नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे
- समर्थ रामदास स्वामी -
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा | सह्याद्रीच्या सख्या,जिवलगा महाराष्ट्र देशा
मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा | राकट देशा , कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा | प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
महाराष्ट्राचे यापेक्षा सुंदर वर्णन अजुन काही असुच शकत नाही. आपल्या शब्द सामर्थ्याचा वापर करत कवी गोविंदाग्रज यांनी विविध रंगांनी नटलेल्या संपुर्ण महाराष्ट्राचे सुंदर वर्णन यात केलेले आहे. महाराष्ट्र खऱ्याखुऱ्या अर्थाने विविध रंगांनी नटलेले राज्य आहे.. कुठे डोंगराला गड किल्ल्याचे कोंदण,तर कुठे डोंगरात लेण्यांचे कोरीव काम, कुठे देवळातील मांगल्य, तर कुठे योद्ध्यांच्या शौर्यकथा तर कुठे निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण !!!!!! महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाची स्वत:ची अशी खास ओळख आहे. महाराष्ट्र म्हणजे पर्यटकांचे नंदनवन. रायगड-राजगड या सारखे बेलाग गिरिदुर्ग तर जंजिरा-सिंधुदुर्ग यासारखे अजिंक्य जलदुर्ग,अजंठा-वेरुळसारखी अद्वितीय लेणी,कोकणातील गूढरम्य मंदिरे, समुद्रकिनारे, मऊसुत वाळूच्या पुळणी आणि घनदाट झाडी,पावसाळयात सहयाद्रीकडून कोकणात झेपावणारे धबधबे,माथेरान-आंबोली यासारखी गिरिस्थाने आणि इतरही बरेच काही इथे फिरण्यासारखे, पहाण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील समाधी व धारातीर्थे म्हणजे महाराष्ट्राची स्फुर्तीस्थळे आहेत.
...
या सर्व गोष्टींचा विचार करून इतिहासप्रेमी तरुणाई ,धार्मिक व निसर्गप्रेमी पर्यटकांना महाराष्ट्राच्या गड किल्ल्याची, लेण्यांची, मंदिरांची,स्मारकांची तसेच सृष्टीसौंदर्याने बहरलेल्या सागर किनाऱ्यांची इतिहास आधारे ओळख करून देण्याचा छोटासा प्रयत्न येथे केलेला आहे. www.durgbharari.in / www.durgbharari.com या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राचे वैभव असलेले गड-कोट आणि लेणी,प्राचीन मंदीरे- देवस्थाने आणि स्मारके यांची माहिती द्यावी हा आहे. याच हेतुने आम्ही "दुर्ग भरारी" या संकेतस्थळाची सुरवात केली आहे. या संकेतस्थळावर असलेले त्या ठिकाणाचे वर्णन हे मी प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देऊन नंतरच लिहिलेले आहे. शिवाय त्या ठिकाणाची छायाचित्रे मी स्वतः टिपलेली आहेत. निर्जन गडावर विचारपुस करण्यासाठी कोणी मिळत नसल्याने मी तेथे जाण्याचा मार्ग व त्या ठिकाणाची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या संकेतस्थळाचा पर्यटकांना व इतिहासप्रेमीना अल्पसा जरी उपयोग झाला तरी आमचे हे श्रम सार्थकी लागल्याचा आनंद आम्हास मिळेल.
© Suresh Nimbalkar