खारबाव कोट
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : ठाणे
उंची : 0
श्रेणी : सोपी
प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडीमार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्या जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी उल्हास खाडीच्या दक्षिणेला घोडबंदर, नागलाबंदर, गोमुख व ओवलेकोट हे चार किल्ले बांधले गेले तर उल्हास खाडीच्या उत्तरेला नागले, खारबाव, फिरंगकोट, कांबेकोट हे छोटे छोटे कोट बांधले गेले. वसई खाडी व उल्हास नदी यांच्या बेचक्यात एका छोट्याशा टेकडीवर खारबाव कोट बांधला गेला. वसई खाडी व उल्हास नदीचे रक्षण करण्यासाठी खाडीच्या मुखाशी पोर्तुगिजांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. वसई-चिंचोटी-अंजूरफाटा-भिवंडी मार्गावरुन खारबाव गावात जाता येते. खारबाव किल्ला एका छोटयाशा टेकडीवर वसलेला असुन या कोटाविषयी स्थानिकांना किल्ला म्हणुन काहीही माहित नाही. खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र या किल्ल्यात वसलेले असुन या केंद्राची चौकशी केल्यास सहजपणे किल्ल्यात पोहोचता येते
...
अथवा दूरवरून दिसणारी खारबाव गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकीदेखील याच किल्ल्याच्या आवारात आहे. हि खुण लक्षात ठेवल्यास सहजपणे किल्ल्यात जाता येते. खारबाव किल्ल्याचा आकार साधारणपणे चौकोनी असुन आज याचा केवळ एक बुरुज आणि तटबंदीची भिंत काही प्रमाणात शिल्लक आहे. येथील स्थानिकांशी बोलताना कळते कि आरोग्य केंद्राची पुनर्बांधणी करेपर्यंत काही वर्षापूर्वी या किल्ल्याचा अजून एक बुरुज व बरीचशी पडीक तटबंदी शाबुत होती पण आरोग्य केंद्राचे नवीन काम करताना ती पाडण्यात आली. कोटाचा आजही शिल्लक असलेला बुरुज दुमजली असुन त्यात आत शिरण्यासाठी छोटासा दरवाजा आहे. बुरुजावर तोफा व बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. खारबाव कोटाचा केवळ इतकाच अवशेष शिल्लक असल्याने त्याची निगा राखली आहे पण बुरुजाच्या भिंतींवर झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे बुरुजाच्या भिंतींमध्ये खोलवर रुतत चालली आहेत. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड,चिकटमाती, चुना यांचा वापर केला गेलेला दिसतो. या कोटाच्या आकारमानावरून येथे जकातीचे व टेहळणीचे ठाण्याशिवाय प्रशासकीय चौकी आणि सैन्य व रसद यांची देखील व्यवस्था असावी. सदर कोट छोटेखानी असून पंधरा मिनिटात पाहून होतो. कोटाच्या तटबंदी बाहेर जरीमरी देवीचे मंदिर आहे. आज जरी किल्ला पुर्णपणे अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान आणि वसई खाडी व उल्हास नदीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३९ मध्ये मराठयांच्या वसई मोहिमेत खारबाव,कांबे,फिरंगीपाडा हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar