लोहगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ३४०२ फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रात असलेल्या अनेक दुर्गजोडीतील सर्वात प्रसिद्ध असलेली दुर्गजोडी म्हणजे लोहगड-विसापुर. मुंबई-पुणे हा प्रवास रस्त्याने वा रेल्वेने करताना हि दुर्गजोडी सहजपणे नजरेस पडते. पवना नदीच्या खोऱ्यातील पवन मावळ व इंद्रायणी नदीच्या खोऱ्यातील आंदरमावळ-नाणेमावळ या भुभागावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मीती करण्यात आली. या दुर्गजोडीतील लोहगड हा अतिप्राचीन मजबुत आणि बुलुंद दुर्ग. या किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेली भाजे आणि बेडसे लेणी पहाता या किल्ल्यांचा इतिहास इ.स.पुर्व पहील्या-दुसऱ्या शतकापर्यंत पोहोचतो. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडी येथे जाण्यासाठी पक्का रस्ता असुन लोणावळा व मळवली या दोन्ही मार्गांनी तेथे जाता येते. थंड हवेचे ठिकाण म्हणुन या भागात पर्यटकांचा चांगलाच वावर असल्याने काहीशी महागडी असली तरी दोन्ही ठिकाणाहून तेथे जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय आहे. अन्यथा मळवली स्थानकावर उतरून चालत देखील लोहगडावर जाता येते. ... मळवलीहून चालत जाताना सर्वप्रथम भाजे येथे विसापुर किल्ल्याच्या पोटात इ.स.पुर्व दुसऱ्या शतकात खोदलेली सातवाहनकालीन लेणी लागतात. लोहगड व विसापुर यामध्ये असलेली खिंड गायमुख म्हणुन ओळखली जाते.या खिंडीत कपला नावाची जागा असुन येथे असलेल्या दगडी चौथऱ्यावर घोडा, उंट, हत्ती व इतर काही प्राण्यांची शिल्प ठेवलेली आहेत. या चौथऱ्याजवळ बलभीम हनुमानाची मुर्ती असुन काही अंतरावर टहाळदेव नावाचा शेंदूर फासलेला दगड आहे. लोहगडवाडी हि गडाची एकेकाळची बाजारपेठ असल्याने गावात आजही जुन्या वाडय़ांचे चौथरे, बांधीव विहिरी व जुनी मंदिरे दिसतात. लोहगडवाडी इथून गडाकडे जाणारी नव्याने बांधलेली पायऱ्यांची वाट आहे. या पायऱ्यांनी चढाई सुरु करण्यापूर्वी पायऱ्यांच्या डावीकडे काही अंतरावर कोरडी पडुन पानांनी भरलेली एक जुनी विहीर आहे. किल्ल्यावर जाताना दुसऱ्या दरवाजानंतर तटबंदीबाहेर असलेले भुयाराचे दुसरे तोंड या विहिरीत येत असल्याचे गावकरी सांगतात. या पायऱ्यावरून जाताना उजवीकडे एक वाट जंगलात गेलेली दिसते. या वाटेने पुढे गेल्यास कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. या वाटेवर एक दगडी चाक व दोन तोफा ठेवलेल्या असुन या वस्तु अलीकडच्या काळात पायऱ्यांचे उत्खनन करताना सापडल्या आहेत. पायऱ्यांच्या या वळणदार वाटेवर असलेल्या गडाच्या पहील्या गणेश दरवाजाने आपण गडात प्रवेश करतो. इंग्रजी राजवटीत येथे असलेला लोखंडी दरवाजा काढुन पुरातत्व खात्याने अलीकडे येथे किल्ल्याच्या मुळ दरवाजाप्रमाणे नवीन लाकडी दरवाजा बसविला आहे. गडावर जाण्यासाठी वळणदार पायरीमार्ग असुन या वाटेवर गणेश दरवाजा,नारायण दरवाजा,हनुमान दरवाजा व महादरवाजा अशी चार दरवाजांची साखळी उभारलेली आहे. यातील हनुमान दरवाजा हा गडाच्या मुळ बांधणीतील प्राचीन दरवाजा असुन उर्वरीत तीन दरवाजांची बांधणी पेशवेकाळात नाना फडणवीस यांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या काळात केली आहे. या चार दरवाजांची रचना अतिशय सुंदर असुन थोडा वेळ काढुन निरीक्षण करण्यासारखी आहे. गडाच्या उजवीकडील तटबंदीवरून हा संपुर्ण