इरशाळगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रायगड
उंची : १८२० फुट
श्रेणी : कठीण
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताना अनेक गिरिशिखरे नजरेस पडतात. जातिवंत दुर्गप्रेमी वगळता इतरांना यातील नेमके किल्ले कोणते हे ओळखणे तसे कठीणच. यातील घाटमार्गाच्या खाली अगदी सहजपणे नजरेस पडणारे किल्ले म्हणजे पांडवगड, प्रबळगड,कर्नाळा,माणिकगड आणी इरशाळगड. मुंबईच्या जवळच असल्याने या सर्व किल्ल्यांची भटकंती एका दिवसात सहजपणे करता येते. इरशाळगड हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेला असाच एक किल्ला. गडावरील विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव ईरशाळगड झाले असावे. मुंबईहून जुन्या मुंबई- पुणे हायवेने जाताना चौक फाट्या अलीकडे २ कि.मी.वर इरशाळगडला जाणारा फाटा आहे. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहनाची सोय होते. रस्ता विचारताना इरशाळगड न विचारता ठाकरवाडी विचारावे कारण इरशाळगड वाडीपर्यंत रस्ता जात नसुन ठाकरवाडी पर्यंत जातो.
...
इरशाळगड वाडी हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव असुन ठाकरवाडीतुन तिथपर्यंत चालत जाण्यासाठी दीड तास लागतो. या वाटेने इरशाळगड वाडीचा चढ चढताना इरशाळगडाचे सुळके आणि नेढं नजरेस पडते. इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माचीतुन गडावर जातांना आधी डावीकडील सोंडेने वर चढुन नंतर कडयाच्या मागील बाजुने गडावर जाणारी वाट आहे. सुरवातीस कड्याशी सोपे प्रस्तरारोहण करत आपण गड चढायला सुरवात करतो. वाटेत पाण्याचे एक टाकं आहे. येथे एक लाकडी शिडी बसवलेली आहे. शिडी चढण्यापूर्वी डावीकडे एका कपारीत विशाळा देवीची मुर्ती बसवलेली आहे. तेथून पुढे शिडी चढून व सोपे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर डावीकडे पाण्याचे एक टाकं असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पण हे पाणी मार्च पर्यंतच असते. या टाक्याशेजारी एक कपार असुन येथुन प्रबळगडाच्या मागील बाजूचे सुंदर दर्शन घडते. इरशाळगड वाडीतून इथपर्यंत येण्यास एक तास लागतो. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. प्रस्तरारोहणाचे तंत्र व सामान वापरून सुळक्यावर जाणे शक्य असले तरी या सुळक्यातील दगड ठिसुळ असल्याने वर चढणे धोकादायक आहे. याआधी बऱ्याच गिर्यारोहकांचा येथे मृत्यु झाला असुन त्यांच्या नावाच्या पाट्या या नेढ्याजवळ लावण्यात आल्या आहेत. नेढ्याजवळुन समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर नजरेस पडतो. इरशाळगड म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. इरशाळगडावर पाण्याचे टाके व काही कोरीव पायऱ्या वगळता इतर कोणतेही अवशेष नसल्याने हा किल्ला आहे का? हा प्रश्नच आहे. इरशाळगडाचा इतिहासात उल्लेख आढळत नसल्याने त्याला गड म्हणणे योग्य ठरणार नाही. यावरील पाण्याच्या टाक्या पहाता हे केवळ एक पहाऱ्याचे अथवा टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते. इरशाळ गडाचा इतिहासात उल्लेख आढळत नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेंव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर यांचा जन्म इरशाळगडाच्या पायथ्याजवळ असलेल्या चौक गावात झाल्याचे मानले जाते. प्रस्तरारोहणाचा आनंद व आसपासचे निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी एकदा तरी इरशाळगडला भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar