खरपुडी
प्रकार : मंदीर / कोट
जिल्हा : पुणे
उंची : 0
राजगुरुनगर येथुन निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनाला जाताना वाटेत खरपुडी नावाचे गाव लागते. राजगुरुनगर पासुन खरपुडी हे गाव ६ कि.मी. अंतरावर आहे. या गावामागील डोंगरावर देखील खंडोबाचे मंदिर असुन त्याला निमगाव येथील मंदीराप्रमाणे किल्ल्यासारखी तटबंदी असल्याचे वाचनात आल्याने आम्ही या देवस्थानास भेट दिली. खरपुडी गावामागे असलेला डोंगर या भागातील उंच ठिकाण असुन तेथुन खूप दूरवरचा परीसर नजरेस पडतो. आजकाल देवस्थान आहे तिथपर्यंत रस्ता नेण्याचे खुळ आल्याने या मंदिरापर्यंत म्हणजे डोंगराच्या माथ्यापर्यंत रस्ता बांधताना या मंदिराभोवती असलेली एका बाजूची तटबंदी मोठ्या प्रमाणात पाडण्यात आली आहे. हि तटबंदी पाडताना या मार्गावर असलेला मुख्य दरवाजा देखील नष्ट झाला आहे. गाडी माथ्यापर्यंत पोहोचली खरी पण मंदीराचे मूळ सौंदर्य त्यामुळे नष्ट झाले आहे. गाडी रस्त्याने जाताना या रस्त्याच्या वरील भागात असलेल्या तटबंदीतील लहान दरवाजा पहायला मिळतो. खाजगी वाहन घेऊन आपण मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या वाहनतळावर पोहोचतो.
...
मंदिराच्या मागील बाजुस असलेल्या या तटबंदीत आत जाण्यासाठी लहान दरवाजा असुन दोन्ही टोकावर लहान बुरुज आहेत. तटबंदी फारशी उंच नसुन तटाच्या आतील बाजुस राहण्यासाठी देवड्या आहेत. मंदीराचा जीर्णोद्धार करताना त्यातील मूळ वास्तुची मोडतोड करून नवीन वास्तु बांधण्यात आल्या आहेत. मंदिराची प्राकाराची तटबंदी व त्यातील काही ओवऱ्या वगळता इतर कोणतेही जुने अवशेष आता शिल्लक नाहीत. या टेकडीचे येथील भौगोलिक स्थान पहाता मंदिरासोबत टेहळणीसाठी या ठिकाणाचा वापर केला जात असावा असे वाटते. वाहनतळापर्यंत खाजगी वाहनाने आल्यास मंदिर परिसर पाहण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात पण पायथ्याहून मंदिरापर्यंत चालत आल्यास परत जाईपर्यंत साधारण तासाभराचा कालावधी लागतो.
© Suresh Nimbalkar