हरिश्चंद्रगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नगर

उंची : ४६२६ फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील सर्वात उंच गड, महाराष्ट्रात विस्ताराने सर्वात मोठा गड असे प्रथम क्रमांकाचे दोन-दोन स्थान पटकावणारा गड म्हणजे हरिश्चंद्रगड !!! गडाचा विस्तार इतका प्रचंड आहे कि ठाणे, पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा या गडाला भिडलेल्या आहेत. साधारण १७५० एकरवर पसरलेल्या या गडावर जाण्यासाठी एकुण १२ वाटा असुन या वाटांवर सहा दरवाजे आहेत. हे दरवाजे नष्ट झाले असले तरी त्यांचे अवशेष या मार्गावर पहायला मिळतात. या १२ वाटा म्हणजे १.पाचनई २. वेताळधार ३.गणेशधार ४.राजमार्ग ५.खिरेश्वर ६.कोतुळ ७.लव्हाळे ८.राजधरची वाट ९.जुन्नर दरवाजा १०.माकडनाळ ११.नळीची वाट (भवानी नाळ) १२.बैलघाट. यातील काही वाटा टोलारखिंडीत एकत्र येतात. कोणतेही साहस न करता संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास खिरेश्वर व पाचनई या वाटा सोयीच्या असुन आज याच दोन वाटा प्रामुख्याने वापरात आहेत. या दोन्ही गावात जाण्यासाठी एस.टी.बसची सोय आहे. यातील एका वाटेने वर चढुन दुसऱ्या वाटेने खाली उतरल्यास दोन दिवसात संपुर्ण किल्ला पाहुन होतो पण यासाठी एक रात्र गडावर मुक्काम करणे गरजेचे आहे. ... यातील पाचनईमार्गे हरिश्चंद्रगडावर जाण्याची वाट नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे. राजुर - पाचनई हे अंतर २९ कि.मी असुन राजुर येथुन पाचनईला जाणारी एस.टी.बस आहे. पाचनई गावातुन गडावर जाणारी वाट फारच सोपी असुन या वाटेने गडावरील हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर गाठण्यास २ तास पुरेसे होतात. गडावर जाण्यासाठी असलेली दुसरी सोपी वाट म्हणजे खिरेश्वर. पुण्याकडून येणारी मंडळी बहुधा याच वाटेचा वापर करतात. मुंबईहुन मुरबाडमार्गे माळशेज घाट चढुन आल्यावर आपण घाट माथ्यावरील खुबीफाट्यास पोहोचतो. खुबी फाट्यावरून ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव आहे. पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत ठराविक एस.टी. बस आहेत. गाडी मिळाली तर ठीक अन्यथा हे अंतर पायी पार करावे लागते. गावाच्या अलीकडे एका ओढ्याच्या काठावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. खिरेश्वरमार्गे हरीश्चंद्रगडावर जात असल्यास आवर्जुन पहावे असे हे मंदिर आहे. अकराव्या शतकातील या मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावर शेषयायी विष्णु व त्याच्या परीवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. बाहेरील सभामंडप छताला सोळा शिल्पपट बसवलेले आहेत. या शिल्पपट्टीकेवर मूषकवाहन गणेश-रिद्धी, वृषभवाहन शिव-पार्वती, हंसवाहन ब्रम्ह-सरस्वती, मयूरवाहन स्कंद-षष्टी, नरवाहन कुबेर-कुबेरी, मकरवाहन मदन-रती अशा अनेक कोरीव प्रतिमा कोरलेल्या आहेत. या मंदिराला स्थानिक नागेश्वराचे मंदिर म्हणुन ओळखतात. या मंदिरापासुन काही अंतरावर कातळात कोरलेली दोन लेणी असुन यातील एक लेणे बारा खांबावर तोललेले आहे. जवळच पाण्याचे बारमाही टाके आहे. या लेण्याजवळूनच जुन्नर दरवाजाने गडावर जाणारी वाट आहे पण वाटाड्या सोबत असल्याशिवाय या वाटेने जाऊ नये. हि वाट सामान्य पर्यटकांच्या कुवतीबाहेर आहे. गावातून टोलारखिंड मार्गे गडावर जाण्यासाठी मळलेली सोपी वाट असुन या वाटेने गडावरील्र मंदिरापर्यंत जाण्यास चार तास लागतात. वाट सोपी असली तरी चढ असल्याने चांगलीच थकवणारी आहे. डिसेंबर नंतर या मार्गावर कुठेच पाणी नसल्याने पुरेसे पाणी सोबत बाळगावे. खिरेश्वर गावातुन सुरवात केल्यास टोलार खिंडीत येण्यास साधारण दीड तास लागतो. या खिंडीत वाघाचे शिल्प कोरलेला दगड ठेवलेला असुन सरळ जाणारी वाट कोथळे गावात जाते तर डावीकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून वर चढणार्याा या वाटेवर काही ठिकाणी खडकात पायऱ्या खोदलेल्या आहेत. या वाटेवर वरील बाजुस काही प्रमाणात तटबंदी असुन येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. या वाटेने थोडे पुढे आल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात. यातील जास्त मळलेली वाट थेट हरिश्चंद्र मंदीराकडे जाते तर कमी मळलेली वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या टेकडीजवळ आल्यावर शिखराच्या वरील बाजुस घडीव दगडात बांधलेले तटबंदीचे पागोटे पहायला मिळते. या वाटेवर आपल्याला डावीकडुन म्हणजे दक्षिणेकडून जुन्नर दरवाजाने बालेकिल्ल्याकडे येणारी पायवाट दिसते. जुन्नर दरवाजा पहायचा असल्यास आपण या वाटेने चालायला सुरवात करायची. बालेकिल्ल्याला वळसा घालत जाणारी हि वाट १० मिनीटात एका उतारावर पोहोचते. या उताराने थोडे खाली आल्यावर डाव्या बाजुस कातळावर एका रेषेत खोदलेले काही खळगे पहायला मिळतात. या खळग्यांच्या खालील बाजुस कातळात खोदलेल्या दोन गुहा असुन एका गुहेशेजारी पाण्याचे टाके आहे. यातील एक गुहा राहण्यायोग्य असुन त्यात चार-पाच माणसे राहु शकतात तर दुसऱ्या गुहेच्या मध्यभागी सुबक पण भग्न शिवलिंग मांडलेले आहे. या गुहा पाहुन मूळ वाटेने अजुन थोडे खाली उतरल्यावर सपाटीवर एका मोठ्या वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. वाटेने थोडे पुढे आल्यावर उघडयावर कातळात कोरलेले अजुन एक पाण्याचे टाके दिसते. या टाक्याच्या पुढील भागात गडाचा जुन्नर दरवाजा आहे. हा दरवाजा आपल्याला नाणेघाटाच्या घळीची आठवण करून देतो. घळीच्या वरील दोन्ही बाजुस तटबंदी बांधलेली असुन घळीत उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. दरवाजाची पुर्णपणे पडझड झालेली असुन केवळ बांधकामाच्या खुणा शिल्लक आहेत. या घळीत साधारण १०० फुट खाली उतरल्यावर कातळात कोरलेली एक गुहा व तिच्या वरील बाजुस पाण्याचे टाके पहायला मिळते. घळीच्या दुसऱ्या बाजुस खिरेश्वर गावाच्या दिशेने गेलेली गडाची सोंड असुन या सपाटीवर मोठ्या प्रमाणात घरांचे अवशेष आहेत. जुन्नर दरवाजा व आसपासचा परिसर पाहुन झाल्यावर मागे फिरून पुन्हा बालेकिल्ल्याच्या वाटेवर यायचे. बालेकिल्ल्याचा चढ मुरमाड व घसार्याचा असल्याने काही ठिकाणी हात-पाय टेकवत वर चढावे लागते. बालेकिल्ल्याच्या डोंगराला भिडल्यावर सर्वप्रथम पडझड झालेल्या बांधीव पायऱ्या समोर येतात. पुढे काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पावट्या आहेत. गडाची तटबंदी पुर्णपणे घडीव दगडात बांधलेली असुन या बाजूची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. त्यात या दिशेला असलेला दरवाजा पण कोसळल्याने तुटलेल्या तटबंदीतुन आपण माथ्यावर प्रवेश करतो. गडाची दुसऱ्या बाजुस असलेली तटबंदी शिल्लक असली तरी त्यातील दरवाजा कोसळलेला असुन त्याचा केवळ चौथरा शिल्लक आहे. बालेकिल्ल्याचा माथा साधारण ३ एकरवर पसरलेला असुन त्यावर लहान-मोठ्या वास्तुंचे अवशेष तसेच पाण्याची लहान-मोठी चार टाकी पहायला मिळतात. यातील तटबंदीच्या काठावर असलेले एक टाके कोरडे पडलेले असुन एका टाक्यावर गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. गडाच्या सर्वात उंच ठिकाणावर किल्लेदाराचा वाडा असुन या वाड्याच्या चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केलेला आहे. वाड्याच्या बाहेरील बाजुस शिवलिंग असलेली दगडी घुमटी असुन आतील बाजुस पाण्याचे लहान टाके आहे. या पाचव्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. बालेकिल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन ४४८२ फुट उंचावर असुन माथ्यावरून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड असा उत्तरेकडील, तर माळशेज घाट, भैरवगड, नानाचा अंगठा, जीवधन हा दक्षिण- पश्चिमेकडील प्रदेश नजरेस पडतो. बालेकिल्ला पाहुन खाली उतरल्यावर आपण आलो त्या वाटेने सरळ चालण्यास सुरवात केल्यावर तासाभरात तारामती शिखराखाली असलेल्या हरिश्चंद्रेश्वराच्या मंदीराजवळ पोहोचतो. या वाटेने जाताना आपल्याला दोन ठिकाणी वास्तु अवशेष तर एका ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या पहायला मिळतात. यातील एका ठिकाणचे वास्तु अवशेष हे घडीव दगडांचे आहेत. पाचनई व खिरेश्वर येथुन येणाऱ्या वाटा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी एक लहानशी घुमटी असुन या घुमटीसमोर पाण्याचे लहान टाके आहे. या घुमटीत एक शिवलिंग असुन तेथेच राजा हरिश्चंद्र कावडीने पाणी भरत असल्याचे शिल्प ठेवलेले आहे. या घुमटीच्या आसपास काही स्मरणशिळा तसेच भग्न शिल्प आहेत. येथुन समोरच काही अंतरावर प्राकाराच्या आत हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे येथील एकमेव मंदिर नसुन या मंदीराच्या प्राकाराबाहेर अजुन काही लहानमोठी भग्न मंदीरे आहेत. यात दोन गुहामंदीरे असुन एका गुहामंदीरात विनायकाची तर दुसऱ्या गुहामंदीरात शिवलिंग आहे. एका मंदीरात विश्वामित्र ऋषीची भग्न मुर्ती असुन दुसऱ्या एका मंदीरात गणपती व शिवपार्वतीची मूर्ती आहे. उर्वरीत बहुतांशी मंदीरात शिवलिंगाच्या स्थापना केलेल्या आहेत. हा लहानमोठ्या अनेक मंदिरांचा समूह आहे ज्यात हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे मुख्य आहे. या मंदिर परीसरात पुष्करणी वगळुन लहान मोठी पाण्याची एकुण बारा टाकी आहेत. यातील बहुतांशी टाकी हि मंदिरासाठी दगड काढल्याने निर्माण झाली आहेत. मंदीराच्या प्राकाराबाहेर असलेली पुष्करणी ‘सप्ततीर्थ’ म्हणून ओळखली जाते. या पुष्करणीच्या एका काठावर चौदा देवळ्या असून