हिंगणी दुमाला
प्रकार : नगरकोट/गढी
जिल्हा : अहमदनगर
उंची : 0
पुणे नगर जिल्ह्यांची भटकंती करताना या दोन्ही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आपल्याला अनेक गढ्या पहायला मिळतात. यातील काही गढ्या परीचीत तर काही गढ्या पुर्णपणे अपरिचित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला या गावात आपल्याला अशीच एक अपरिचित गढी व नगरकोट पहायला मिळतो. पवारांची गढी म्हणुन ओळखली जाणारी हि गढी खुद्द गावालाच इतकी अपरिचित आहे कि पवारांची गढी यापलीकडे त्यांचे ज्ञान जात नाही. गढीचे मालक कोठे असतात हे देखील त्यांना ठामपणे सांगता येत नाही. श्रीगोंदा तालुक्यात असलेली हा नगरकोट व गढी श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ४५ कि.मी.अंतरावर तर पुणे जिल्ह्यातील शिरूरपासून फक्त ३ कि.मी.अंतरावर आहे. कुकडी नदीच्या पात्राने पुणे व नगर जिल्ह्याची हद्द विभागली असल्याने शिरूर या तालुक्याच्या ठिकाणापासुन फक्त ३ कि.मी.अंतरावर असुन देखील हिंगणी दुमाला हे गाव नगर जिल्ह्यात येते. शिरूरहुन जाताना कुकडी नदीवरील पुल ओलांडताच उजव्या बाजुला नगरकोटाचा पहिला दरवाजा नजरेस पडतो. पुर्वी हिंगणी हे गाव या दरवाजाच्या आतील बाजुस वसले होते पण कुकडी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे नदीचे पात्र वाढले. त्यामुळे या दरवाजाच्या आतील भागात असलेली घरे आता उंचावर स्थलांतरित झालेली आहेत.
...
हा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन त्यातील एका बुरुजाची पडझड झालेली असली तरी दुसरा दरवाजा मात्र आजही तग धरून आहे. बुरुजाचे व दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात चुन्यानी केलेले असुन दरवाजा वरील नगारखाना विटांनी बांधलेला आहे. आतील बाजुस तीन कमांनी असलेला हा नगारखान आजही सुस्थितीत आहे. बुरुजावरील बांधकामात बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. दरवाजाबाहेर नदीचा घाट असुन या घाटावर घडीव दगडात बांधलेल्या पाच समाधी पहायला मिळतात. जुन्या गावातील दोन मंदीरे नदीपासुन दूर असल्याने आजही सुस्थितीत आहेत. यातील भैरवनाथ मंदिराबाहेर आपल्याला एक विरगळ व झीज झालेले प्राण्याचे शिल्प पहायला मिळते. गावाचा उर्वरीत भाग उंचावर असुन तेथे गेल्यावर नगरकोटाचा दुसरा दरवाजा पहायला मिळतो. हा दरवाजा देखील दोन बुरुजात बांधलेला असुन हे दोन्ही बुरुज व दरवाजाची कमान आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या समोरच मारुतीचे मंदिर आहे. गावाचा हा परीसर उंचावर वसलेला असुन गावाच्या आतील बाजुस टेकडीवर महादेवाचे व रामाचे पेशवेकालीन मंदिर आहे. हि दोन्ही मंदीरे घडीव दगडात बांधलेली असुन मंदीराच्या आतील भागात भार तोलण्यासाठी नक्षीदार खांब आहेत. महादेवाच्या मंदिराबाहेर स्वतंत्र नंदी मंडप आहे. या मंदिराकडून नदीपात्राकडे असलेले संपुर्ण गाव व दुरवर पसरलेला परिसर नजरेस पडतो. नगरकोटाचा हा भाग पाहुन झाल्यावर पुन्हा नदीपात्राच्या मागील बाजुस म्हणजे भैरवनाथ मंदिरामागे असलेल्या टेकाडावर जावे. या टेकडावर असलेल्या बाभळीच्या दाट जंगलात सरदार पवार याची गढी हरवली आहे. गढीचा दरवाजा मुख्य रस्त्याच्या बाजुस असुन या दरवाजासमोर खंदक खोदलेला आहे. येथील बाभळीचे जंगल इतके दाट आहे कि दरवाजा समोर उभे राहुन देखील दरवाजा दिसत नाही. