राजापुर गंगा
प्रकार : निसर्गनवल/वारसास्थळ
जिल्हा : रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं शहर आहे. राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखार होती त्याचे अवशेष आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरात असुन शिवाजी राजाच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. राजापूरची गंगा ही ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. साधारण तीन वर्षांतून एकदा एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ टाक्या अचानक पाण्याने भरून जातात. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. गंगा उगम पावते आणि साधारण तीन महिने रहाते. सूर्य मीन राशीत असताना एप्रिल- मेमध्ये गंगा येते.
...
उन्हाळ्याजवळच्या डोंगरावर असलेल्या या गंगास्थानावर ती प्रचंड वेगाने गोमुखातून वाहते तेव्हा तिचा प्रवाह सहजपणे अंगावर घेववत नाही. मूळ गंगा एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी उगम पावून वीस पंचवीस पावलांवर काशी कुंडात मोठ्या प्रमाणावर वाहते. या कुंडाला जोडुन असलेल्या गोमुखाखाली भक्तगण स्नान करतात. मूळ गंगा उगमाच्या समोर विविध आकाराची अन्य बारा कुंडे आहेत. वरुणकुंड, हिमकुंड, वेदिकाकुंड, नर्मदाकुंड, सरस्वतीकुंड, गोदाकुंड, यमुनाकुंड, कृष्णाकुंड, अग्निकुंड, बाणकुंड, सूर्यकुंड व चंद्रकुंड अशी त्यांची नावे आहेत. या चौदाही कुंडांतील पाण्याचे तापमान त्या त्या देवतेनुसार वेगवेगळे आहे. सूर्य कुंडातला उबदारपणा व चंद्र कुंडातील जलस्पर्श वेगवेगळा जाणवतो. गंगेच्या ठिकाणी असलेल्या फक्त एक-दोन कुंडांमध्येच गंधकाचे काहीसे प्रमाण आढळते. गंगेच्या जवळ उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. त्या ठिकाणी स्नान करून नंतर गंगास्नानाची परंपरा होती. तसेच, गंगास्नानानंतर तीन-साडेतीन मैलांवरच्या धूतपापेश्वराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचाही प्रघात होता. गंगेचे पाणी नेऊन देवघरात पूजण्याचीही पद्धत आहे. सह्याद्री खंडामध्ये शिव-पार्वंती संवादातून धूतपापेश्वर हे राजापुरमधील शिवस्थान व या समस्त तीर्थांचे वर्णन आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर जवळच उन्हाळे नावाचे बारमाही वाहणारे तीर्थ आहे. सन १५७८ मध्ये ज्वालानाथ नामक एका योग्याला लागलेला शीतज्वर घालविण्यासाठी. हे तीर्थ सुरू झाले अशी नोंद सापडते. यानंतर काही वर्षांनी स्थानिक शेतकरी गंगाजी साळुंखे नावाचा भाविक या गंगोत्थानास कारण ठरला असे म्हणतात. तो दरवर्षी शेतीचे दिवस आटोपल्यानंतर तीर्थ स्नानासाठी प्रयाग अथवा पंढरपुरला भागिरथी तीर्थाला जात असे. सलग बारा वर्षे या राखलेला हा क्रम तेराव्या वर्षी त्याला जाता येईना म्हणून उन्हाळ्याच्या तीर्थात स्नान करून तो या स्थळी आला होता. नुकतीच मळणी झालेली असल्याने कोंडाही इतस्तत: पसरला होता. अशावेळी काय घडले. वर्णन सांगते – ‘कुळंब्याचे भक्तिस तीर्थ धावले. श्रीमुख संवत्सरी पौष शुद्ध दशमीसह एकादशी, या मुहूर्तावर मध्यान्ही तिवडेखाली सांवावरी कोंडायुक्त बारा ठायी, बारा झरे सुटले. ही घटना इ.स. १५९१ला घडली असावी कारण हे तीर्थ सलग सात वर्षे वाहत होते आणि इ.स. १५९८ला श्रीशैलचा राजा प्रतापरूद्र याने साशंकतेने काही विधान करताच ते असे थांबले की जेवायला बसलेल्या राजाला हात धुण्यासाठी उन्हाळ्याला यावे लागले. त्यानंतर बारा दिवसांनी गंगा पुन्हा प्रकटली. शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत. सन १६६१ला छत्रपती शिवरायांनी राजापूरच्या वखारीला खणती लावल्या तेव्हा तेव्हा गंगा वाहत होती. महाराजांनी यावेळी गंगास्नान केले. तसेच १६६४मध्ये गागाभट्टांनी येथे घेतलेल्या ब्राह्मणसभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते. कविवर्य मोरोपंत वयाच्या ६० वर्षी इ.स. १७८९ला येथे गंगा स्नानासाठी आले असता त्यांनी २६ कडव्यांचे गंगाप्रतिनिधीतीर्थ नावाचे गीती वृत्तातील काव्य लिहिले. सन १८०० च्या आधी पुण्याचे मुनीश्वर आणि काशीकर हे दोन भक्त आपल्या सद्गुरु यतीराजांसमवेत दक्षिणेत शिवचिदंबर स्वामींकडे जाण्याआधी राजापुरला गंगेवर आले. यतीमहाराजांनी शिवाचा जयजयकार करताच गंगा प्रकट झाली व श्रीचरणांशी खेळू लागली. हे यतिराज म्हणजे श्री स्वामीसमर्थ महाराज होते. उन्हाळ्याच्या जवळच सरदार खासगीवालेंच्या वाड्यात श्रीस्वामी पादुकांचे स्थान आहे आणि विशेष म्हणजे गंगामुखाजवळही असेच एक पादुकांचे स्थान असून ते स्वामी महाराजांशी संबंधित आहे. श्रीदत्तस्थान म्हणून ते परिचित आहे. जिऑलॉजिकल सर्व्हे विभागातील इंग्रज अधिकारी सी. जे. विल्किन्सन याने कोकणातील भूगर्भरचनेच्या अभ्यासाधारे रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये राजापूरच्या गंगेबाबत आपले मत नोंदवले आहे. त्याच्या मते हे पाणी भूगर्भातील हालचालीं मुळे सायफन प्रणालीने प्रवाहित होत असावे. अर्जुना नदीच्या वरच्या म्हणजेच सह्याद्रीच्या बाजूला भूपृष्ठाखाली पोकळी आहे. ती पोकळी पाण्याने भरली की अतीरिक्त पाणी गंगातीर्थातून बाहेर पडते. पोकळीतील पाणी पूर्ण संपेपर्यंत ते वाहत राहते. पोकळी दरवर्षी भरत नसल्याने गंगा येण्याचा कालावधी कमी जास्त होतो. भूमिअंतर्गत पाण्याच्या प्रवाहाचा तो परिणाम असल्याचा दुसरा एक मतप्रवाह आहे. काही ठरावीक काळाने त्या प्रवाहातील पाणी बाहेर पडते.
© Suresh Nimbalkar