काठी
प्रकार : गढी
जिल्हा : नंदुरबार
उंची : 0
श्रेणी : सोपी
अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत
...
तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत. काठी संस्थानाची गढी हि त्यापैकी एक. आज या गढीचा चौथरा व एका बाजुची चार पाच फुटाची विटांची भिंत वगळता कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत त्यामुळे हि गोष्ट ध्यानात ठेवुनच या ठिकाणाला भेट दयावी. रेवा आणि तापी या नद्यांच्या मध्यवर्ती सातपुडा पर्वतरांगेत काठी गाव आहे. काठी संस्थान अक्कलकुवा तालुक्यात असुन नंदुरबार शहरापासून धानोरामार्गे हे अंतर ८५ कि.मी. आहे. काठी गावात रस्त्याला लागुनच या गढीचा १०० X ७० फुट आकाराचा उध्वस्त चौथरा व त्यावरील विटांची भिंत पहाता येते. सध्या या चौथऱ्यावर एक मंदिर बांधण्यात आलेले आहे. या चौथऱ्याच्या मागील बाजुस काठीचे संस्थानिक पाडवी यांचा १०० वर्षापुर्वी बांधलेला दुमजली वाडा असुन पाडवी यांचे एक वंशज तेथे रहातात. या वाड्यात ब्रिटीश काळातील पाडवी राजांची काही जुनी छायाचित्रे व कागदपत्रे आजही पहायला मिळतात. वाड्यात आमची भेट महेंद्रसिंग पाडवी या पाडवीच्या वंशजांबरोबर झाली. काठी संस्थान पाडवी घराण्याचे असुन या संस्थानचे राजे मानसिंग पाडवी शेवटचे राजे होते. त्यांचे वारस पृथ्वीसिंग पाडवी, महेंद्रसिंग पाडवी, रणजितसिंग पाडवी, बहादूरसिंग पाडवी, दिग्विजयसिंह पाडवी, राजेंद्रसिंग पाडवी आहेत. काठी संस्थानिकांच्या कागदोपत्री नोंदीनुसार १२४६ पासून संस्थान बरखास्त होईपर्यंत सोळा राजे झाले आहेत. श्री.पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटीश काळापर्यंत या भागातील गावांचा महसुल काठी संस्थानात जमा होत असे. थोडक्यात हि लढवय्या गढी नसुन महसुल जमा करण्याचे ठाणे होते.
© Suresh Nimbalkar