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन यातील एका देवडीत तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाची चौकट व कमान लाकडी असुन त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. पण त्यातील दरवाजा मात्र गायब झाला आहे. चौकोनी आकाराची हि गढी साधारण एक एकरवर बांधलेली असुन गढीचे दर्शनी बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. गढीची तटबंदी साधारण १५ फुट उंच असुन तिची काही ठिकाणी पडझड झालेली असुन त्यावर झाडे वाढलेली आहेत. गढीच्या अंतर्गत भागात असलेल्या वास्तु देखील कोसळल्या असुन त्यांचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात बाभळी वाढल्या असल्याने आत नीट फिरता येत नाही व आपली फेरी थोडक्यात आटोपती घ्यावी लागते. नगरकोटाचे दोन दरवाजे, मंदीरे व गढी पहाण्यास दीड तास पुरेसा होतो. या नगरकोट व गढीसोबत राजापुर गढी देखील पहाता येते. वर्तमानकाळात व इतिहासातील राजकारणात प्रसिध्द असलेल्या अनेक घराण्यापैकी एक घराणे म्हणजे माळव्यांतील परमार ऊर्फ पवार घराणे. उत्तर हिंदुस्थानाच्या माळवा प्रांतातील परमार ऊर्फ पवार हे रजपुत घराणे शिवकाळापुर्वी दक्षिणेत आले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील या घराण्याच्या अनेक गढी व वाडे पहायला मिळतात. अशीच एक पवारांची गढी म्हणजे हिंगणी दुमाला येथील गढी. मध्य भारतातील माळवा प्रांतात असलेले परमार घराण्याचे राज्य इ.स.१३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिराळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणुन उदयास पावली. प्राचीन राजधानी धार येथून आल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून इतिहासात प्रसिद्धिस आले. शंभूसिंग परमार ऊर्फ साबूसिंग पवार यांना या घराण्याचे मूळ पुरुष मानले जाते. इ.स.१६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली त्यावेळी साबुसिंग पवार महाराजांसोबत होते. साबुसिंग यांना कृष्णाजी नावाचा पुत्र होता. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखावर केलेल्या स्वाऱ्यात कृष्णाजी पवार सामील होते. अफझल खानच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजलखान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवार यांचे नाव पुढे येते. कृष्णाजी पवारांच्या मृत्युनंतर त्यांचे तीन पुत्र बुबाजी, रायाजी व केरोजी शिवाजी महाराजांच्या सेनेत सामील झाले. बुवाजी पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मुलुखाचा बंदोबस्त करताना लढाया करून अनेक बंडे मोडून काढली. राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुबाजी व केरोजी यांच्या फौजानी मोगलांच्या वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात घौडदौड करून चौथाई वसुल करत मोगल फौजेस हैराण करून सोडले व मराठ्यांचा दरारा वाढवला. या कामगिरीमुळे राजाराम महाराजानी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर बुबाजीस विश्वासराव हा किताब व सरंजाम तर केरोजीस सेना सेनाबारासहस्त्री हि पदवी व वस्त्रे दिली. मलठण, सुपे, कवठे यमाई, आमदाबाद, हिंगणी, गणेगाव, चितेगाव, नगरदेवळे हि गावे त्यांना सरंजामी वतने होती. यातील एका पवारांचे वंशज हिंगणी येथे वास्तव्यास आले व त्यांनी गावाचा कायापालट केला. हे नेमके कोणत्या पवारांचे वंशज याची माहीती न मिळाल्याने येथे मांडलेली नाही.
© Suresh Nimbalkar