हरिहर

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३५८६ फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील प्रत्येक गडाला स्वतःचे असे वेगळेपण आहे. काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत तर काही किल्ले त्यांच्या दुर्गवैशिष्ठमुळे प्रसिध्द आहेत. उभ्या कड्यात ७० अंशाच्या कोनात असलेल्या खोदीव पायऱ्या या दुर्गवैशिष्ठमुळे प्रसिध्द असलेला असाच एक गड म्हणजे हरिहरगड. संपुर्ण महाराष्ट्रातील गड-किल्यांत अतिशय दुर्मिळ असा प्रवेशमार्ग या गडावर आजही शिल्लक आहे पण आज त्याचे हे सौंदर्य त्याच्या मुळावर उठले आहे. मुंबई-पुणे-नाशिक या शहराशी असलेली या गडाची जवळीक यामुळे या गडावर आयोजकांकडून भटकंतीचा बाजार भरत आहे. शनिवार-रविवार या दिवशी गडावर होणाऱ्या भयानक गर्दीमुळे येथे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. अशा गोष्टीना वेळीच आवर घालायला हवा. नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. ... हरिहर हा या त्र्यंबक रांगेतील त्र्यंबकगडा पाठोपाठ महत्त्वाचा दुसरा किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. निरगुडपाडा व हर्शेवाडी हि गडाच्या पायथ्याचे गावे असुन निरगुडपाडा येथुन गडपायथ्याला जाण्यास दिड तास तर हर्शेवाडी येथुन एक तास लागतो. या दोन्ही वाटांनी आपण एकाच ठिकाणी गडाच्या पायथ्याला पोहोचतो. कमी वेळात व कमी श्रमात संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास हर्शेवाडी हा योग्य पर्याय आहे. मुंबई-नाशीक महामार्गावरून घोटीमार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि.मी.आहे. स्वतःचे वाहन असल्यास तेथुन ५ कि.मी. अंतरावर असलेल्या हर्शेवाडी गावात कच्च्या रस्त्याने जाता येते अन्यथा निरगुडपाडा येथूनच गड चढण्यास सुरवात करावी. नाशिक-हर्शेवाडी हे अंतर त्रिंबकमार्गे ४१ कि.मी. असुन नाशीक व पुणेकरांसाठी हा मार्ग सोयीचा आहे. हर्शेवाडी गावामधून समोरच हरिहर ऊर्फ हर्षगडचा डोंगर दिसतो. येथून एका बंधा-याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्याखालील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. या वाटेवर डाव्या बाजुला एक समाधीचा दगड असुन त्यापुढे काही अंतरावर एक ढासळलेले कोरडे बांधीव टाके आहे. टा टाक्याच्या पुढे एक आश्रम व त्याशेजारी दगडी बांधणीची पुष्करणी आहे. पुष्करणीच्या काठावर गणेश व शिवमंदीर असुन आश्रमाच्या मागे असलेल्या झाडीत काही अंतरावर हनुमान मंदीर आहे. या पुष्करणीच्या भिंतीवर एका कोपऱ्यात दगडावर कोरलेला देवनागरी लिपीतील आठ ओळींचा शिलालेख आहे. या शिलालेखाभोवती महिरप कोरलेली असुन बाजुला दोन नक्षीदार खांब व वरील बाजुस कमळाची नक्षी व खालील बाजूस दोन पक्षी कोरलेले आहेत. हा शिलालेख पुढीलप्रमाणे आहे. श्री || श्री गणेशाय नम: त्रि व मा मि श्रुके धवल श शा ने यो श क त्र त: श्री मंत्रश गि र र स सु क्त सत शालिवाहने शके हरिहर विलसदे लोक श्रमनिरहसते श्रेय मंगलाय || या शिलालेखात हरिहर किल्ल्याच्या उल्लेख आहे. याशिवाय शालिवाहन शके गणेशाय नमः अशी काही अक्षरे सहजपणे वाचता येतात. हा शिलालेख तैलरंगात रंगवलेला असल्यामुळे काही अक्षरे वाचता येत नाहीत. सध्या येथे एका साधुचा मुक्काम असतो. गडावर मुक्काम करावयाचा झाल्यास हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे सर्व पाहुन मुळ वाटेवर येऊन काही अंतर गेल्यावर आपण किल्ल्यासमोरील पठारावर पोहोचतो. निरगुडपाडा येथुन येणारी वाट या पठारावर आपल्याला येऊन मिळते. या ठिकाणी काही शेंदूर फासलेले दगड ठेवलेले आहेत. येथुन समोर दिसणाऱ्या उंचवट्याला डावीकडे ठेवत चढाई करायची. येथे येणाऱ्या गर्दीमुळे सध्या गावकऱ्यांनी येथे चहा-पाणी,सरबत, जेवण-नाश्ता याची दहा बारा दुकाने थाटली आहेत. या दुकानामधुन वाट