चिमुर

प्रकार : भुईकोट

जिल्हा : चंद्रपुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

विदर्भाच्या काही भागात गोंड राजसत्तेने जवळपास ६०० वर्ष राज्य केले. या काळात त्यांनी काही किल्ल्यंची पुनर्बांधणी केली तर काही किल्ले नव्याने बांधले. नागपुर,चंद्रपुर या भागातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. यातील काही किल्ले आजही त्यांच्या राजसत्तेच्या खुणा सांभाळत ठामपणे उभे आहेत तर काही किल्ले काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट होऊन केवळ आठवणीत उरले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे असलेला किल्ला आज केवळ आठवणीतील किल्ला म्हणुन शिल्लक आहे. चिमुर हे तालुक्याचे ठिकाण वर्धा व चंद्रपुर या दोन्ही ठिकाणापासून १०० कि.मी.अंतरावर आहे. उमा नदीकाठी वसलेले चिमुर गाव प्रसिद्धीस आले ते १९४२ मधील भारत छोडो आंदोलनामुळे. १९४२ मधील ऑगस्ट महिन्यात नागपंचमीच्या दिवशी चिमुर गावातील सहा क्रांतीकारकांनी पोलीस गोळीबारात हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिमुर किल्ला येथे त्यांचे स्मारक बनवण्यात आले. हि घटना नागपंचमीच्या दिवशी घडल्याने येथे नागशिल्प उभारून त्यावर हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. ... शिवाय ज्यांनी आपल्या कीर्तनातुन लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा येथे उभारण्यात आला आहे. हे स्मारक ज्या ठिकाणी बनविले त्या ठिकाणावर चिमुरचा किल्ला होता. या ठिकाणापासुन जवळच असलेल्या हनुमान मंदीरात गोंड राजसत्तेच्या खुणा सांगणारी दोन व्याघ्रशिल्प पहायला मिळतात. या व्यतिरिक्त हे स्मारक बनवताना किल्ल्याचे सर्व अवशेष नष्ट झाले असुन किल्ला म्हणुन ओळखण्यासाठी कोणतीही खुण येथे शिल्लक नाही. गावातील कोणत्याही व्यक्तीला किल्ला विचारल्यास ते तुम्हाला या ठिकाणावर बरोबर पाठवतात. किल्ला अस्तिवात नसुन देखील स्थानिकांना हे ठिकाण बरोबर माहित असल्याने मी या किल्ल्याचा आठवणीतील किल्ला म्हणुन केला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!