गढी / कोट

प्राचीन काळापासुन ते मध्ययुगीन काळापर्यंत संरक्षणयुक्त वास्तु कोणती असा प्रश्न पडला तर आपल्या नजरेसमोर उभे रहातात ते गडकोट!!! या किल्ल्यांचा आपल्यावर इतका प्रभाव आहे कि संरक्षणासाठी असलेल्या इतर वास्तु आपल्याकडुन पूर्णपणे दुर्लक्षीत आहेत. या वास्तु म्हणजे एकांडे बुरुज, नगरकोट, वखार, सराई, वाडे व मुख्य म्हणजे गढी होय. यातील गढी वगळता इतर वास्तु फारच थोड्या प्रमाणात शिल्लक आहेत. मुख्य राजसत्तेच्या ताब्यात असलेले अभेद्य तटबंदीचे गडकोट म्हणजे त्यावेळच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा असला तरी या अधिसत्तेच्या नियंत्रणाखालील स्थानिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरता निर्माण झालेल्या गढी हे देखील या संरक्षण व्यवस्थेमधील महत्वाचे अंग होते. खरं तर गढी म्हणजे स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे एक सत्ताकेंद्रच होती. वंशपरंपरेने प्रशासकीय अधिकार प्राप्त झालेल्या काही परिवारांच्या गढय़ा म्हणजे प्राचीन संरंजामी व्यवस्थेचे केंद्र होते. ... त्यामुळे या गढीतुन मुलकी-महसूल जमा करण्याच्या व्यवस्थेसह संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंडळींत पाटील, इनामदार जहागीरदार, देशमुख यांच्या नावानेच या गढ्या ओळखल्या जात. या गढीमधुन स्थानिक प्रशासन सांभाळणारे वतनदार-सरदार हे एक प्रकारे त्या भागाचे राजेच असायचे. या वतनदाराना त्या भागात मानाचे स्थान असायचे. कालांतराने गढीच्या आश्रयाने हेच वतनदार शिरजोर बनुन स्वतंत्रपणे वागु लागत. यामुळे शिवाजी महाराजांची आपल्या वतनदारांना गढी बांधुन रहाण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे शिवकाळात स्वराज्यात या गढीचे प्रमाण नगण्य असले तरी मुसलमानी अंमल असलेल्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश या प्रदेशात गढय़ा आणि वाडे यांची उभारणी मोठ्या प्रमाणात होती. मराठवाडय़ातील काही गढय़ांच्या अंमलाखाली सभोवतालच्या बऱ्याच गावांचे प्रशासन असायचे. मध्यवर्ती सत्ताकेंद्र लांब असल्याने व दळणवळणाची प्रभावी साधनं उपलब्ध नसल्याने या गढय़ांवरून अनेक गावांचे कायदा सुव्यवस्था सांभाळली जायची. यावरून गढी क्षेत्राची व्याप्ती जाणवते. या प्रशासनाच्या पत्रव्यवहाराची जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यातुन त्यावेळच्या इतिहाससह समाजव्यवस्थेवरही प्रकाश पडतो. आपल्या प्रदेशातील संरक्षणासह प्रशासन व्यवस्थेसाठी उभारलेली हि गढी किल्ल्याइतकी भक्कम नसली तरी बहुतांशी गढय़ांचे बांधकाम हे एखादया भुइकोटाप्रमाणे तटबुरुजयुक्त असायचे. शक्यतो गढीचे बांधकाम हे गावाबाहेर लहान नदीकाठी एखाद्या उंचवट्यावर किंवा टेकडीवर केले जात असे. यात आक्रमणापासुन बचावाची काही प्रमाणात सोय केलेली असे. आपले सत्ताकेंद्र शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी गढीचे बांधकाम करताना परिसरातील दगड, माती, चुना याचा वापर केला जात असे. गढीची तटबंदी ही चार-पाच फूट रुंद तर उंची साधारण दहा ते पंधरा फुट असायची. काही वेळेला यात निरीक्षणासाठी तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या ठेवल्या जात. या गढीला किल्ल्याप्रमाणे एक प्रशस्त मुख्य दरवाजा व गरजेनुसार इतर लहान दरवाजे असत. गढीच्या मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याप्रमाणे पहारेकऱ्यासाठी देवडी असे. येथुन गढीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी व त्यांच्यावर लक्ष ठेवले जायचे. या गढीमध्ये ज्या कुटुंबाच्या हाती प्रशासन व्यवस्था असे त्यांच्यासाठी सुरक्षाकवच असलेला व त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणारा ऐसपैस वाडा असे. यात निवासस्थानासोबत विहिरी, मुद्पाकखाना, ओसरी, दिवाणखाना, कचेरी, सामान साठवण्याची कोठारे यासारख्या वास्तू असत. गढीत कररूपाने जमा केलेले धान्य तसेच प्रजेसाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून मोठमोठी धान्यकोठारे असायची. युद्ध, दुष्काळी परिस्थितीत यातुन रयतेला धान्यसाठा पुरवण्याची व्यवस्था होती. गढीतील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी या देखील धान्य कोठाराइतक्याच महत्त्वाच्या असत. अखेरीस या गढीमधुनच मध्यवर्ती सत्तेच्या विकेंद्रीकरणाची सुरवात झाली. मराठेशाहीच्या उत्तरकाळात बऱ्याच सरदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोटवजा गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट गढी हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व स्वसंरक्षण यासाठी होत होता. या भुईकोटाचा फारसा वापर न झाल्याने व लवकरच इंग्रज सत्ता भारतावर आल्याने या गढीकोटांवर फारसा इतिहास घडला नाही. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्तींनी व मानवी हस्तक्षेपानी अनेक गढीची पडझड झाली आहे. गडकोटांप्रमाणे गढय़ा देखील इतिहासाचे साक्षीदार असुन त्यातून गतवैभवाचेही दर्शन घडते. गढ्यांप्रमाणेच एकांडे बुरुज,नगरकोट, वखार,सराई, प्रशस्त वाडे यांच्या वास्तुरचनाही काही शतकांपूर्वीच्या समाजरचनेचा भाग आहेत. या वास्तुना किल्ल्यांची भव्यता नसेल पण त्यांची सुरक्षित वास्तुरचना, सौंदर्य व ऐतिहासिक मोल हेसुद्धा काही शतकांपूर्वीच्या कालखंडाचे पुरावे आहेत. या सर्व वास्तुना सांस्कृतिक मोल असुन त्यांचेही जतन- संवर्धन व्हायलाच हवे. सिमेंटचे वाढत चाललेले जंगल यामुळे काही काळाच्या सोबती असलेल्या या मध्ययुगीन वास्तुनी अंतिम श्वास घेण्यापुर्वी लवकरात लवकर भेट दयायला हवी. या गढी व इतर वास्तूंची एकत्रित माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या वास्तुंची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.!!!!!
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...
Image9
ABC
अक्षरानुसार
Category-Icon
प्रकारानुसार
Map-Icon
जिल्ह्यानुसार
error: Content is protected !!