खामगाव
प्रकार : नगरकोट
जिल्हा : बुलढाणा
उंची : 0
श्रेणी : सोपी
बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव हे तालुक्याचे शहर मध्ययुगीन काळापासून बाजारपेठ म्हणुन प्रसिध्द आहे. मलकापुर-बाळापुर या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर असलेले हे शहर चांदीसाठी प्रसिद्ध होते. चांदीच्या व्यापारामुळे भरभराटीला आलेल्या या शहराभोवती तटबंदी व दरवाजे बांधुन त्याला सरंक्षित करण्यात आले होते. इतिहासात खामगाव नगरदुर्गाचे ओझरते उल्लेख येतात पण या नगरदुर्गाचे बांधकाम नेमके कोणत्या कालावधीत झाले याचे आकलन होत नाही. वाढत्या शहरामुळे काळाच्या ओघात या दुर्गाची सर्व तटबंदी व दरवाजे नष्ट झाले असुन या तटबंदीतील केवळ एकच दरवाजा शिल्लक आहे. हा दरवाजा आता शिवाजी वेस दरवाजा म्हणुन ओळखला जातो. खामगाव रेल्वे स्थानकापासून शिवाजी वेस हे अंतर २ कि.मी.असुन एस.टी.स्थानकापासून ३ कि.मी. आहे. ह्या दरवाजाला तैलरंगात नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असुन दरवाजाच्या वरील भागात अश्वारुढ शिवाजी महाराज व मावळे यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत.
...
दरवाजाच्या आतील बाजुने दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. याशिवाय दरवाजाच्या आतील बाजुस नक्षीकामाने सजलेला एक लहानसा वाडा आवर्जुन पाहावा असा आहे. शहराच्या जुन्या भागात फेरी मारताना अनेक मध्ययुगीन वास्तु नजरेस पडतात पण किल्ल्याचा इतर कोणताही अवशेष दिसत नाही. किल्ल्याची फेरी दरवाजात सुरु होऊन तेथेच संपते. दरवाजा पहाण्यास १० मिनिटे पुरेशी होतात.
© Suresh Nimbalkar