आवाडे कोट

प्रकार : भुईकोट

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : 0

श्रेणी : सोपी

कोकणातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असुन काही किल्ल्यांचे अवशेष आजही शिल्लक असले तरी ते किल्ले मात्र विस्मृतीत गेलेले आहेत. अशा किल्ल्यांचे अस्तीत्व आज नावापुरते इतिहासाच्या पानातच उरले आहे. आवाडे कोट हा असाच विस्मृतीत गेलेला एक कोट. दोडामार्ग तालुक्यात असलेला आवाडे कोट आजही आपल्या अंगाखांद्यावर बऱ्यापैकी अवशेष बाळगून असला तरी केवळ हा किल्ला अस्तीत्वात नाही या गैरसमजुतीमुळे कोणीही या किल्ल्याकडे फिरकत नाही. आवाडे कोट उर्फ आवर किल्ला बांदा शहरापासुन ३५ कि.मी.अंतरावर तर दोडामार्गपासून १२ कि.मी. अंतरावर आहे. आवाडे कोट आसपासच्या परिसरात कोणाला माहीत नसला तरी आवाडे गावातील लोक मात्र या किल्ल्याची अचूक जागा दाखवतात इतकेच नव्हे तर किल्ला दाखवायला देखील येतात. आवाडे किल्ला गावाबाहेरुन वाहणाऱ्या तिलारी नदीच्या काठावर असुन या नदीचे पाणी किल्ल्याभोवती असलेल्या खंदकात फिरवले आहे. ... आजही या नदीचे पाणी काही ठिकाणी खंदकात आलेले दिसते. किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजुस मोठया प्रमाणात बांबुची झाडे वाढलेली असुन आपला प्रवेश हा खंदकात उतरुन नंतर किल्ल्यात होतो. खंदकाची रुंदी साधारण १५ फुट असुन खंदकात साठलेल्या मातीमुळे खोलीचा अंदाज करता येतय नाही. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झाला असुन त्याचे नक्की ठिकाण सांगता येत नाही. आपला किल्ल्यातील प्रवेश हा उध्वस्त तटातुन होतो. साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला एक एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज असावेत कारण तीन टोकाला तीन बुरुज असुन चौथ्या टोकाला मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने तिथपर्यंत जाता येत नाही. किल्ल्याचे बुरुज व तटबंदी घडीव चिऱ्यात बांधलेली असुन तटाची उंची केवळ चार ते पाच फुटापर्यंत शिल्लक आहे. बुरुजाची उंची थोडी जास्त असली तरी त्यावर मोठया प्रमाणात झाडे वाढली आहेत. किल्ल्यातील झुडुपातून वाट काढत फेरी मारताना १५ x २५ फुट आकाराची चारही बाजुच्या भिंती शिल्लक असलेली एक पडकी वास्तु पहायला मिळते. याशिवाय किल्ल्याच्या तटबंदीत एक शौचकुप व अंतर्गत भागात काही घरांचे चौथरे आहेत. किल्ल्यात पाणी पुरवठा करण्यासाठी एक चौकोनी आकाराची बांधीव विहीर असुन या विहिरीत आजही पाणी असते पण वापरात नसल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. गावकरी तटाच्या आतील भागात असलेला एक भाग तालीम म्हणुन दाखवतात. या भागाकडे जाण्यासाठी एक लहान दरवाजा पहायला मिळतो. झाडीझुडपातुन वाट काढत संपुर्ण किल्ला पहाण्यास अर्धा तास लागतो पण अवशेष दाखवण्यासाठी स्थानिक माणूस सोबत असायला हवा. वाडीकर फोंड सावंत यांनी इ.स.१७३२ च्या सुमारास पोर्तुगीजाच्या गोवा हद्दीजवळ आवाडे कोट बांधला. इ.स.१७३८-५५ च्या दरम्यान वाडी संस्थानात वारसाहक्काची भांडणे चालू असताना नानासाहेब पेशवे यांनी रामचंद्र सावंत यांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याचा उल्लेख आला आहे. त्यानंतर दुसऱ्या खेम सावंतांचा मुलगा नाग सावंत यांनी पंतअमात्य यांना आवाडे येथुन लिहिलेल्या पत्रात या कोटाचा उल्लेख येतो. इ.स.१७४६ मधील ऑक्टोबर महिन्यात सांखळीकर राणे व इतर देसाई सावंतांचा पक्ष सोडुन पोर्तुगीजांना सामील झाल्यावर सत्रोजी राणे यांनी सावंतांचा आवाडे व इतर काही कोट पोर्तुगीजांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हा कोट पुन्हा सावंतांच्या ताब्यात आल्याचे दिसते कारण इ.स.१८३२ मध्ये या किल्ल्यात असलेल्या लोकांची यादी व खर्चाची तरतुद सावंतवाडी दफ्तरात सापडते. इ.स.१८४४-४५ मध्ये करवीर प्रांतात ब्रिटीश सरकार विरुध्द उठाव झाल्याने या भागातील अनेक किल्ले पाडले गेले त्यात आवाडे कोट उध्वस्त केला गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!