महीमानगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सातारा
उंची : ३१५५ फुट
श्रेणी : सोपी
सातारा जिल्ह्याच्या पुर्व भागात असलेला माणदेशात पावसाचे अत्यल्प प्रमाण पहाता हा भाग तसा दुष्काळी भागच म्हणायला हवा. या भागात सलग डोंगर रांगेयेवजी सपाट माळरानावर अलिप्त असलेले डोंगरच मोठया प्रमाणात दिसुन येतात. माणदेशच्या माण तालुक्यातील या सपाटीवर लक्ष ठेवण्यासाठी अशाच एका लहानशा टेकडीवजा डोंगरावर उभारलेला दुर्ग म्हणजे महिमानगड. उंचीने कमी असला तरी या सपाट प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली गेली. महिमानगड गावामार्गे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सातारा - पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे 12 कि.मी अंतरावर असणा-या महिमानगड फाट्यावरून जातो. महीमानगडावर जाण्यासाठी महीमानगड व उकिर्डे या दोन्ही गावातुन वाटा आहेत. उकीर्डे गावाकडून जाणारी वाट हि मूळ वाट नसुन ती तुटलेल्या तटबंदीतुन गडावर जाते. हि वाट घसाऱ्याची असुन फारशी वापरात नसल्याने गैरसोयीची आहे.
...
महिमानगड वाडीतून मात्र गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे.महिमानगडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या वाडीकडे जाताना गडाची पश्चिम बाजुची सुरेख तटबंदी दिसते. महिमानगड फाट्यावरून वीस मिनीटात आपण महिमानगड गावात पोहोचतो. महिमानगडाच्या दक्षिण पायथ्याला उकीर्डे गाव असुन उत्तर पायथ्याला उतारावर महिमानगड वाडी वसलेली आहे. महिमानगड गावाच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालया समोरील मंदिरापासून एक पायवाट गडावर जाते. मंदिराशेजारी आपल्याला एका जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात. वळणावळणाच्या या वाटेने जाताना दरवाजा शेजारी असलेले बुरुज दिसायला सुरवात होते पण दरवाजा मात्र जवळ जाईपर्यंत नजरेस पडत नाही. या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत तीन पाण्याची टाकी कोरलेली आहे. यातील एकात गच्च झाडी माजलेली असून दुसरे गाळाने पुर्ण भरले आहे पण तिसऱ्यात मात्र पिण्यायोग्य पाण्याचा झरा आहे. टाकी पाहुन खडकावरून चढून आपण पुन्हा गडाच्या मुळ वाटेवर येतो. वाटेच्या शेवटच्या टप्प्यात काही बांधीव तर काही कातळात खोदल्या पायऱ्या आहेत. या वाटेने गड गाठण्यास अर्धा तास लागतो. दरवाजाच्या आसपास असलेली तटबंदी आजही चांगल्या स्थितित असुन डावीकडील तटबंदीवर एक झाड तटबंदीबाहेर आडवे वाढलेले आहे. गडाचा पुर्वाभिमुख असलेला दरवाजा आज बहुतांशी नष्ट झाला असुन त्याची केवळ दगडी चौकट शिल्लक आहे. या दगडी चौकटीच्या खांबाखाली बाहेर दोन्ही बाजुस हत्तीमुख कोरलेले आहेत. दरवाजाचा बाहेरील तळाकडील भाग काही प्रमाणात मातीत गाडला गेला असुन येथील दगडमाती काढल्यामुळे हि गजशिल्प दिसु लागली आहेत. दरवाजासमोर वळणदार मार्ग व तोंडाशी बुरुज बांधून दरवाजा संरक्षित केला आहे. असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ मानली जातात. हा दरवाजा पार केल्यावर आपण गडात प्रवेश करतो. गडात शिरल्यावर डावीकडील वाट गडमाथ्यावर जाते तर समोरील वाट तटबंदीवर जाते. गडात शिरल्यावर समोरच छोट्या टेकडावर हनुमानाचे मंदीर असुन मंदिराशेजारीच एक पाण्याचे टाके आहे. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पाय-या दिसतात. येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. येथुन थोडे पुढे गेल्यावर उतारावर कातळात कोरलेले पाण्याचे मोठे टाके असुन या टाक्याचा वरील भाग घडीव दगडात बांधलेला आहे. या टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. याच्या शेजारी चुन्याचा गिलावा केलेले दुसरे लहान कोरडे टाके आहे. या टाक्याजवळ उंचवट्याखाली बांधकामासाठी दगड काढल्याने तयार झालेला मोठा खड्डा आहे पण याला पाझर असल्याने पाणी साठलेले दिसत नाही. या टाक्यांच्या वरील बाजुस काही अंतरावर दोन मोठया वास्तुंचे भग्नावशेष पहायला मिळतात. या टाक्याच्या पूर्व बाजुस गडाची निमुळती होत गेलेली सोंड असुन, तटबंदी बांधुन हि सोंड मुख्य गडापासून वेगळी केलेली आहे. सोंडेच्या निमुळत्या टोकावर टेहळणीसाठी भक्कम बुरुज बांधलेला असुन सोंडेवर जाण्यासाठी तटबंदीमध्ये लहान दरवाजा बांधलेला आही. या सोंडेवर थोडेफार बांधकामांचे अवशेष दिसतात. सोंडेवरून मागे फिरल्यावर टाक्याकडून न जाता डावीकडील तटबंदीच्या बाजूने निघावे. येथे टाक्याच्या वरील बाजुस तटबंदीजवळ पीराचे थडगे आहे. येथुन तटबंदीच्या काठावरून दरवाजाच्या दिशेने गडफेरी करताना गडाची आजही शिल्लक असलेली तटबंदी व त्यातील बुरुज पहायला मिळतात. हि तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे सावधगिरीने गडफेरी मारावी. गडाच्या माथ्यावरून भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वर डोंगर व मोळ घाट परिसर दिसतो. संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. स्वराज्याच्या स्थापनेनंतर आदिलशहाच्या अमलाखाली असलेला हा प्रांत व सोबत महिमानगड मराठयांच्या ताब्यात आला. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची वतने आजही त्यांचे वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे कायम आहेत.
© Suresh Nimbalkar