काढत मळलेल्या वाटेने दहा- पंधरा मिनिटे समोरचा चढ चढत पुन्हा एका उंचवट्याला उजवीकडे ठेवत गेलो कि आपण हरिहर गडाच्या कातळभिंतीत कोरलेल्या पायऱ्यां असलेल्या लहानशा खिंडीत पोहचतो. या पायऱ्या सुरु होण्यापुर्वी त्याच्या विरुध्द दिशेला खालील बाजुस एक खडकात कोरलेले पाण्याचे लहानसे टाके आहे. किल्ल्यावर जाणारा हा ७०अंशी कोनात कोरलेला सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग व त्यावरील दरवाजा हा पहाताक्षणी त्याच्या प्रेमात पाडणारा आहे. १८१८सालच्या मराठा-इंग्रज लढाईत इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने हरिहरगड जिंकला. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा या पाय-या बघून तो आश्चर्यचकित झाला. जिंकलेल्या किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करणे हे इंग्रजांचे धोरण होते पण हरिहर किल्ल्याच्या या पाय-यांनी कॅप्टन ब्रिग्ज भारावला. त्याने हरिहरगड जिंकला पण त्याच्या सुंदर पायरीमार्गाला मात्र हात लावला नाही. हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या या मार्गाची शोभा वाढवितात. या पाय-यांनी एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाऊ शकतो. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी आधारासाठी खोबण्या असुन काही पायऱ्या ढासळलेल्या असल्याने थोडे जपूनच चढावे लागते. साधारण नव्वद पायऱ्यां चढल्यावर गडाचा पहीला पश्चिमाभिमुखी लहानसा दरवाजा लागतो. या दरवाजातून आत आल्यावर समोरच उजवीकडे कातळात गणपतीची अनगड मूर्ती कोरलेली असुन त्यावर शेंदुर फासलेला आहे. दरवाज्याची कमान व तटाबुरुजावरील फांजीचे बांधकाम विटांनी केलेले आहे. या दरवाजाच्या पुढे डोंगरांची कातळ कपार खोदून आडवी वाट तयार केली आहे. ह्या मार्गाची उंची जास्त नसल्यामुळे थोडे वाकूनच हा टप्पा पार करावा लागतो. या मार्गाने पुढे गेल्यावर कातळातच खोदलेले दोन पश्चिमाभिमुखी दरवाजे पार करताना साधारण ३०-४० पाय-या लागतात. या जिन्याच्या दोन्ही बाजूंस आधारासाठी असलेल्या खोबणीची मदत घेत आपण गडाच्या अंतिम दरवाजा असलेल्या भुयारी मार्गात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार केल्यावर आपला गडात प्रवेश होतो. या दरवाजावर असलेला विटांचा घुमट मोठया प्रमाणात ढासळलेला असुन या विटा दरवाजातच पसरलेल्या आहेत. दरवाजाच्या पुढील भागात काही उध्वस्त वास्तुंचे अवशेष असुन ते पार केले कि आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन त्याचा विस्तार १६ एकरात सामावलेला आहे. आकाशातून पहिले असता या किल्ल्याचा आकार पंख पसरलेल्या गरुडासारखा दिसतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३४४५ फुट उंच असून गडाला चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची गरज भासली नाही. गडावर येण्यासाठी आपण आलो ती एकमेव पायऱ्यांची वाट आहे. दरवाजातून काही अंतर पुढे आल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस दरीत कड्यालगत कोरलेल्या उध्वस्त दरवाज्याचे व प्रवेशमार्गाचे अवशेष दिसतात परंतु या दरवाज्यापर्यंत जाणारी वाट उध्वस्त झाली आहे. हा गडाच्या मूळ बांधकामातील दरवाजा कालांतराने दरड कोसळुन उध्वस्त झाला असावा. या दरवाजाच्या वरील बाजुस एक ५० फुट खोल कोठार आहे पण तिथे उतरण्यासाठी दोर सोबत असणे गरजेचे आहे अन्यथा हे कोठार वरूनच पहावे लागते. कोठाराच्या वरील बाजूस एक खडकात कोरलेले बुजलेले टाके आहे. ते पाहुन पुढे गेल्यावर आपल्याला एका मोठया वास्तुचे अवशेष दिसुन येतात. हि बहुदा गडाची सदर अथवा वाडा असावा. या वाटेवर डाव्या बाजुला खडकात कोरलेली एक गुहा दिसुन येते. ती पार करून पुढे गेल्यावर कातळात कोरलेली पाण्याची तीन मोठी टाकी व एक प्रशस्त तलाव दिसतो. या तलावाला पश्चिमेकडे दगडी भिंत बांधून