कामठा

प्रकार : भुईकोट

जिल्हा : गोंदीया

उंची : 0

विदर्भातील गोंदीया जिल्ह्यात आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच म्हणजे २-३ किल्ले पहायला मिळतात. प्रतापगड हा गिरीदुर्ग वगळता गोंदीया जिल्ह्यात एकही गिरीदुर्ग नाही आणि कामठा भुईकोट वगळता एकही भुईकोट नाही. कामठा येथे असलेला भुईकोट पाहिल्यावर याची एकुण बांधणी पहाता हा नेमका किल्ला आहे कि गढी हा प्रश्न देखील मनात उभा रहातो. गोंदीया जिल्ह्यात असलेला हा किल्ला गोंदीया शहरापासुन २० कि.मी. अंतरावर असलेल्या कामठा गावात असुन गोंदीया रेल्वे स्थानकातून बस अथवा रिक्षाने तेथे जाता येते. गावात पोहोचल्यावर कोणालाही जमीनदाराचा किल्ला म्हणुन विचारले असता आपण सहजपणे या किल्ल्यात पोहोचतो. खाजगी मालमत्ता असलेला हा किल्ला पृथ्वीराज सिंग नागपुरे यांच्या मालकीचा असुन ते रघूजीराजे भोसले यांचे सरदार नागपुरे यांचे सहावे वंशज आहेत. किल्ला पाहण्यास गेलो असता माझी त्यांच्या सोबत भेट झाली व किल्ल्याची बरीच माहीती मिळाली. किल्ल्याजवळ पोहोचले असता किल्ल्याबाहेर काही अंतरावर एक शिवमंदिर व त्याच्या आवारात दोन घुमटीवजा मंदीरे पहायला मिळतात. या शिवाय या मंदीराच्या आवारात एक समाधी चौथरा पहायला मिळतो. किल्ल्याचा दरवाजा चांगलाच प्रशस्त असुन दरवाजा बाहेर उजवीकडे हत्तीखाना बांधलेला आहे. ... यात दोन हत्ती बांधण्याची सोय असुन अगदी अलीकडील काळात देखील तेथे हत्ती बांधले जात होते. दरवाजासमोर आज सपाट मैदान दिसत असले तरी किल्ल्याच्या उर्वरीत भागात दोन बाजूस असलेला खंदक व एक बाजूस असलेला तलाव पाहता कधीकाळी या बाजूस देखील खंदक असावा. मुख्य दरवाजाची कमान व त्यातील लाकडी दार अजुन शिल्लक असुन दरवाजाच्या वरील बाजूस टोकदार खिळे ठोकलेले आहेत जेणे करून हत्तीच्या धडकेने दरवाजा तोडता येऊ नये. संपुर्ण तटबंदीचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन हे बांधकाम सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला आहे. एक दोन ठिकाणे वगळता किल्ल्याची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. या संपुर्ण तटबंदीमध्ये आपल्याला लहानमोठ्या आकाराचे एकुण तीन बुरुज पहायला मिळतात. यातील दोन बुरुज अष्टकोनी असुन एक बुरुज गोलाकार आहे. या तीनही बुरुजाच्या आत दालने असुन वरील बाजूस जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. गोलाकार आकार असलेला बुरुज हा आकाराने सर्वात मोठा असुन दुमजली आहे. कोटात प्रवेश केल्यावर समोर काही शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालया समोरच जगदंबा देवीचे नव्याने बांधलेले मंदीर आहे. या मंदीरासमोर दुसरे लहान मंदीर असुन या मंदिरात गणेशमुर्ती सोबत इतर काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. या मंदिराच्या आसपास आपल्याला किल्ल्याचे तीन बुरुज पहायला मिळतात. या भागातील तटबंदी काही प्रमाणात कोसळलेली असुन या तटबंदी बाहेर एक मोठा तलाव आहे. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. संपुर्ण कोट साधारण अडीच एकरवर पसरलेला असुन या कोटाच्या मध्यभागी नागपुरे यांचा वाडा आहे. या वाड्याच्या आवारात वाडयाला पाणीपुरवठा करणारी खोल विहीर आहे. कोटात असलेला जुना वाडा पाडुन त्याजागी हा नवीन वाडा ब्रिटीश काळात म्हणजे इ.स. १९३० मध्ये बांधला गेला आहे. या वाड्याचा अंतर्भाग , त्याची रचना व सामान हे मध्ययुगीन काळाला साजेसे असुन ते आजही त्याच्या मुळ स्वरूपात जतन करून ठेवलेले आहेत. किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता येथे सैन्याचा तळ असला तरी या कोटाचे बांधकाम हे एखाद्या गढी प्रमाणेच झालेले आहे यात काही संशय नाही. संपुर्ण कोट व वाडा पाहण्यास एक तास पुरेसा होतो. कामठा किल्ल्याचे बांधकाम हे अगदी अलीकडील काळात म्हणजे नागपुरचे राजे रघुजीराजे भोसले यांच्या काळात झालेले आहे. आज किल्ल्यात वास्तव्यास असलेले पृथ्वीराज सिंग नागपुरे यांचे पुर्वज राजा राय बहादुर इंद्रराज सिंह लोधी यांना ३८५ गावे व ७००० एकर जमीन नागपुरचे रघुजी राजे भोसले यांच्याकडून बहाल करण्यात आली. हि वतनदारी गोंदीया,चंद्रपूर व गडचिरोली अशी तीन जिल्ह्यात पसरलेली होती. राजा राय बहादुर इंद्रराज सिंह लोधी यांच्या मृत्यूनंतर हि वतनदारी त्यांच्या तीन मुलांमध्ये कामठा,फुलचुर व हिरडामाळी अशी वाटण्यात आली तरी कामठा संस्थान हे या तीन संस्थानातील एक प्रमुख संस्थान होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!