मार्ग नजरेस पडतो. किल्ल्याचा पहिला गणेश दरवाजा हा कड्याला बिलगुन बांधलेला असून या दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेल्या गणपतीच्या मुर्तींमुळे या दरवाजाचे गणेश दरवाजा नामकरण झाले आहे. या दरवाजाच्या उजवीकडे असलेला बुरुज बांधताना बुरुजाखाली साबळे दंपतीचा बळी देण्यात आला होता व त्याच्या बदल्यात घडशी यांच्याकडे असलेली लोहगडवाडीची पाटिलकी त्यांच्या वंशजांना देण्यात आली होती. या साबळे कुटुंबीयांचे वंशज आजही लोहगडवाडीत वास्तव्यास आहेत. गडाच्या या भागातील बांधकामाची माहिती देणारा या दरवाजावर असलेला शिलालेख आतील बाजुस पहारेकऱ्यांच्या देवडीत ठेवलेला आहे. या लेखावरील अक्षरे याप्रमाणे आहेत. श्री गणेशाय नम: -----गणेश दरवाजा बा (बां)--------धला बाळाजी जनार्दन फडणीस विद्यमान धों------डो बल्लाळ नीतसुरे प्रारंभ शके १७१२------साधारण नाम संवत्सरे अस्वीन शु-------ध ९ नवमी रवीवार समाप्त शके------१७१६ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ सुध त्रयोदशी बु-----ध वार कता(र्त) व्य जयाजी--------धनराम गव(वं)डी त्रिवकजी सुतार------- या लेखाखाली दिवा ठेवण्यासाठी कोनाडा कोरलेला आहे----. दरवाजाच्या आतील भागात एका ओट्यावर उत्खनन करताना सापडलेल्या चार मध्यम आकाराच्या तोफा ठेवलेल्या असुन यातील एक तोफ तुटलेली आहे. येथुन पायऱ्यांच्या वाटेने गडाच्या दुसऱ्या नारायण दरवाजाकडे जाताना उजव्या बाजुस कड्यात कोरलेली दोन कोठारे पहायला मिळतात. पेशवेकाळात या कोठारांचा उपयोग भात व नाचणी साठवण्यासाठी केला जाई. यातील एका कोठाराच्या तोंडावर दगडी बांधकाम केलेले आहे. वाटेच्या पुढील भागात गोलाकार आकाराचा मोठा बुरुज बांधलेला असुन या बुरुजावर जाण्यासाठी लहान दरवाजा बांधलेला आहे. या बुरुजावर तटालगत एक शौचकूप बांधलेले असुन बुरुजाच्या तळात कैदखाना अथवा तळघर आहे. या तळघरात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटामध्ये कडयाच्या दिशेला लहान दरवाजा बांधलेला असुन या दरवाजाने बाहेर पडल्यास आपण गडाबाहेर येतो. या कड्यावर पुढील बाजूस काही अंतरावर एक गुहा असुन या गुहेच्या तळाशी भुयार आहे. हा भुयारी मार्ग गडाखाली असलेल्या विहीरीत निघतो असे सांगीतले जाते. हा बुरुज पाहुन मागे फिरल्यावर पायरीमार्गाने आपण गडाच्या नारायण दरवाजात पोहोचतो. नांना फडणीसांनी बांधलेल्या या दरवाजाच्या दोनही बाजूस व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत. हा दरवाजा पार केल्यावर पायऱ्यांचा उभा चढ चढुन आपण गडाच्या मुळ बांधकामातील हनुमान दरवाजात पोहोचतो. हा गडाचा प्राचीन दरवाजा असुन या दरवाजाच्या दोनही बाजूस शरभ कोरलेले आहेत. या दरवाजापुढे काही अंतरावर गडात प्रवेश करणारा मुख्य महादरवाजा असुन या दरवाजावर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे. या दरवाजाने आत आल्यावर समोर पहारेकऱ्यांना रहाण्यासाठी देवड्या आहेत. येथुन उजवीकडे वळण घेऊन एका कमानीखालून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. महादरवाजाने आत आल्यावर समोरच गोलाकार घुमट असलेला दर्गा असुन या दर्ग्यात एक थडगे आहे. या दर्ग्याच्या मागील बाजुस खडकाच्या पोटात तीन लहान गुहा व पाण्याची टाकी आहेत. दर्ग्याशेजारी गडाची भग्न राजसदर असुन सदरेच्या चौथऱ्यावर दोन तोफा ठेवलेल्या आहेत. या दर्ग्याजवळ चुन्याचा घाणा