सौंदळगा
प्रकार : भुईकोट
जिल्हा : बेळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
कोल्हापुर बंगळूर महामार्गाने निपाणीला जाताना कागलनंतर १४ कि.मी.अंतरावर महामार्गाच्या डावीकडे सौंदळगा गाव आहे. या गावात महामार्गाला लागुनच २०० मीटर अंतरावर पडका भुईकोट आहे. महामार्गाजवळ असलेला हा भुईकोट फारसा कोणाला माहीत नसुन शेवटच्या घटका मोजत आहे. कोल्हापुरपासुन ३३ कि.मी.वर तर निपाणीपासुन केवळ ८ कि.मी. अंतरावर असलेला हा कोट बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात येतो. गावातही हा किल्ला फारसा कोणाला माहिती नसल्याने चौकशी करतच कोटाजवळ पोहचावे लागते. आज येथे किल्ल्यासारखी कोणतीही वास्तु शिल्लक असुन केवळ सपाटी व सपाटीच्या टोकाला २०-२५ फुट उंचीचा एक बुरुज शिल्लक आहे. बुरुजावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन वर जाण्याचा मार्ग मोडकळीस आला आहे. बुरुजाच्या बांधकामात तीन स्तरांवर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या दिसुत येतात.
...
यावरून हि लढाऊ वास्तु असल्याचा अंदाज करता येतो. बुरूजासमोरच्या सपाटीवर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे पण यात देखील झाडी वाढलेली आहे. सपाटीवर एका टोकाला लहान मंदीर असुन त्यात देवीचा तांदळा आहे पण हि कोटातील वास्तु असावी असे ठोसपणे सांगता येत नाही. बुरुजासमोरील सपाटी साधारण अर्धा एकर असावी. बुरुज व कातळात कोरलेली टाकी पाहण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. किल्ल्याचे नाव व इतिहास सध्या तरी माझ्या वाचनात आलेला नाही.
© Suresh Nimbalkar