हरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ४१६० फुट

श्रेणी : मध्यम

नगर जिल्ह्यातील कळसुबाई पर्वतरांगेतील अलंग-मदन-कुलंग हे दुर्गत्रिकुट गडप्रेमींमध्ये भटकंतीसाठी प्रसिध्द आहे त्यामानाने नाशीक जिल्ह्यातील डोलबारी डोंगररांगेत असलेले मुल्हेर-मोरा-हरगड हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे. २ ते ३ दिवसांची सवड असल्यास सालोटा-साल्हेर-मुल्हेर-मोरागड-हरगड अशी ५ किल्ल्यांची भटकंती सहजपणे करता येते. या ५ किल्ल्यांमध्ये आजही उपेक्षित असलेला दुर्ग म्हणजे हरगड. महाराष्ट्रात साल्हेर सालोटानंतर उंचीने तिसऱ्या क्रमांकाचा व मुल्हेरपेक्षा उंचीने जास्त असलेला हा किल्ला मुल्हेरचा सरंक्षकदुर्ग म्हणुन ओळखला जातो. मुल्हेरच्या परिघात असलेला हा किल्ला मुल्हेरचाच भाग म्हणुन ओळखला जात असला तरी मुल्हेर माचीशिवाय किल्ल्यावर जाणाऱ्या तीन वेगळ्या वाटा व त्या वाटेवर असणारे दरवाजे पहाता हा एक स्वतंत्र किल्ला आहे. पश्चिमेकडील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि बागलाण यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. सटाणा तालुक्यात असलेल्या हरगडावर जाण्यासाठी आपल्याला नाशीक-सटाणा-ताहाराबाद मार्गे मुल्हेर गाव गाठावे लागते. ... नाशीक ते सटाणा हे अंतर ९० कि.मी.असुन सटाणा येथुन ताहाराबादमार्गे मुल्हेर ३५ कि.मी.अंतरावर आहे. मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला समोर मुल्हेर डावीकडे मोरागड तर उजवीकडे हरगड असे या त्रिकुटाचे दर्शन घडते. मुल्हेर गावातुन गडाच्या दिशेने जाताना गावात काही ठिकाणी नक्षीकाम केलेले जुने वाडे पहायला मिळतात. गावातुन बाहेर पडल्यावर डाव्या बाजुला टेकाडावर एक मंदिर तर उजव्या बाजुला मुघल शैलीतील गोलाकार घुमट असलेली एक मोठी जुनी वास्तु दिसते. सद्यस्थितीत गडावर जाण्यासाठी चार वाटा असुन यातील दोन वाटा दुर्गप्रेमींकडून गडावर जाण्यासाठी वापरल्या जातात तर उर्वरित दोन वाटा स्थानिकांकडून वापरल्या जाणाऱ्या ढोरवाटा आहेत. या वाटांनी स्थानिक लोक पावसाळ्यात त्यांची जनावरे चरण्यासाठी गडावर घेऊन जातात. यातील पहिली वाट जामोद गावातुन कपारभवानी येथुन गडावर येते तर दुसरी वाट नरकोल येथुन गोट्याची बारी या खिंडीतून वर चढते. या दोन्ही वाट फारशा वापरात नसुन केवळ स्थानिक या वाटांचा वापर करतात. गडावर जाणाऱ्या भटक्यांसाठी सोयीच्या दोन्ही वाटा मुल्हेर माचीतुनच गडावर जातात. यातील एक वाट कठीण तर दुसरी वाट सोपी आहे पण थोडे जास्त चालावे लागते. मुल्हेर गडाकडे जाणारा हा पक्का रस्ता मुल्हेरगडाच्या पायथ्याशी व तेथुन पुढे कच्चा रस्ता माचीचे तीन दरवाजे पार करत आपल्याला मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापर्यंत घेऊन जातो. गणेश मंदिराकडून पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे मुल्हेर व हरगड मध्ये असलेल्या खिंडीकडे जाताना दिसते. या वाटेने मुल्हेरगडाचे माचीवर असलेले दोन उध्वस्त दरवाजे पार करून आपण खिंडीत पोहोचतो. या खिंडीला डाकिणदरा असं नाव आहे. मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावरून येणारी वाट देखील या ठिकाणी खाली उतरते. मुल्हेर-हरगड या दोन्ही किल्ल्यामध्ये सहजपणे ये-जा करता येऊ नये यासाठी खिंडीचा हा भाग डोंगरसोंडेपर्यंत तटबंदीने बंदिस्त केला असुन त्याला दोन्ही गडाच्या दिशेने दोन