असुन उजव्या बाजुस ध्वजस्तंभ आहे. याच्याजवळ एक फुटलेली तोफ पडलेली असुन अशीच एक तुटलेली तोफ लक्ष्मीकोठी समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास खजीनदाराची कोठी व लक्ष्मी कोठी आहे. खजीनदाराची कोठी ७० फुट लांब व ५० फुट रुंद आहे. कधी काळी लक्ष्मीकोठी येथे लोमेश ऋषिंचे वास्तव्य होते असे म्हणतात. हि कोठी तीन भागात विभागलेली असुन या कोठीत ५० माणसे सहजपणे राहु शकतात पण सध्या पुरातत्व खात्याने गडावर रहाण्यास मनाई केली आहे. हि कोठी म्हणजे एक अपुर्ण लेणे असुन त्यात काही दालने कोरलेली आहेत. दर्ग्याच्या उजव्या बाजुस एक लहान चवटा असुन तेथे अलीकडील काळात जीर्णोद्धार केलेले शिवमंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजुस कातळात कोरलेली पाण्याची सात टाकी असून एकही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. येथुन सरळ गेल्यावर अष्टकोनी आकाराचे लहानसे तले असुन त्याशेजारी पिण्याच्या पाण्याचे भुमीगत टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गडावर हि एकमेव सोय असुन या पाण्यात रंगीत गप्पी मासे सोडले आहेत. या टाक्यापुढे असलेल्या पठारावर कुणा मुस्लीम अवलीयाची कबर आहे. सध्या या कबरीचे उदात्तीकरण करण्याचे कार्य सुरु आहे. या कबरीच्या आसपास साचपाण्याचे दोन तलाव आहेत. या शिवाय गडाच्या विसापुरच्या दिशेने असलेल्या उत्तर टोकावर कातळात कोरलेले अजून एक टाके पहायला मिळते. येथुन पुढे गडाच्या पश्चिम टोकाच्या दिशेने चालत निघाल्यावर षोडशकोनी म्हणजेच सोळा कोन असलेला घडीव दगडात बांधलेला प्रचंड मोठा तलाव पहायला मिळतो. इ.स १७९० मध्ये नाना फडणवीसांनी किल्ल्याचे बांधकाम मजबूत करताना किल्ल्यात सोळा कोन असलेला तलाव बांधला. याचा पुरावा म्हणजे तलावात उतरणाऱ्या पायऱ्याच्या काठावर याची माहीती देणारा अस्पष्ट शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखानुसार शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू म्हणजेच नाना फडणवीस यांनी हा तलाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधवला. सध्या हा तलाव कोरडा ठणठणीत पडलेला आहे. नाना फडणीस यांनी या तळ्यात संपत्ती लपवली असावी या संशयाने इंग्रजांनी या तळ्याचा पश्चिम काठ फोडला. नंतर इंग्रजानी तो काठ बांधुन काढला पण हे काम निट न झाल्याने त्यात पाझर राहीला व तळे कायमचे कोरडे पडले. येथुन पुढे निघाल्यावर आपण गडाचे पश्चिम टोक असलेल्या विंचूकाट्याच्या दिशेने जाताना वाटेवर कातळात कोरलेली पाच पाण्याची टाकी व एका मोठया वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. या वाटेने आपण विंचूकाट्याच्या वरील बाजूस असलेल्या मोठया बुरुजावर पोहोचतो. गडाचा हा भाग आपल्याला राजगडची संजीवनी माचीची व तोरणागडच्या झुंजार माचीची आठवण करून देतो. लोहगडाची हि माची पंधराशे फुट लांब आणि ५० फुट रुंद अशी डोंगराची सोंड आहे. पुर्वी येथुन विंचुकाटयावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट व एक दरवाज्याची कमान होती जी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. आता एक थोडा धोकादायक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. माचीच्या या भागात असलेल्या सैनीकांसाठी पूर्वीच्याकाळी पाण्याची उत्तम सोय केलेली आढळते. या माचीवर आयताकृती आकाराचे कातळात कोरलेले मोठे टाके