी फितुरीने मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला. मातब्बरखानाने औरंगजेबाला पाठविलेल्या पत्रात त्रिंगलगडला वेढा घातल्याचा उल्लेख मिळतो. थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात २० एप्रिल १७४४ रोजी कर्णाजी शिंदे यांनी त्रिंगलवाडी किल्ला फत्ते केल्याची नोंद आढळते. १८१८ साली त्रिंगलगड ताब्यात घेतल्यानंतर कॅप्टन ब्रिग्जने तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उध्वस्त केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!