हातगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३२४८ फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांचा प्रदेश म्हणुन ओळखला जातो. येथील प्रत्येक दुर्गाला स्वतःची अशी एक ओळख आहे. यातील काही किल्ले त्याच्या दुर्गमतेसाठी तर काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासाने तर काही किल्ले त्यावरील वास्तुंसाठी प्रसिध्द आहेत. नाशीक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यात सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणापासुन जवळच असलेला हातगड किल्ला त्यावर असलेला महाराष्ट्रातील किल्ल्यावरील सर्वात मोठा शिलालेख असलेला किल्ला यासाठी प्रसिध्द आहे. हातगडाला जाण्यासाठी सर्वप्रथम नाशिक गाठावे. नाशिक – सापुतारा मार्गावर नाशिकहुन वणीमार्गे ७४ कि.मी अंतरावर तर सापुताऱ्यापासून ६ कि.मी अंतरावर बोरगाव नावाचा फाटा आहे. येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुताऱ्याला जातो. सापुताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन खाजगी वाहनाने वनखात्याचे शुल्क भरून थेट किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाता येते. ... गावातुन किल्ल्यावर चालत गेल्यास गावामध्ये काही जुने अवशेष दिसतात. यात गंगाजी मोरे यांची समाधी, चुन्याचा घाणा, घोडयांच्या पागा असलेली कमानीदार इमारत,घडीव दगडात बांधलेला लहान तलाव या वास्तु पहायला मिळतात. याशिवाय गावाची सफर केल्यास गावाभोवती तटबंदी असल्याच्या काही खाणाखुणा पाहायला मिळतात. पायथ्यापासून दरवाजा गाठण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गाडीरस्ता संपल्यावर पायऱ्यांनी दरवाजाकडे जाताना पहिल्या दरवाजाच्या अलीकडे उजवीकडे वरच्या बाजूला कातळात कोरलेले हिरव्यागार पाण्याचे टाके आहे. येथे कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती असुन वाटेच्या पुढील भागात कातळात कोरलेली लहान गुहा आहे. हे पाहून आपण गडाच्या पहिल्या उध्वस्त दरवाजात पोहोचतो. गडावर प्रवेश करताना असे चार दरवाजे ओलांडावे लागतात. हा दरवाजा व पुढील दोन दरवाजे पश्चिमाभिमुख असुन चौथा दरवाजा उत्तराभिमुख आहे. हा दरवाजा उजवीकडे किल्ल्याचा कातळ तर डावीकडे बुरुजाच्या आधारे बांधलेला आहे. या दरवाजाची कमान पडलेली असून फक्त खांब शिल्लक आहेत. याच्या डाव्या खांबावर शेंदुर फासलेले पायात हत्ती धरलेल्या शरभाचे शिल्प असून एक मराठी शिलालेख आहे तर उजव्या बाजूस एक शिलालेखाचा दगड पडलेला आहे. हे दोन्ही शिलालेख देवनागरीत असुन त्यांची अक्षरे पुसट झाली आहेत. इथुन काही फुटावर असलेला गडाचा दुसरा उध्वस्त दरवाजा पार केल्यावर डाव्या बाजुच्या तटबंदीत काही पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढुन वर आल्यावर तटबंदीबाहेर काही सपाटी आहे. या सपाटीच्या टोकाला एक लहान बुरुज आहे. हा बुरुज उतरुन १०-१२ पावले पुढे आल्यावर उजव्या बाजूला किल्ल्याच्या कातळात देवनागरी लिपीत कोरलेला १६ ओळींचा मराठी भाषेतील शिलालेख पहायला मिळतो. हा शिलालेख शालिवाहन शके १४६९ ला म्हणजेच इ.स.१५४७ साली आषाढ माहिन्यात एकादशीला कोरलेला आहे. साधारण पाचशे वर्ष जुना असलेल्या या शिलालेखात बागुल वंशातील राजा महादेव यांचा पुत्र बहीरमसेन याने निजामशहाच्या ताब्यात असलेला हातगड किल्ला वेढा घालून जिंकल्याचा उल्लेख केला आहे. हा शिलालेख किल्ल्याच्या बाहेरील बाजुस असल्याने व त्याचे नक्की ठिकाण माहित नसल्याने बऱ्याच जणांना हा शिलालेख पहाता येत नाही. शिलालेख पाहिल्यावर परत दरवाजाकडे येऊन गड चढण्यास सुरवात करावी. दुसऱ्या दरवाजातून थोडे पुढे आल्यावर आपण कातळातून खोदलेल्या तिसऱ्या भुयारी दरवाजातून आत प्रवेश करतो. या दरवाजा शेजारी असलेला उंच बुरुज व कातळातील खाचा पहाता या दरवाजातुन पुढे जाणारी वाट पुर्णपणे बंदीस्त केलेली दिसते. दरवाजाच्या उजव्या बाजूच्या कातळात तीन टप्प्यात एक भलीमोठी गुहा कोरलेली असुन त्यात पाण्याची तीन कोरडी पडलेली टाकी आहेत. या ठिकाणी बहुदा गडावरील शिबंदीची राहण्याची सोय असावी. तिसऱ्या दरवाजापासून चौथ्या दरवाजापर्यंतचा संपुर्ण भाग कातळात कोरून काढला आहे. या कातळात उजव्या बाजुस गणेशमुर्ती तर डाव्या बाजुस हनुमान मुर्ती कोरलेली आहे. येथुन कातळात कोरलेल्या २०-२५ पायऱ्या चढत आपण चौथ्या दरवाजासमोर येतो. चौथ्या दरवाजाला लोखंडी जाळी दरवाजा बसवलेला असुन संध्याकाळी ६ नंतर हा दरवाजा बंद करण्यात येतो. या दरवाजाने कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासुन ३२८० फुट असुन गडमाथा ८ एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरलेला आहे. माथ्यावर आल्यावर समोरच गडाची आजही मोठया प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी दिसुन येते. आपण प्रवेश केलेल्या ठिकाणाहुन किल्ला उजवीकडे व डावीकडे असा दोन भागात विभागला असुन सर्वप्रथम डावीकडील लहान भाग पाहुन घ्यावा. या तटबंदीत असलेल्या जंग्या व त्यावरील चर्या लक्ष वेधणाऱ्या आहेत. समोरील वाटेने खाली उतरत डावीकडे वळल्यावर तटबंदीतील फांजीवरून आपण बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावर कुण्या पिराची अलीकडेच बांधलेली कबर आहे. बुरुजाच्या उजवीकडे तटबंदीची उंच भिंत असुन समोरील बाजुस पाण्याने भरलेले आयताकृती आकाराचे मोठे टाके आहे पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. हा बुरुज किल्ल्याच्या एका सोंडेवर बांधला असुन खालील बाजूने या बुरुजापर्यंत येता येऊ नये यासाठी हि सोंड एका खाचेने किल्ल्यापासून वेगळी केली आहे. गाडीमार्गाने किल्ल्यावर येताना या बुरुजाच्या तळात एक दरवाजा दिसतो पण वरील बाजूने त्या दरवाजात जाण्याचा मार्ग दिसत नाही. हा मार्ग काळाच्या ओघात बुजून गेला असावा. गडाची डावी बाजु पाहून दरवाजाकडे येऊन उजवीकडील भाग पाहण्यास सुरवात करावी. या भागात खूप मोठया प्रमाणात वास्तु अवशेष असुन या सर्व बांधकामावर मुघलशैलीचा प्रभाव आहे. वाटेच्या सुरवातीला डाव्या बाजुस जमीनीवर कातळात कोरलेले शिवलिंग असुन त्याशेजारी मातीने भरलेले टाके तर त्यापुढे उजवीकडे पाण्याचे टाके आहे. येथुन पुढे गेल्यावर डाव्या बाजुस बुरुजासारखी गोलाकार इमारत दिसते. इमारतीच्या आतील बाजुस असलेला चुन्याचा गिलावा व त्यातील खापरी नळ पहाता या इमारतीचा उपयोग खालील तलावातील पाणी येथे आणुन हवेच्या दाबतंत्राने ते संपुर्ण गडावर फिरविण्यासाठी केला जात होता. या इमारती समोर उतारावर कातळात कोरलेले एकाखाली एक असे पाण्याचे दोन मोठे तलाव पहायला मिळतात. यातील खालील तलावाच्या मध्यभागी पाण्याची पातळी मोजण्यासाठी खांब उभारलेला असुन तलावात उतरण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. टाके पाहुन पुढे आल्यावर तटाला लागुन असलेल्या इमारतीच्या उध्वस्त भिंती दिसतात. इमारतीच्या आतील भागात कारंज्यासाठी असलेला हौद दिसतो. येथे समोरील बाजुस चौकोनी आकाराची अर्धगोलाकार छत असलेली इमारत असुन या इमारती समोर एक चौकोनी खोल टाके आहे. हि इमारत म्हणजे हमामखाना असुन इतका सुस्थितीतील हमामखाना कोणत्याही किल्ल्यावर पहायला मिळत नाही. हमामखान्याच्या छताला वाफ कोंडण्यासाठी असलेली गवाक्षे तसेच भिंतीबाहेर गरम पाण्यासाठी असलेले चुलाणे, पाण्याचे खापरी नळ, छतावर फिरवलेले पाणी, आतील पाण्याचे हौद व येथील जलव्यवस्थापान हे सारेच अभ्यासनीय आहे. येथील एकुण अवशेष पहाता हा भाग म्हणजे गडावरील राजवाडा आहे. या भागात मोठया प्रमाणात वास्तुंचे चौथरे पसरलेले आहेत.