दरवाजे ठेवलेले आहेत. सध्या या तटबंदीची बरीचशी पडझड झालेली असुन दरवाजाशेजारील केवळ बुरुज शिल्लक आहेत. हरगड किल्ला असलेल्या डोंगराची एक सोंड या खिंडीत उतरली आहे. गडाच्या पायथ्यापासुन इथवर येण्यास एक तास लागतो. येथुन गडावर जाण्यासाठी दोन वाटा असुन एक वाट समोरील डोंगर सोंडेवरून एक तासात आपल्याला गडावर नेते तर दुसरी वाट खिंडीतून डावीकडे हरगडच्या दिशेने असलेल्या घळीकडे जाते. पहिली वाट हि थोडीफार घसाऱ्याची असुन काही ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या आहेत पण थोडेफार साहस करायची तयारी असल्यास या वाटेने जाण्यास काहीच हरकत नाही. या वाटेने गेल्यास व दुसऱ्या वाटेने उतरल्यास कमी वेळात व कमी श्रमात आपला संपुर्ण किल्ला पाहुन होतो. येताना मात्र या वाटेवर नजरभय असल्याने हि वाट टाळणे योग्य. घळीच्या वाटेने गेल्यास घळीपर्यंत जाण्यास अर्धा तास व या घळीतून किल्ल्यावर जाण्यास एक तास असा एकुण दिड तास लागतो. या वाटेवर असलेली तटबंदी व तीन दरवाजे मोठया प्रमाणात ढासळलेले असल्याने लहान मोठे दगड तुडवत किल्ल्यावर जावे लागते. नरकोल गावातुन येणारी गोट्याची बारी या वाटेशिवाय दुसरी एक वाट या घळीच्या वाटेला येऊन मिळते. आपण मात्र सोंडेवरील वाटेनेच किल्ल्यावर जाणार असल्याने वाटेचे वर्णन त्याप्रमाणेच केले आहे. सोंडेवरील घसाऱ्याची लहानशी वाट पार करून आपण कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी किल्ल्याखाली असलेल्या पठारावर पोहोचतो. या ठिकाणी आपल्याला किल्ल्याखाली असलेल्या मेटाचे म्हणजेच चौकीचे अवशेष दिसुन येतात. जामोद येथुन कपारभवानी मार्गे येणारी वाट देखील याच पठारावर येते. पठारावरील चढाचा भाग पार करत आपण समोर दिसणाऱ्या घळीच्या दिशेने जात डाव्या बाजुने किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. या ठिकाणी काही पायऱ्या कोरलेल्या असुन या पायऱ्या चढुन आपण किल्ल्याच्या घळीत येतो. या घळीत किल्ल्यावर जाणारा अतिशय सुंदर बांधणीचा पुर्वाभिमुख दरवाजा असुन दरवाजासमोर जाईपर्यंत तो नजरेस पडत नाही. दरवाजापर्यंत सहजपणे जाता येऊ नये यासाठी दरवाजाखालील भागात बांधलेली तटबंदी मोठया प्रमाणात ढासळली आहे. उंच चौथऱ्यावर असलेल्या या दरवाजात जाण्यासाठी सध्या चौथऱ्याखाली काही दगड ठेवलेले असुन त्यावर चढुन या दरवाजातून आपला गडावर प्रवेश होतो. गडाचा दरवाजा कोरीव नक्षीकामाने सजवलेला असुन आतील भाग वरील दुसऱ्या दरवाजापर्यंत बंदीस्त करण्यासाठी बांधुन काढला आहे. दुसऱ्या दरवाजा जवळ असलेल्या पहारेकऱ्याच्या देवडीत आपल्याला एक झिजलेला शिलालेख दिसतो. दरवाजातुन बाहेर पडल्यावर डाव्या बाजुने गडफेरीस सुरवात केल्यावर किल्ल्याचा मुल्हेरच्या दिशेने असलेला भलामोठा बुरुज नजरेस पडतो. या बुरुजावरून सोंडेवरील मार्गाने गडावर येणारी संपुर्ण वाट नजरेस पडते. हरगडाच्या उत्तर दिशेला असलेला हा भाग मुल्हेर किल्ल्याच्या समोर असल्याने मोठया प्रमाणात तटबुरुजांनी बंदिस्त केला आहे. बुरुज पाहुन गडाच्या माथ्यावर जाताना वाटेत दोन खडकात खोदलेली टाकी पहायला मिळतात. यातील एका टाक्यात शेवाळलेले पाणी असुन शेवाळ बाजुला करून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे तर दुसरे टाके मात्र मातीने भरले आहे. टाक्यावरून पुढे आल्यावर आपल्याला दरवाजाच्या वरील भागात बांधलेली तटबंदी दिसुन येते. