हनुमंतगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ३६०० फुट

श्रेणी : मध्यम

सातवाहन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुरेख स्वप्नं. इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला अन् त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी अशा बुलंद किल्यांची निर्मिती झाली. त्या काळी नाणेघाटा पासून काही अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर या गांवी बाजारपेठ वसली गेली. सातवाहन यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले यातील एक किल्ला म्हणजे किल्ले निमगिरी. या निमगिरी शेजारीच हनुमंतगड नावाचा जोडदुर्ग आहे. निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका लहानशा खिंडीने वेगळे झाले आहेत. येथे येण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुणे –मुंबईहुन सर्वप्रथम जुन्नर गाठावे. ... जुन्नरजवळ माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच जुन्नरपासून २५ कि.मी.वर तर हडसर गावापासुन १० कि.मी.वर खांडीची वाडी गाव आहे. या वाटेने २ कि.मी.चा फेरा जरी वाढत असला तरी निमगिरीला जाणारा हा सर्वात चांगला मार्ग आहे. खांडीची वाडी गावामागेच निमगिरी व हनुमंतगड हि दुर्गजोडी वसली आहे. गावात आल्यावर खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड हे लक्षात ठेवुन चढाईला सुरवात करावी. या वाटेवर सर्वप्रथम अतिउच्च विजेचा दाब असणारा खांब दिसतो. या खांबाच्या पुढे असलेल्या शेतातुन वाट सोडुन डावीकडे गेले कि एक अलीकडेच बांधलेले काळुबाईचे मंदीर दिसते. या मंदिराच्या आवारात व वाटेवर प्राचीन मुर्ती आणि मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. मंदिराच्या मागील बाजुस दोन विरगळ व एक कोरीव मुर्ती आहे. येथुन मूळ वाटेवर परत येऊन वर चढायला सुरवात केल्यावर वरील टप्प्यावर एक मोठी विहीर आहे. या विहिरीच्या डाव्या बाजुस असलेल्या झाडीत पिंपळाखाली लहानशा चौथऱ्यावर मारुतीची मुर्ती आहे. या मुर्तीपुढे काही अंतरावर ४२ विरगळ एका रांगेत मांडुन ठेवल्या आहेत. या विरगळ अलीकडील काळातील असुन त्यावर फारसे कोरीव काम दिसत नाही. एका विरगळीवर मोडी भाषेत शिलालेख असुन उर्वरीत विरगळीवर मानव आकृत्या,शिवलिंग, नंदी कोरले आहेत. येथुन पुढे जाताना वाटेत वनखात्याने उभारलेला मनोरा व निवारा असुन या दोघांच्या मधील वाटेने वर निघावे. येथुन वर चढत जाणारी ठळक पायवाट थेट खिंडीतील किल्ल्याच्या पायथ्याच्या पायऱ्यापर्यंत जाते. पायऱ्यांच्या अलीकडे एक वाट उजवीकडे निमगिरीच्या डोंगरात कोरलेल्या गुहेकडे जाते. टेहळणीसाठी खोदण्यात आलेली हि गुहा खोदताना अर्धवट सोडुन देण्यात आली आहे. या वाटेच्या खाली असलेली वाट वळणे घेत १५ मिनिटात निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधील खिंडीत येते. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे. डाव्या बाजूच्या डोंगरावर असलेल्या हनुमंत गडावर चढतांना वाटेत काही कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात.खिंडीतून ५ मिनिटात आपण हनुमंतगडाच्या माथ्यावर पोहोचतो पण आपला प्रवेश दरवाजातुन न होता शेजारील वाटेने थेट दरवाजाच्या वरील भागात होतो. हनुमंतगडाचे प्रवेशव्दार आणि शेजारचे दोनही बुरुज आजही शिल्लक असुन प्रवेशव्दार मात्र वरील कमानीपर्यंत मातीत गाडले गेले आहे. गडाच्या या भागात व्यवस्थित तटबंदी दिसुन येते. हनुमंतगड समुद्र सपाटीपासून ३५०० फूट उंचावर असुन दोन लहान डोंगरावर वसलेला हा गड ९ एकरवर पसरला आहे. गडाची रचना व त्यावरील वास्तू पहाता हा गड शिवकाळात किंवा त्यानंतर अस्तित्वात आला असावा असे वाटते. दरवाजा पाहुन तटबंदीच्या कडेकडेने पुढे चालत गेल्यावर पाण्याचे मोठे टाके दिसते. या टाक्याच्या पुढे काही अंतरावर डोंगर उतारावर दुसरे टाके पहायला मिळते. या दुसऱ्या टाक्याच्या खालील बाजुस गडाची तटबंदी दिसते. येथुन डाव्या बाजूने टेकडी चढुन वर गेल्यावर एका उध्वस्त चौबुर्जी वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्याचे अलीकडेच उत्खनन झालेले आहे. वाडा पाहुन डाव्या बाजूला खाली असलेल्या पठारावर पाण्यची तीन टाकी असुन पुढील भागात अजुन दोन जोडटाकी आहेत. गडावर अशी एकुण ९ टाकी आहेत. ती पाहून दरवाजाकडे परत आल्यवर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. हनुमंतगडावरून निमगिरी किल्ल्याच्या दरवाजाच्या संपुर्ण वाटेवर लक्ष ठेवता येते. आज्ञापत्रात अमात्यांनी सांगितल्याप्रमाणे गडाच्या समीप दुसरा डोंगर असू नये असल्यास बांधुन काढावा. कदाचीत यासाठीच नंतरच्या काळात या किल्ल्याची रचना करण्यात आली असावी. गडावरून चावंड, जीवधन, हडसर, हरिश्चंद्रगड, सिंदोळा किल्ले नजरेस पडतात. संपूर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास लागतो तर पायथ्यापासुन दोन्ही किल्ले पाहायला चार तास लागतात. इतिहासाबाबत हनुमंतगड मौन बाळगुन असल्याने व किल्ल्यावर फारसे अवशेष नसल्याने दुर्गप्रेमींकडून हा किल्ला दुर्लक्षिलेला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!