हमामखाना पाहुन पुढे आल्यावर तटाला लागून उजवीकडे नव्याने उभारलेला ध्वजस्तंभ आहे तर डावीकडे एक पायऱ्याशेजारी एक जुनाट इमारत दिसते. हि इमारत गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. या वास्तुच्या आतील बाजुस अनेक कमानी असून पूर्व-पश्चिम भिंतीत झरोके आहेत. अंबरखान्याशेजारी पाण्याचे एक मोठे टाके असुन त्यापुढील भागात अजून दोन टाकी पहायला मिळतात. गडावर मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी एकही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. हे पाहुन परत ध्वजस्तंभाकडे यावे. ध्वजस्तंभावरून पुढे जाणारी वाट गडाच्या उजवीकडील टोकापर्यंत जाते. गडाच्या या निमुळत्या होत जाणाऱ्या सपाट भागावर एक चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. संपुर्ण किल्ल्याच्या काठाला दगडी तटबंदी असुन वनखात्याने या तटबंदीला लोखंडी कठडे बसविले आहेत. गडाच्या या टोकावरून किल्ल्यावर येणारी संपर्ण वाट नजरेस पडते. येथुन डावीकडील तटबंदी व त्यावरील बुरुज पहात दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास पुरतो. गडावरुन दुरवरचा सापुतारा परीसर तसेच साल्हेर-सालोटा किल्ले नजरेस पडतात. इतिहासात या गडाच्या फारशा नोंदी नसल्या तरी गडाचा इतिहास थेट १३ व्या शतकापर्यंत जातो. १३ व्या शतकापासून अस्तित्वात असलेला हा गड हस्तगिरी, होलगड, हातगा दुर्ग, हद्दगड, अशा विविध नावानी ओळखला जात होता. बागलाणात बागूल राजांची राजवट इ.स.१३०० ते इ.स.१७०० अशी होती. बागूल राजांचा कवी रुद्र याने इ.स.१५९६ मध्ये लिहिलेल्या राष्ट्रौढवंशम महाकाव्यम् या ग्रंथात बागूल राजांनी हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. नंतर हा किल्ला बागूल राजाकडून पुन्हा निजामशाहीत गेला. १६ व्या शतकात निजामशाहने जिंकून घेतलेल्या ५८ किल्ल्यांच्या यादीत हातगडचा उल्लेख हातगा असा येतो तर मुघल कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख होलगड असा येतो. याबाबत असा उल्लेख येतो कि मुघलांच्या वतीने सय्यद अब्दुल्ल याने आपला मुलगा हसनअली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते. किल्ला जिंकल्यावर विजयाचे प्रतिक म्हणुन हसनअलीने बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ रोजी सोन्याचा किल्ली पाठवली. बादशहाने हसनअलीला खान ही पदवी देत त्याची मनसब वाढवली. शिवाजी महाराजांच्या काळात गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे सुरगणा प्रांतात मोहिमेवर असता त्यांनी आदिलशाही किल्लेदार शुराबखान याच्याकडून शके १५८६ (सन १६६३) मध्ये हातगड किल्ला ताब्यात घेतला. पेशवाईत किल्ला मराठय़ांकडे असताना रंगराव औढेकर किल्लेदार होते. त्यावेळेस सुपकर्ण भिल्ल याने या गडावर हल्ला केला पण किल्लेदाराने हा हल्ला परतवल्याने चिडलेल्या सुपकर्ण भिल्लाने पायथ्याचे गाव पेटवून पळ काढला असे सांगितले जाते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!