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ४१८० फुट असुन गडाचा परीसर साधारण ११० एकरवर उत्तरपश्चिम पसरलेला आहे. गडाच्या या उत्तर भागात सपाटीवर हरगडाचे मुख्य आकर्षण असलेली १४ फुट लांबीची भलीमोठी तोफ असुन तोफेच्या पुढील भागात तोफ ठेवण्याची जागा व तोफेला फिरवण्यासाठी असलेली रचना पहायला मिळते. हि तोफ म्हणजे अलिबाग येथील जंजिरा किल्ल्यावरील कलालबांगडी या तोफेची प्रतिकृती असुन हजारबागदी(बांगडी?) म्हणुन ओळखली जाते. या तोफेच्या माऱ्यात मुल्हेरचा बालेकिल्ला, मुल्हेरमाचीच नव्हे तर मुल्हेरवाडीपर्यंतचा भाग येतो. हरगडाचा माथा म्हणजे विस्तीर्ण पठार असुन गडाचा उत्तर भाग या पठारापासुन वेगळा करण्यासाठी त्याला सपाटीवरून दोन्ही बाजुच्या उतारापर्यंत तटबंदी घालण्यात आली आहे. हा भाग कदाचित खाशा लोकांच्या राहण्यासाठी अथवा सैनिकांसाठी असावा असे वाटते. या तटाला लागुनच उध्वस्त वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या उत्तर भागातुन पश्चिमेकडे जाताना अनेक उध्वस्त वास्तुंचे चौथरे व कडयाच्या टोकाला चौकीचे अवशेष पहायला मिळतात. वाटेने सरळ गेल्यावर आपण उध्वस्त शिवमंदिराकडे पोहोचतो. मंदिराच्या आवारात एक हनुमानाची मुर्ती असुन या मुर्तीच्या पायाशी दोन भग्न नंदी व नऊ तोफगोळे ठेवलेले आहेत. मंदिराच्या परिसरात मोठया प्रमाणात वस्तीचे अवशेष विखुरलेले आहेत. वाटेने पुढे निघाल्यावर वाटेच्या डाव्या बाजूस खाली डोंगर उतारावर बांधलेले दोन मोठे बंधारे दिसुन येतात पण तेथे न जाता वाटेने गडाच्या पश्चिम टोकाला असलेल्या सुलतान बुरूजापर्यंत जावे. गडाच्या या टोकावरून दूरवर असलेल्या साल्हेर-सालोट्याचे दर्शन होते. येथुन परत फिरल्यावर काही अंतरावर उजव्या बाजुस डोंगर उतारावर कातळात खोदलेले पाण्याचे टाके असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन पुढे उताराच्या बाजुने चालत आपण वरून पाहिलेल्या दुसऱ्या बंधाऱ्याच्या भिंतीवर येतो. बंधाऱ्याच्या भिंतीच्या खालील भागात कातळात खोदलेले एक टाके पहायला मिळते. बंधारा पार केल्यावर पुढे डाव्या बाजुच्या उंचवट्यावर गोलाकार बांधकाम असलेल्या तीन मोठया व एक लहान वास्तु नजरेस पडतात. काहीच्या मते हे धान्याचे कोठार आहे तर काहींच्या मते हि गडावरील टाकसाळ आहे. यातील दोन गोलाकार वास्तुमध्ये सुवर्णकार सोन्याला आकार देताना खाली वापरत असलेला दगड पहायला मिळतो. सध्या मात्र या वास्तुमध्ये गावकऱ्यांची गुरे बांधली जातात. टाकसाळीच्या पुढील भागात एका वास्तुचे अवशेष असुन त्यामागे हिरव्यागार पाण्याने भरलेल्या खडकात कोरलेल्या दोन पाण्याच्या टाक्या दिसुन येतात. उतारावरून तसेच पुढे गेल्यावर आपण सर्वप्रथम पाहिलेला बंधारा नजरेस पडतो. बंधाऱ्याची दगडी भिंत साठ सत्तर फुट लांब असुन हा बंधारा उतारावर दोन टप्प्यात बांधलेला आहे. उतारावरील कातळ कोरून त्यातील दगड बांधकामात वापरला आहे. कातळ कोरून बंधाऱ्याची पाणी साठविण्याची क्षमता जरी वाढवली असली तरी सध्या यात पाणी टिकत नाही. गडावर मोठया प्रमाणात असलेला पाणीसाठा व वास्तुंचे अवशेष पहाता गडावर मोठया प्रमाणात राबता असावा असे वाटते. बंधाऱ्याच्या खालील बाजुस असलेल्या खिंडीत गडावर येण्यासाठी दोन दरवाजे असुन गडाच्या या दक्षिण कड्यावर तटबंदी उभारलेली आहे. इथे खाली एक दरवाजा बांधलेला दिसतो. ढासळलेल्या तटाच्या दगडांतून थोडे जपून गेल्यास खाली दरवाजापर्यंत