त्यात विविध आयुधे धारण केलेल्या चौदा विष्णुमूर्ती होत्या पण त्यातील काही मुर्ती चोरीस गेल्याने पुरातत्व खात्याने उर्वरीत मुर्ती हरिश्चंद्रेश्वर मंदिरामागील गुहेमधे ठेवलेल्या आहेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले दगड पहायला मिळतात. मंदीर परीसर पाहुन झाल्यावर मुख्य मंदिराच्या दिशेने निघावे. मुख्य मंदीराचे बांधकाम दोन उंचवट्यामधील घळीत केलेले असुन संपुर्ण मंदिराला प्राकाराची भिंत आहे. या प्राकारात प्रवेश करण्यासाठी पुर्व दिशेला एकमेव दरवाजा असुन या दरवाजा समोरच एक दगडी पूल आहे. प्राकाराबाहेरील एका टाक्यात पाण्याचा जिवंत झरा असुन टाक्याचे पाणी या दगडी पुलाखालुन वाहते तसेच पावसाळ्यात तारामती शिखरावरून वाहत येणारे पाणी देखील याच पुलाखालुन वाहते. त्यामुळे या ठिकाणास मंगळगंगेचा उगम म्हणुन ओळखले जाते. पुढे हा प्रवाह पाचनई गावाच्या दिशेने वाहत जातो. पाचनई गावात जाणाऱ्या वाटेने गेल्यास एक उंच कड्यावरून हे पाणी खाली कोसळताना दिसते. या कड्यावर दगडी भिंत घालुन हे पाणी गडावर वापरण्यासाठी अडवलेले दिसुन येते. या बंधाऱ्याची आता काही प्रमाणात पडझड झाल्याने पाणी अडत नाही. हा बंधारा पहाण्यासाठी पाचनई गावातुन येणारा मार्ग सोयीचा आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदीराच्या प्राकाराच्या दरवाजासमोर तीन कीर्तीमुखे मांडलेली असुन दरवाजाच्या भिंतीवर दोन्ही बाजुस दोन शिलालेख आहेत. यातील डावीकडील शिलालेखातील चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ।। अशा ओळी वाचता येतात. प्राकारच्या दरवाजातुन सहा पायऱ्या उतरल्यावर आपला मंदीराच्या आवारात प्रवेश होतो. हरिश्चंद्रेश्वर मंदीराची पायापासुन शिखरापर्यंत उंची साधारण चाळीस फुट असुन मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुर्व व पश्चिम असे दोन दरवाजे आहेत. या दोन्ही दरवाजांच्या दर्शनी भागात द्वारपाल कोरलेले असुन दोन्ही दरवाजासमोर नंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी एका अखंड शिळेवर गोलाकार वर्तुळ कोरलेले असुन या वर्तुळाच्या मध्यावर चौकोनी शिवलिंग कोरलेले आहे. या शिवलिंगाच्या मागील बाजुस अजुन एक शिवलिंग मांडलेले आहे. मंदिराचे शिखर वगळता भिंती, खांब आणि दरवाजावर आकर्षक कोरीव काम केलेले आढळते. मंदिराच्या कळसात असलेल्या दगडावर गोलाकार खळगे पाडुन त्यावर एक आकर्षक नक्षी निर्माण केलेली आहे. मुख्य मंदीराला लागुन असलेल्या दक्षिणेकडील चौथऱ्यावर गणपतीबाप्पा विराजमान झाले असुन या मुर्तीच्या वरील बाजुस असलेल्या चौकटीवर देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. यातील अक्षरे (श्रिदशी ण नाथ कासिष सकपनाथ ) याप्रमाणे आहेत. मंदिराच्या पश्चिम बाजुस झीज झालेल्या सहा फुट उंचीच्या दोन भैरवमूर्ती असुन दक्षिणेला एक विरगळ पहायला मिळते. ग्याझेटमध्ये या मंदीराची तुलना उत्तरेतील बुध्दगयेच्या मंदिराशी करण्यात आली आहे. मंदिराच्या पुर्व प्राकारच्या भिंतीला लागुन दोन लहान मंदीरे आहेत. मंदिराच्या उत्तरेकडील प्राकाराच्या भिंतीत कोरीवकामाने नटलेले अजुन एक मंदिर आहे. या मंदिरावर