हुक्केरी
प्रकार : नगरकोट
जिल्हा : बेळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
अतिक्रमणाचा शाप केवळ महाराष्ट्रातील किल्ल्यांना लागलेला नसुन थोडयाफार फरकाने हि गोष्ट संपुर्ण भारतात दिसुन येते. अतिक्रमणामुळे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला असाच एका किल्ला म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात असलेला दस्तुरखुद्द हुक्केरीचा किल्ला. इतिहासात अनेक ठिकाणी हुक्केरी किल्ल्याचे नाव येत असले तरी सद्यस्थितीत कोठेच या किल्ल्याची माहीती दिसुन येत नाही. हुक्केरीमध्ये दूरध्वनीवर चौकशी करून देखील कोणाला काही सांगता येत नव्हते. माहीती फक्त तेथील घुमटाबद्दल मिळत होती. आमच्या बेळगाव दुर्गभ्रमंतीत आम्ही या ठिकाणी भेट दिली असता किल्ला नाही पण किल्ल्याचे काही अवशेष मात्र पहायला मिळाले,त्याची मी येथे नोंद करत आहे. मुख्य म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा आजदेखील शिल्लक आहे. हुक्केरी हे तालुक्याचे ठिकाण कोल्हापुरहुन ८१ कि.मी.,बेळगावहुन ५१ कि.मी तर संकेश्वरपासुन १४ कि.मी. अंतरावर आहे.
...
गावात कोणालाही किल्ला माहित नसल्याने बाजार रस्त्यावर येऊन कारंजी अथवा मोकाशी मशीद विचारावी. या ठिकाणी किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असुन हा दरवाजा कसाबसा आपले अस्तित्व टिकवुन आहे. साधारण २० फुट उंच असलेला हा दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन त्याच्या कमानीत चुन्यामध्ये दोन वाघ व नक्षी कोरलेली आहे. मुख्य दरवाजाशेजारी तटामध्ये एक लहान दरवाजा बांधलेला आहे. मुख्य दार बंद असताना हि आत जाण्यायेण्याची सोय असुन दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याची खोली आहे. दरवाजाच्या उजव्या बाजुस काहीसा भग्न झालेला गोलाकार बुरुज असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. बुरुजाच्या पुढे थोडीफार तटबंदी आहे पण त्यावर आक्रमण झालेले आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजुस काही अंतरावर १५ व्या शतकात बांधलेला अष्टकोनी दगडी हौद असुन त्या शेजारी दगडी कारंजे आहे. दरवाजाच्या या भागात खंदक असल्याच्या खुणा दिसुन येतात. असाच एक चौकोनी हौद आपल्याला किल्ल्याच्या आतील भागात पहायला मिळतो. दरवाजातुन आत शिरल्यावर ५ मिनिटे सरळ चालत गेल्यावर या रस्त्याला उजवीकडे फाटा फुटतो. या वाटेने पुढे जाताना उजवीकडे दगडांनी बांधलेला एक चौकोनी हौद पहायला मिळतो. या वाटेने सरळ गेल्यावर रस्ता वळतो तेथे एक उध्वस्त बुरुज व किल्ल्याची उरलीसुरली तटबंदी पहायला मिळते. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. हुक्केरी किल्ल्या सोबत शहरातील १५ व्या शतकात बांधलेले तीन घुमट देखील पहाता येतात. या घुमटांची बांधणी विजापूर, आणि बिदर येथील घुमटाप्रमाणे केलेली आहे. पुरातत्व खात्याने नुकतीच या वास्तुंची दुरुस्ती केली असुन त्याला त्याचे मुळ सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. हे तीनही घुमट एका उंच चौथऱ्यावर बांधलेले असुन मुघल वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहेत. अतिशय सुंदर रचना असलेली हि वास्तु आवर्जून पहावी. हुक्केरी हे नाव ह्विवनाकेरी या शब्दापासून बनलेले आहे याचा अर्थ फुलांची गल्ली असा होतो. आदिलशाही काळात येथुन चांगल्या प्रतीचे गुलाब विजापूरला पाठविले जात असत. इ.स. १३२७ मध्ये मोहम्मद बिन तुघलकने फुकेरी व आसपासच्या प्रदेशावर फतेबहादुर या सरदाराची नेमणुक केली. इ.स.१५०२ साली हा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात गेला. या काळात ऐन-उल-मुल्क जिलानी यांनी हुक्केरीचा किल्ला(१५०५),दोन घुमट (१५०९) ,राजवाडा आणि तलाव बांधले. इ.स.१५४२ साली तो निजामशाहीत सामील झाला पण निजामशहाचा पराभव झाल्याने तो पुन्हा आदिलशाहीत दाखल झाला. यावेळी त्याला कित्तुरची सुभेदारी देण्यात आली. ऐन-उल-मुल्क जिलानीनंतर त्याचा भाऊ फतेमुल्क येथे सुभेदार झाला. (इ.स.१५४७-१५६८) याच्या काळात इ.स.१५५५मध्ये तिसरा घुमट बांधला गेला. इ.स.१५६९ साली विजापूर सरदार रणदुल्लाखान व त्यानंतर इ.स.१६१६ साली त्याचा मुलगा रुस्तम जमान या भागाचे सुभेदार होते. त्यानंतर अब्दुल कादरने हुकेरीचा ताबा घेतला. यानंतर २८ जुलै १६८७च्या पत्रानुसार हुकेरी परगण्याचा देसाई आलगौडा यांनी मोगलांच्या वतीने मराठयांकडील गंधर्वगड घेतल्याचा उल्लेख आहे. या कामासाठी मोगलांनी हुकेरी देसायांना चंदगड व आजऱ्याची देशमुखी मनसब व एक हत्ती देण्याचे कबुल केले होते. बेळगावचा किल्ला सावनूरच्या नबाबाने तहात माधवराव पेशव्यांना दिला त्यावेळी युसुफ बेग किल्लेदार होता. किल्ला ताब्यात घेताना पेशव्यांनी (३ मे १७५७) त्याला कांही गांव देण्याचें कबूल केलें होतें त्याप्रमाणें कसबे हुकेरी हा गांव त्याला दिला परंतु पुढें चिकोडी मनोळी तालुके करवीरकर संभाजीराजे यांची राणी जिजाबाई साहेब यांस दिले. त्यांत हुकेरी हा ठाण्याचा गांव असल्याने तो त्याच्याकडे गेला त्यामुळे त्या बदल्यात पेशव्यांनी युसुफ बेग यास हुकेरीच्या आकाराची चिकोडी तालुक्यांतील बलतवाड,गोडवाड व मसरमुदी हीं तीन गांवे दिली.
© Suresh Nimbalkar