जाता येते. दक्षिण बाजूच्या कड्याबाहेर असलेल्या एका डोंगराला जोडलेल्या भागावर हा दरवाजा बांधलेला आहे. दरवाजासमोर एक विरगळ पडलेली असुन तिच्यावर हातात तलवार घेतलेला योद्धा कोरलेला आहे. नरकोल गावातुन गोट्याची बारी येथुन गडावर येणारी वाट या दरवाजातून वर येते. दुसऱ्या दरवाजाच्या खालील भागात असणारी वाट मोठया प्रमाणात ढासळलेली असुन केवळ स्थानिक लोकच या वाटेचा वापर करतात. हा दरवाजा पाहुन झाल्यावर बंधाऱ्याच्या पुढील भागात असलेला उंचवटा चढुन आपण मुल्हेर गडाच्या सोंडेसमोरील भागात येतो. या भागात मोठया प्रमाणात घरांचे अवशेष दिसुन येतात. अवशेष पाहुन मागे फिरल्यावर आपण आधी पाहिलेल्या शिवमंदिरासमोर येतो. हरगडावरुन मुल्हेरमाची, मोरागड, मुल्हेरगड,न्हावीगड, मांगीतुंगी आणि साल्हेर-सालोटा हे किल्ले व आसपासचा परिसर दिसतो. संपुर्ण गडमाथा फ़िरण्यास अडीच तास लागतात. मंदिरासमोर असलेल्या घळीतून गड उतरण्याची वाट असुन आपण सुरवातीला वर्णन केलेली वाट या घळीतुनच वर येते. वाटेच्या सुरवातीला डाव्या बाजूस कोरडे पडलेले टाके आहे. साधारण ६० अंशाच्या कोनातुन ३०० फुट खाली उतरत जाणाऱ्या या घळीच्या वाटेवर तीन दरवाजे लागतात. या सर्व दरवाजांची पडझड झालेली असुन दरवाजा असल्याच्या खुणा व काही ठिकाणी बुरुज शिल्लक आहेत.गडाच्या तळातील तिसऱ्या दक्षिणाभिमुख दरवाजासमोर आतील बाजूस खडकावर कोरलेले मारुतीचे शिल्प पहायला मिळते. हा दरवाजा पार करून पायवाटेने डाकीणखिंडीत पोहोचल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. हरगडचा इतिहास हा मुल्हेर गडाशीच संबंधीत असल्याने या गडाचा फारसा वेगळा असा इतिहास आढळत नाही. महाभारतात मुल्हेरचा उल्लेख रत्नपूर या नावाने येतो. त्या काळात येथे असलेल्या मयूरध्वज राजाच्या नावावरून या नगराला मयूरपूर नाव पडले व पुढे त्याचा अपभ्रंश होत मुल्हेर हे नाव अस्तित्वात आले. मुल्हेर ही बागलाणची राजधानी व मोरा-हरगड या किल्ल्यांची बांधणी बागुलवंशीय राजांनी केली. त्या काळात मुल्हेरची बाजारपेठ ऐश्वर्यसंपन्न बाजारपेठ म्हणून होती. सुरतेपासून दक्षिणेस जोडलेला व्यापारी मार्ग हा येथून जात असे. मुल्हेर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात असताना त्याने येथील टांकसाळीत महमुदी रुपये पाडल्याची नोंद आढळुन येते. याशिवाय मुल्हेरी तलवार मुठीसाठी मुल्हेरवाडी प्रसिद्ध होती. मुल्हेर मुघलांच्या ताब्यात जाण्याआधी राजा बहीरमशहाच्या कारकीर्दीत अमात्य काशीराजांवर औरंगजेबाशी फितूर झाल्याचा आळ आला व ते राजकारण सोडुन हरगडावर येऊन गणेशाची आराधना करू लागले. सतराव्या शतकात ताहिर या मुल्हेरच्या पहिल्या मुघल किल्लेदाराने त्याच्या नावे ताहराबाद शहर वसवले. मोगल सरदार मुहम्मद ताहिर याने बागलाणवर हल्ला चढवला तेव्हा राजा बहिर्जी याचे राज्य होते. युद्धात आपला पराभव होणार हे दिसल्यावर त्याने औरंगजेबाशी तह करून मुघल मनसबदारी स्वीकारली आणि ऐश्वर्यसंपन्न बागलाण मुघलांच्या ताब्यात गेले. बागलाण मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मुल्हेरबरोबर हरगड देखील त्यांच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी मुल्हेरबरोबर हरगड स्वराज्यात दाखल करून घेतला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस इतर किल्ल्यांप्रमाणे हरगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!