हुळी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : बेळगाव

उंची : २४३० फुट

श्रेणी : सोपी

बेळगाव जिल्ह्यातील सर्वात प्राचीन नगर म्हणुन हुळी गावाचा उल्लेख केला जातो. प्राचीनकाळचे महिष्पतीनगर म्हणजेच आजचे हुळी असल्याचे स्थानिक सांगतात. १०१ मंदिराचे गाव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या गावाबाहेरील तलावाजवळ आजही आपल्याला पंचलिंगेश्वर, त्रिकुटेश्वर, अंधकेश्वर, भवानीशंकर, कळमेश्वर, काशी विश्वनाथ, मदनेश्वर, सूर्यनारायण, तारकेश्वर, संगमेश्वर अशी ११ प्राचीन मंदिरे पहायला मिळतात.हुळी गाव दोन डोंगराच्या बेचक्यात वसलेले असुन त्यामधील दरीतुन वहात येणारा प्रवाह खाली अडवुन तलाव निर्मीती करत या प्राचीन नगराची पाण्याची गरज भागवली गेली आहे. या गावाच्या रक्षणासाठी गावामागील डोंगरावर किल्ला उभारला गेला. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात असलेला असलेला हा किल्ला तालुक्याच्या ठिकाणापासुन १० कि.मी. अंतरावर तर बेळगाव शहरापासुन ९८ कि.मी.अंतरावर आहे. धारवाडपासुन हुळी गाव ४७ कि.मी.अंतरावर आहे. हुली गावाचे काही मोजक्याच ठिकाणी येत असलेले वर्णन वाचताना या गावामागील डोंगरावर किल्ला असल्याचे वाचनात येते. ... पण हि माहीती अर्धवट असुन गोंधळात टाकणारी आहे. हुळी गावामागे दोन डोंगर असुन या दोन्ही डोंगरावर दोन वेगवेगळे किल्ले आहेत. यातील उजवीकडच्या डोंगरावर असलेल्या किल्ल्याचे सर्वत्र उल्लेख आलेले असुन डावीकडील डोंगरावर असलेल्या किल्ल्याचे मात्र कोठेही उल्लेख येत नाहीत. सौंदत्तीकडून हुळी गावात प्रवेश करताना डावीकडील डोंगराच्या माथ्यावर सफेद रंगाने रंगवलेला भलामोठा कातळ असुन तेथे काही बांधकाम असल्याचे जाणवते. हा रंगवलेला कातळ किल्ला समजून आम्ही या डोंगराकडे वळलो. हा रंगवलेला कातळ म्हणजे सिद्धेश्वरचे कातळात कोरलेले मंदीर असुन गावकऱ्यांनी गावाच्या सुरवातीस असलेल्या वस्तीतुन या मंदिरापर्यंत कच्चा रस्ता नेला आहे. पावसाळा वगळता जीपसारखे वाहन तिथपर्यंत नेता येते. याशिवाय हुळी गावातुन एक मळलेली पायवाट या मंदिरापर्यंत आलेली आहे. पायथ्यापासुन या मंदिरापर्यंत चालत जाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. गाडी थांबते तेथूनच गडाचे अवशेष दिसायला सुरवात होते. गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या या वाटेने गडाकडे जाताना डावीकडील बाजुस कातळात कोरलेली ओबडधोबड गुहा असुन यात शिवलिंग आहे. तेथुन काही पायऱ्या चढुन पुढे आल्यावर उजवीकडील बाजुस घडीव दगडात बांधलेला सुस्थितीतील बुरुज आहे.या बुरुजावर जाण्यासाठी बुरुजातच लहान दरवाजा बांधलेला असुन आतील बाजुस पायऱ्या आहेत. या बुरुजावरून काही अंतरावर असलेला किल्ल्याचा दुसरा भग्न बुरुज व आतील परिसर नजरेस पडतो. साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला ४ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासून २४२० फुट उंचावर आहे. गडावर मोठया प्रमाणात काटेरी झुडुपे वाढलेली असुन गडफेरी करताना कातळात कोरलेले लहान टाके, झाडीने भरलेली विहीर व ढासळलेली थोडीफार तटबंदी वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडावरून हुळी गाव, गावाबाहेर असलेला तलाव व त्याच्या काठावरील मंदीरे तसेच दुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. येथुन समोर असलेल्या डोंगरावर हुळी गावातील दुसरा किल्ला दिसतो पण त्याची तटबंदी मोठया प्रमाणात ढासळली असल्याने तो किल्ला असल्याचे सहजपणे जाणवत नाही. हुळी गावातील चालुक्यकालीन मंदीरे पहाता गावाला प्राचीन इतिहास आहे. राष्ट्रकूट, चालुक्य, कदंब, आदिलशाही या राजवटी येथे नांदल्यानंतर शिवकाळात इ.स.१६८० साली शिवाजी महाराजांनी धारवाड भाग स्वराज्यास जोडला त्यावेळी हा परीसर मराठयांच्या ताब्यात आला. हुळीपासुन जवळच असलेल्या नारगुंद येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला त्यावेळी येथील किल्ल्यांची दुरुस्ती केली गेली असावी. नंतरच्या काळात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात व नंतर करवीरकरांच्या ताब्यात आला. फत्तेसिंग भोसले यांचा या भागावर फारसा प्रभाव पडत नाही हे पाहुन इ.स.१७४७ साली सदाशिवरावभाऊनी सखाराम बापू व महादजीपंत पुरंदऱ्यासोबत या भागात स्वारी केली. त्यांनी कित्तुर, गोकाक, परसगड, बदामी, बागलकोट,तोरगळ, हलीयाल,नारगुंद, यादवाड, बसवपट्टण असे ३५ परगणे काबीज केले व या भागातील देसाईंना जरब बसवली. थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात हा प्रदेश पटवर्धनांच्या ताब्यात होता. गावात मराठी आडनाव असलेली बरीच घरे आहेत. मराठेशाहीच्या अस्तानंतर येथील देसाई ब्रिटीशांच्या आश्रयाला गेले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!