असुन सध्या वापर नसल्याने शेवाळामुळे यातील पाणी हिरवेगार झाले आहे. माचीच्या या तटामध्ये काही शौचकूप आढळून येतात तर टोकाला एक दुहेरी तटबंदीचा भक्कम बुरूज पहायला मिळतो. या बुरुजाच्या आत तटात उतरण्यासाठी दोन्ही बाजूना दरवाजे बांधलेले आहेत. विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे. गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी व इंद्रायणी खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी या माचीचे बांधकाम करण्यात आले असावे. माचीचा हा भाग व टोकावरील बुरुजाला आतुन फेरी मारल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. गडाच्या माथ्यावरून आपल्याला विसापूर, तुंग, तिकोणा, मोरधन,कोरीगड हे किल्ले तसेच भातराशी व मोरगीरी डोंगररांग व पवना-इंद्रायणी नदीचे खोरे इतका विस्तृत प्रदेश सहजपणे नजरेस पडतो. गडाच्या पायथ्यापाशी असलेल्या लोहगडवाडी गावात जेवणाची सोय होते. इ.स.१८९६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकात लोहगडाच्या दरवाजांची दारे शिल्लक असल्याचा व या परिसरात काही तोफा असल्याचा उल्लेख येतो. पण आज यातील एकही दरवाजा शिल्लक नसुन तोफांही जागेवर नाहीत. लोहगड हा महाराष्ट्रातील असा किल्ला आहे ज्याच्या नावात गड हा शब्द प्राचीन काळापासुनच जोडलेला दिसून येतो. किल्ल्याजवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी पहाता या किल्ल्याची निर्मिती इ.स.पुर्व दुसऱ्या शतकात म्हणजे २२०० वर्षांपूर्वी झालेली असावी. सातवाहन,चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. त्यानंतर बहमनी सुलतानांचा अंमल या प्रदेशावर होता. बहमनी सत्तेचे विभाजन झाल्यानंतर इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली व इ.स.१४९१ मधे लोहगड किल्ला निजामशाहीकडे आला. इ.स१५६४ मध्ये अहमदनगरचा निजाम दुसरा बुर्हाणशहा या किल्ल्यावर कैदेत होता.(हा पुढे १५९० ते १५९४ या काळात अहमदनगरचा राजा झाला) निजामशाहीच्या अस्तानंतर इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती आली व नंतर ती राजगडाकडे रवाना झाली. महाराजांच्या मृत्युनंतर तो पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे १७०४ मध्यें कान्होजी आंग्रे यांनी त्यावर ताबा मिळवला. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्रेकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. नानांनी आपले सर्व द्रव्य धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली लोहगडावर आणले. नानांनी गडाच्या दक्षिण पायथ्याला असलेल्या आंबेगावात एक मोठा वाडा बांधला तसेच पवना नदीस घाट घातला. या घाटावर त्यांनी महादेवाचे एक कळशीदार मंदिरही बांधले. आज या सर्व वास्तु पवना धरणाच्या पाण्यात निद्रिस्त झाल्या आहेत. इ.स. १८०० मध्यें नानांच्या मृत्यूनंतर १८०२ मध्ये त्यांची विधवा पत्नी जिऊबाई किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण वेलस्ली साहेबाच्या मध्यस्थीनें किल्ला पेशव्यांकडे परत आला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. त्यांनी विसापुर येथुन लोहगडावर तोफांचा मारा केल्याने ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. १८४५ पर्यंत ब्रिटिशांच्या सैन्याची एक तुकडी या किल्ल्यावर होती.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!