महासिद्ध विष्णुमंदिर लिहिले असले तरी मंदीराची एकुण घडण पहाता हे मंदिर शैव परीवारातील असावे. मंदिराच्या पश्चिमेस लहानमोठ्या एकुण सहा गुहा असून त्यांतील दोन गुहा म्हणजे पाण्याची टाकी आहेत. या दोन्ही गुहांमधील पाणी थंड व चवदार आहे. यातील एका गुहेमध्ये पुरातत्व खात्याने बाहेर उघडयावर असलेल्या मूर्ती एकत्रित करून ठेवलेल्या असुन दुसऱ्या गुहेत चौथरा आहे. या चौथर्यााखाली एक प्रशस्त खोली असुन त्यावर चौथर्यापची शिळा ठेवली आहे. गुहेच्या या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ’तत्वसार’ नावाचा तत्वज्ञान विषयक ग्रंथ लिहिला. या गुहेच्या खांबावर चांगावटेश्वर म्हणजे योगी चांगदेव यांचा उल्लेख असणारे लहानमोठे तीन शिलालेख पहायला मिळतात. या सर्व शिलालेखांचे डॉ.वी.भि.कोलते यांनी वाचन केलेले असुन पाचव्या शिलालेखात संत निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर,नामदेव यांनी त्यांच्या यात्रापर्वात श्रीहरिश्चंद्रपर्वताची यात्रा केल्याचा उल्लेख येतो. मंदिराच्या उत्तरेकडील प्राकाराच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. याशिवाय मंदिराच्या पश्चिम बाजुस असलेल्या उंचवट्यावर मध्यम आकाराची एक दगडी घुमटी पहायला मिळते. हि घुमटी डोंबाची घुमटी म्हणुन ओळखली जाते. रोहिदास शिखर न पहाता थेट कोकणकड्याकडे जाणारी वाट येथुनच जाते. मंदीर पाहुन प्राकाराबाहेर पडल्यावर मंगळगंगेच्या प्रवाहाच्या उताराच्या दिशेने साधारण २०० फुट गेल्यावर आपण केदारेश्वर गुंफेजवळ पोहोचतो. ५० x ५० फुट आकाराच्या या भव्य गुंफेत दक्षिणेकडील भिंतीवर शिवपुजनाचा प्रसंग कोरलेला असुन त्याशेजारी एक दालन कोरलेले आहे. पाण्याने भरलेल्या या गुहेच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर ३ फुट उंच व ६ फुट लांब असे भव्य शिवलिंग आहे. कधीकाळी या चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छताला आधार देण्यासाठी चार खांब होते पण आज यातील एक खांब पुर्णपणे नष्ट झाला असून दोन खांब अर्धवट तुटलेले आहेत व केवळ एकच खांब शिल्लक आहे. गुहेतील पाण्याची पातळी ३-४ फुट असुन शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास या थंडगार पाण्यातून जावे लागते. गुहेच्या दर्शनी भागात असलेल्या चौकोनी खांबावर दोन शिलालेख कोरलेले आहे. त्याचे वाचन याप्रमाणे १.श्री(वटे)सर सिवस्य प्रण(म)ति: २.(सिद्ध) श्री गुहेश्वरभैरव. केदारेश्वर दर्शन आटोपल्यावर पुन्हा हरिश्चंद्रेश्वर मंदीराजवळ यावे. मंदिराच्या डावीकडे म्हणजे दक्षिणेकडील डोंगराला तारामती शिखर असे नाव आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारामती शिखराच्या खालील बाजूस खडकात कोरलेल्या आठ-नऊ लेण्या तसेच पाण्याची भुमिगत टाकी आहेत. यातील एका गुहेत आठ फूट उंचीची आसनस्थ गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. या गणेश गुहेच्या आसपास असलेल्या गुहेत तसेच हरिश्चंद्रेश्वर मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या गुहेत राहण्याची सोय होते. गडाचा हा परीसर पाहुन गुहेत मुक्काम करावा. गडावर हौशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने राहाण्यासाठी तंबू तसेच चहापाण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सुरवात करून मंदिराच्या आसपास काही पहायचे राहिले असल्यास ते पाहुन घ्यावे. पाचनई व खिरेश्वर येथुन येणाऱ्या वाटा जेथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी तारामती शिखराची एका सोंड उतरली आहे. या सोंडेवरूनच शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. तारामती शिखर हे गडावरील सर्वात उंच शिखर असुन याची समुद्रसपाटीपासुन उंची ४६२६ फुट आहे. सततच्या वावरामुळे वाट चांगली मळलेली असुन सुरवातीची वाट हि दाट जंगलातुन जाते. साधारण पाउण तासाच्या चढाईनंतर आपण तारामती शिखरावरील ध्वजस्तंभाजवळ पोहोचतो. शिखर माथ्यावर कातळात कोरलेले एक शिवलिंग व त्याजवळ असलेले कोरीव दगडी उखळ वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. पण येथुन दिसणारा निसर्ग व आसपासचा परीसर पहाण्यासाठी तारामती शिखरावर जायलाच हवे. तारामती शिखरावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, कलाडगड, रतनगड, भैरवगड, (मोरोशी), अलंग, मदन, कुलंग, भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड हे किल्ले तसेच नाणेघाट, कात्राबाई , आजोबा, कळसूबाई इतका दूरवरचा परिसर दिसतो. तारामती शिखराच्या दुसऱ्या बाजूने उतरणारी वाट आपल्याला आपल्याला कोकणकड्यावर घेऊन जाते. या वाटेने उतरताना आपल्याला दोन शिड्या पार कराव्या लागतात. यातील दुसरी शिडी पार केल्यावर कड्याला लागुनच एक वाट डावीकडे जाताना दिसते. हि माकड नाळेची वाट असुन या वाटेने बरेच अंतर खाली उतरल्यावर एक गोमुख पहायला मिळते. या गोमुखातुन वर्षभर पाणी वाहत असते ? असे वाटाड्याने सांगीतले. गडाच्या पश्चिमेस असलेला कोकणकडा हे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण असुन केवळ हा कडा पहाण्यासाठी अनेक हौशी पर्यटक गडावर येतात. अर्धगोल आकाराचा हा कडा साधारण अर्धा कि.मी. लांब असुन मध्यभागी जवळपास ७५ फूट अंतर्वक्र आहे. पायथ्यापासून कड्याची उंची साधारण ३००० फुट असुन कड्याची सरळधार १५०० फूट असावी. या कड्यावरून संध्याकाळचा सुर्यास्त पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. इ.स.१८३५ साली कर्नल साईक्स याला या ठिकाणी इंद्रवज्र (संपुर्ण गोलाकार इंद्रधनुष्य) दिसल्याची नोंद आहे. कोकणकड्याच्या दुसऱ्या बाजुने दोन वाटा गडावर येतात. यातील पहिली वाट म्हणजे साधले घाटमार्ग तर दुसरी वाट म्हणजे नळीची वाट. स्थानिक लोक या वाटेला कोकण दरवाजा म्हणुन संबोधतात. सामान्य पर्यटकांना या दोन्ही वाटा सहजसाध्य नाहीत. येथुन या पठाराच्या दुसऱ्या टोकावर जाणारी पायवाट असुन हि पायवाट बैलघाट मार्गे पाचनई गावाच्या दिशेने खाली उतरते. या वाटेवर आपल्याला पाण्याची टाकी तसेच दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. बैलघाट मार्गे पाचनई गावात जाण्यासाठी तीन तास लागतात. हरिश्चंद्रगडाचा इतिहास सुरु होतो तो पुराणकाळापासुन. स्कंद, अग्नी, मस्त्य आणि पद्म पुराणांत हरिश्चंद्र पर्वताची महती वर्णने केलेली आहे. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत जोडला आहे. गडाची निर्मिती ५ व्या किंव्या ६ व्या शतकात त्रेकुटक अथवा कलचुरी या राजघराण्यांच्या काळात झाली असावी असे मानले जाते. दहाव्या शतकात शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यान बारा नद्यांच्या उगमस्थळी बारा शिवालये बांधली त्यात मंगळगंगेच्या उगमावर हरिश्चंद्रेश्वर हे शिवालय बांधले. याच काळात येथे विविध लेण्या कोरल्या गेल्या आहेत. तेराव्या शतकात योगी चांगदेव येथे वास्तव्यास असताना त्यांनी तत्त्वसार ग्रंथाची रचना येथेच केली. ग्रंथातील १०२८ ते १०३३ दरम्यानच्या ओव्यांमध्ये याबाबतचे उल्लेख येतात. ‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥(१०२८ ) हरिश्चंद्र नाम पर्वतू! तेथ महादेवो भवतु !! सुसिध्द गाणी विख्यातु! सेविजे जो!! (१०२९ ) हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥ (१०३०). या ओवीत शके १२३४ मधे हरिश्चंद्रगडावर हा ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख दिसुन येतो. तेराव्या शतकात ज्ञानदेव निवृत्ती आणि इतर भावंडे यात्रापर्वात येथे येऊन गेल्याचे इतिहास सांगतो. शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. सभासद बखरीत शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख येतो. पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पेशवाईत १७४७–४८ दरम्यान हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी (कर्णाजी) शिंदे यांची नियुक्ती केली. १७५१ मध्ये गडावर काही डागडुजीची कामे करण्यात आली. या किल्ल्याच्या खर्चासाठी २० गावांचे उत्पन्न लावून देण्यात आलेले होते. शाहू रोजनिशीत सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. पुढे १७७५-७६ मध्ये या किल्ल्याचा हवालदार म्हणून संताजी सावंत याची नेमणूक केलेली तत्कालीन कागदपत्रांतून आढळते. इंग्रज-मराठे अखेरच्या युद्धात कर्नल साईक्स याच्या फौजेने हा गड काबीज केला (मे १८१८). यावेळी लढताना किल्लेदार विष्णुपंत जोशी यांना वीरमरण आले. याच कर्नल साईक्सने १८३५ मध्ये किल्ल्याच्या कोकणकड्यावरून वर्तुळाकार इंद्रधनुष्य ज्याला इंद्रवज्र म्हणतात, ते दिसल्याची नोंद केलेली आहे. नंतर अहमदनगरचा जिल्हाधिकारी (कलेक्टर) हेन्री पॉटींजर याच्या हुकमानुसार तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कमाविसदार रामराव नरसिंह याने बोइट याच्या ताब्यात हा किल्ला दिला (१४ जून १८१८). पुढे १८ डिसेंबर १८१८ मधे हा किल्ला पाडण्यासाठी कॅप्टन म्याकिंटोश या भागात आला. त्याने गडावर जाणाऱ्या वाटा,पाण्याची टाकी तसेच तटबंदी उद्ध्वस्त केली. १८३६ ते १८४३ दरम्यान हरीसन नावाचा इंग्रज अधिकारी नगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना त्याने या गडाचे थंड हवेचे ठिकाण म्हणुन विकास करण्यासाठी प्रयत्न केले. त्याने मंदीराकडील लेण्यांजवळ एक बंगला देखील बांधला पण लवकरच तो आगीत जळुन खाक झाल्याने विकासाचे प्रयत्न मागे पडले. या बंगल्याचा चौथरा आजदेखील आपल्याला पहायला मिळतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!