आसनगाव कोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

मध्य रेल्वेवर असलेले आसनगाव रेल्वे स्थानक सर्वांना परीचयाचे आहे पण पश्चिम रेल्वेवरील वाणगाव जवळ असलेले आसनगाव तसे कोणालाच ठाऊक नाही. आमचा या आसनगावशी परिचय झाला तो येथे असलेल्या पोर्तुगीज माडीचा उल्लेख आल्याने. गुजरातच्या सरहद्दीवर असलेल्या कोटांची भटकंती करताना आम्हाला या कोटाची माहिती मिळाली व आमची पावले या कोटाच्या दिशेला वळली. उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. डहाणु-तारापुर या दोन किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात पोर्तुगीजांची निर्मिती असलेला आसनगाव कोट हा असाच एक लहानसा कोट. कोट लहानसा असला तरी त्याचे स्थान पहाता सामरिकदृष्ट्या तो अतिशय महत्वाचा असावा. आसनगाव कोट वाणगाव रेल्वे स्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर असुन खाजगी रिक्षाने आसनगावात वा गावाबाहेरील स्मशानापर्यंत जाता येते. ... गावात कोटाची चौकशी करताना माडी म्हणुन विचारणा करावी. स्मशानाकडून एक कच्चा रस्ता खाजणातुन तारापुर औष्णिक प्रकल्पाच्या दिशेने जाताना दिसतो. हा संपुर्ण भाग आता दलदलीचा असुन कधीकाळी डहाणु खाडीचे पात्र होते. पुर्ण भरतीच्या वेळेस पाणी आजही इथपर्यंत येते पण बंधाऱ्याच्या कच्च्या रस्त्याने त्याचे दोन भाग झाले आहेत. या कच्च्या रस्त्याने साधारण अर्धा कि.मी.चालत गेल्यावर उजव्या बाजुस झाडाझुडुपांनी वेढलेला आसनगाव कोट नजरेस पडतो. पोर्तुगीजांनी बांधलेल्या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. या कोटाचा आकार व रचना देखील काहीशी केळवे पाणकोट प्रमाणे आहे. पुर्वी भरतीच्या वेळी पाणी या कोटापर्यंत येत असावे. साधारण ८० x ५० फुट आकाराचा हा कोट असुन याचा बाहेरील भाग आज पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. कोटाच्या एका टोकावर असलेला दुमजली बुरुज आजही शिल्लक असुन केळवे पाणकोट प्रमाणे या कोटात देखील खिडकीतुन चढुन जावे लागते. या बुरुजावर उतरते छप्पर असल्याचे दिसुन येते. या कोटाच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा वापर केलेला असुन भिंतींना चुन्याचा गिलावा केलेला आहे. बुरुजावरील भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी खोबण्या दिसुन येतात. या वास्तुचे स्थान व बांधकाम पहाता हि वास्तु जकातनाका व टेहळणीचे महत्वाचे ठिकाण असावे. कोटाकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याने भिंतीवर मोठया प्रमाणात वडाची व पिंपळाची झाडे वाढलेली आहेत. संपुर्ण कोट पाहण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात. पोर्तुगालशी जलमार्गाने थेट संबंध ठेवता यावा यासाठी त्यांनी बहुतांशी कोट समुद्रकिनाऱ्यावरच बांधले. वसई ते दमण परिसरातील गढीकोट हे समुद्राशी समांतर रेषेत बांधलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमे दरम्यान डहाणु किल्ल्यासोबत हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला. प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!