पाणी अडविले असुन तलावाच्या काठावर लोखंडी देव्हाऱ्यात हनुमंताची मुर्ती ठेवलेली आहे. तलावाच्या काठावर दोन लहान चौथरे असुन एका चौथऱ्यावर शिवलिंग व नंदी तर दुसऱ्या चौथऱ्यावर मारुतीची भग्न मूर्ती ठेवलेली आहे. तलावाच्या उजव्या बाजुला असलेल्या उंबराच्या झाडाखाली एक खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील व तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे. या तलावाकडून समोरच आपल्याला एक घुमटाकार माथा असलेली दारुगोळा कोठाराची दगडी इमारत दिसते. तलावाकडून या इमारतीकडे जाताना वाटेत डाव्या बाजुला एक साचपाण्याचा खोदीव तलाव दिसुन येतो. या तलावाच्या मध्यभागी खडकात खोदलेले चौकोनी टाके आहे. ते पाहुन पुढे आल्यावर डाव्या बाजुला दुसरे खडकात खोदलेले खांब टाके आहे. सध्या हे टाके मातीने पुर्णपणे भरून गेले आहे. या परिसरात असलेले तुरळक वाड्याचे अवशेष व इतर उध्वस्त बांधकाम पहात आपण ३० x १२ फूट लांबरुंद अशा दगडी कोठाराकडे पोहोचतो. दारूगोळा कोठाराची हि वास्तू गडावरील छत शिल्लक असलेली एकमेव इमारत आहे. या कोठाराचे आत दोन भाग केलेले असुन आत शिरण्यासाठी एक लहान खिडकीवजा दरवाजा आहे. या कोठीत दिवसासुद्धा काळोख असल्याने कोठाराच्या भिंतीत एक मोठी लोखंडी पणती ठोकलेली दिसुन येते. या कोठारात १० ते १२ जण सहज राहु शकतात. कोठाराच्या पुढील बाजूस खडकात खोदलेली ५ लहानमोठी टाकी असुन मागील बाजूस एक मोठे टाके व त्यामागे एक लहान तळे खोदलेले आहे. यात एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. येथे डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. दारुकोठार आणि आजूबाजूचा परिसर भटकून झाल्यानंतर किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजे टेकडीकडे निघायचे. टेकडीवर जाणारी वाट थोडी निसरडी असल्यामुळे काळजीपूर्वक चढाई करावी लागते. दारूगोळा कोठारा समोर असलेली ६०-७० फूट उंचीची टेकडी म्हणजे हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे. या टेकडीवर जाताना आपल्याला शेवटचा कातळटप्पा चढून पार करावा लागतो. माथ्यावर ध्वजस्तंभाची जागा असुन येथे भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा असलेल्या या ठिकाणावरून संपुर्ण हरीहर किल्ला तसेच त्रिबक डोंगररांगेत उत्तरेला वाघेरा तर दक्षिणेला कावनाई व त्रिंगलवाडी पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यामागे ब्रह्मगिरी किल्ला तर पश्चिमेला फणी डोंगर, बसगड, उतवड, अंजनेरी किल्ला, वैतरणा जलाशय इ. परिसर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाचा घेरा निमुळता असला तरी वर असलेल्या अवशेषांमुळे संपूर्ण गडफेरी करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र काळजीपूर्वक उतरावे लागते. हरिहर उर्फ हर्षगड हा किल्ला कोणत्या राजवटीत बांधला गेला ह्याबद्दल निश्चित असा पुरावा नाही पण गडाचे एकंदरीत खोदकाम पहाता हा किल्ला सातवाहन काळात त्रिंबकगडाच्या बरोबरीने बांधला गेला आहे. १६३६ साली शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हा किल्ला जिंकून घेतला. नंतर मात्र याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७०-७१ याकाळात मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक परिसरातील किल्ले जिंकून घेतले त्यावेळी हा किल्ला जिंकून घेतला. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला. इ.स.१८१८ मध्ये ब्रिटीशांनी त्र्यंबकगड जिंकल्यावर हा गड देखील मराठयांच्या ताब्यातून घेतला. पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ जमा होत असल्याने चढताना किंवा उतरताना पाय घसरण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात हरिहर किल्ल्यावर जाणे टाळावे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!